आरक्षण मिळूनही महिलांना स्वातंत्र्य आहे का?

 आरक्षण मिळूनही महिलांना स्वातंत्र्य आहे का?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/04/2026 : सध्या महिला आरक्षणावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. आरोप प्रत्यारोप आणि खुलेआम डिबेट साठी ओपन चँलेंज दिले जात आहे. केंद्रातील भाजप सरकार तोंडघशी पडल्यामुळे राज्यातील सरकार रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहेत. सरकारच सरकारच्या विरोधात आंदोलन करणार का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. तुमच्याकडे संख्याबळ नसताना महिला आरक्षण विधेयक कोणी आणायला सांगितले होते हा जनतेचा सत्ताधारी भाजपला सवाल आहे. बरं आजपर्यंत महिलांना आरक्षण दिले आहे का? तर महानगरपालिका निवडणूकीत 50% आरक्षण दिले गेले आहे. म्हणजे सर्व महानगरपालिकांमध्ये अर्ध्या नगरसेविका या महिला आहेत. मग त्या महिलांना खरोखरच अधिकार आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे. महिला आरक्षणाच्या नावाने बोंब मारणारा सत्ताधारी भाजप हिंदू राष्ट्र निर्मात्याचा प्रणेता आहे. मग भारताच्या इतिहासात चातुर्वर्ण्य पध्दतीत महिलांना किती आणि काय अधिकार होते? हे भाजप सांगू शकेल का? महिलांनी चूल आणि मूल याच्या पलिकडे जाऊ नये, पतिच्या मृत्यूनंतर ती विद्रूप दिसावी म्हणून केशवपन आणि सरळ तिला सती दिले जात होते. म्हणजे तिचा अक्षरशः खून केला जात होता. धार्मिक विधीच्या नावाखाली तिचे शोषण केले जात होते. तिला देवीच्या नावाने देवदासी बनवून भोग घेतले जात होते. एकुणच यांच्या विचारसरणीनुसार स्त्री कडे फक्त भोगवस्तू म्हणूनच पाहिले जात होते.

     आमचे छत्रपती शिवराय यांनी स्त्री ला माता म्हणून स्थान दिले होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेच्या कट्टर धार्मिकतेच्या लोकांशी लढा देऊन स्त्री ला साक्षर बनविले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्री ला संपुर्ण अधिकार दिले. या महामानवांचे स्त्री वर अनंत उपकार आहेत. परंतु आजची स्त्री या महामानवांचे उपकार न मानता, फुल्यांच्या सावित्रीची पुजा करण्याएवजी ज्यांनी वर्षानुवर्षे खितपत ठेवले त्या विचारसरणीच्या सत्यवानच्या सावित्रीची पुजा करते यापेक्षा दुर्दैव काय असू शकते.

अशाच बुरसटलेल्या विचारसरणीची लोकं आज महिलांना आरक्षण देण्यासाठी आकांडतांडव करत आहेत. स्त्री ला पुढे करुन तिच्या आडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे देशाचे सरळ सरळ दोन तुकडे करण्याचा भयंकर डाव सत्ताधारी भाजपने आखला होता. पुढे देशाचे तुकडे झाल्यानंतर इतिहास लिहिताना याचा दोष याच महिलांवर टाकण्यात आला असता. विरोधी पक्षांनी हा भयंकर डाव वेळीच ओळखला म्हणून पुढचा अनर्थ टळला. नाहीतर पुन्हा महिलांनाच बदनाव व्हावे लागले असते. सत्ताधा-यांचा मनसूबा धुळीस मिळाल्यामुळे ते आता आंदोलन करत आहेत. मणिपूर, हाथरस, कुस्तीपटू सारखी महिलांची प्रकरणे केंद्र सरकारने कशी हाताळली हे सर्व जनता जाणून आहे. महिला आरक्षणासाठी मगरमच्छ सारखे अश्रू ढाळण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या. इतकाच महिलांचा कळवळा असेल तर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्रीपदे महिलांना बहाल करा. तरच तुमचा हेतू शुध्द होता हे जनतेला कळेल. आज कितीतरी तरुण मुली गायब होत आहेत, त्यांचे अपहरण आणि बलात्कार होत आहेत. आधी त्याकडे लक्ष द्या आणि मग महिलांच्या आरक्षणाकडे वळा. कारण, महिलांना आरक्षण देऊनही त्यांच्या आडून पुरुषच सत्ता चालवणार आहे हेच ढळढळीत सत्य आहे! 

✍️ महेंद्र कुंभारे,

संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.

मो.नं. 8007741356.


======================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या