✍️ आयुष्याचा खरा सूत्रधार : गरज


✍️ आयुष्याचा खरा सूत्रधार : गरज

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 15/04/2026 :

आपण नेहमी म्हणतो की आपलं आयुष्य आपण चालवतो, पण खरं सांगू का? आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल हा गरज नावाच्या गोष्टीकडे असतो. हे ऐकायला कदाचित थोडं कटू वाटेल, पण हेच आपल्या जगण्याचं खरं सूत्र आहे.

आपल्या आयुष्यात जी माणसांची ये-जा सुरू असते, ती बहुतेक वेळा गरजेनुसारच असते. प्रवासात काही माणसं जीवाभावाची वाटतात, पण ऐन वेळी ती आपली साथ देऊ शकत नाहीत, म्हणून ती मागे राहतात. याउलट, काही माणसं आपल्याला अजिबात आवडत नाहीत, पण केवळ गरज आहे म्हणून आपण ती नाती ओढत राहतो.

जेव्हा माणसाची गरज संपते, तेव्हा तो समोरच्याला एखाद्या पुस्तकाच्या फाडलेल्या पानासारखं फेकून देतो. पण गंमत बघा, पुन्हा जर गरज लागलीच, तर तोच माणूस त्याच फाडलेल्या पानाला शब्दांच्या मलमाने चिटकवायचा केविलवाणा प्रयत्न करतो.

अनेकदा आपण इतरांच्या वागण्यावर बोट ठेवतो, पण आपणही नकळत तसेच वागत असतो. गरज असेल तर भेट होते आणि गरज संपली की विसर पडतो. ही गरज कधी पैशाची असते, कधी विचारांची, तर कधी मनाला वाटणाऱ्या एकटेपणाची.

आजकाल प्रत्येक नात्यात 'देण्या-घेण्याचं' एक गणित असतं. मग तो व्यवहार पैशाचा असो वा भावनांचा. कोणी कितीही मोठेपणाच्या गप्पा मारल्या, तरी आजही मनाला एकच प्रश्न पडतो, असं एखादं नातं भेटेल का, जिथे कोणतीही अट नसेल? जिथे गरज नसेल तर फक्त प्रेम असेल?

असं निरपेक्ष नातं अजून जन्माला यायचं आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

© ShradDhanesh's_Dairies

✍️ संकलन : प्रविण सरवदे, कराड


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या