राज्यात उष्णतेची लाट, उष्माघातापासून बचाव कसा करायचा? हे बिलकूल पिऊ नका, नाही तर… मार्गदर्शक सूचना जारी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/04/2026 :
महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आणि वाढता उष्माघाताचा धोका लक्षात घेता, सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याची सविस्तर माहिती यात दिली आहे. विशेषतः कोणती पेये टाळावीत आणि शरीराला कसे हायड्रेटेड ठेवावे यावर भर दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अनेकांचा जीव घाबराघुबरा होत आहे. कडकडीत उन्हामुळे राज्यात एकाचा बळीही गेला आहे. उष्णतेचा कहर अजून वाढणार असल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सरकारने काय करावे आणि काय करू नये हे सूचवले आहे. सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच कोणते पेय घ्यावेत आणि कोणते घेऊ नये याची माहितीही यात देण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
नागरिकांसाठी असलेल्या मार्गदर्शक सूचना
▪️ नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावे, हलके तसेच सैल कपडे वापरावेत. तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
▪️ सावलीत विश्रांती घेणे आणि घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
▪️ दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, मद्यपान आणि कॅफिनयुक पेये टाळावीत. उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे.
▪️ लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
हे करु नका...
▪️ दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरु नका.
▪️ मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड साॅफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डीहायड्रेट होते.
▪️ उन्हात अतिकष्टाची कामे करु नका.
▪️ उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
▪️पार्किंगमधील वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना ठेवू नका.
▪️ बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
*हे करा...
▪️तहान लागली तर पाणी प्या.
▪️ सौम्य रंगाचे, सैल आणि काॅटनचे कपडे वापरा.
▪️ बाहेर जाताना गाॅगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
▪️प्रवासात पाणी सोबत ठेवा.
▪️आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
▪️ कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा.
प्रशासनाला कोणत्या सूचना?
▪️प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
▪️ जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयात आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर द्यावा.
▪️ शाळांना सूचना देणे, गरजेनुसार शाळांच्या वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.
▪️ जनसमूह कार्यक्रमांसाठी सावली आणि पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत आणि ORS उपलब्ध ठेवावे. तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे.
▪️ कामगार, शेतकरी आणि बाहेर काम करणार्यांची करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे. नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत.
संकलन : यशवंत वाघ

0 टिप्पण्या