AC चालू असताना पाण्याची बादली का भरून ठेवावी ?

AC चालू असताना पाण्याची बादली का भरून ठेवावी ? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/04/2026 :

उन्हाळा वाढला की, एसी शिवाय जमत नाही. घरात आल्यावर एसीचा गारवा मनाला सुखद शांती देतो. अनेक जण रात्रभर एसी लावूनच झोपतात. पण, कधी तुमच्या सोबत असं घडलंय का, की सकाळी उठल्यावर घसा कोरडा पडलेला असतो, नाक सुकल्या सारखं वाटतं किंवा डोळ्यात जळजळ होते? तुम्हाला वाटेल की हे एसीच्या थंडाव्यामुळे होतंय, पण खरं कारण वेगळं आहे. 

एसी रूम मधील हवेचा ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे हवा कोरडी होते. ही कोरडी हवा आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकते. पण यावर एक साधा घरगुती उपाय आहे. तो म्हणजे एसी रूम मध्ये एक पाण्याची बादली भरून ठेवणे. जेव्हा आपण एसी लावतो, तेव्हा तो हवेतील ओलावा काढून टाकतो, ज्यामुळे रूम मधील आद्रता कमी होते. रूम मध्ये पाण्याची बादली ठेवल्याने बाष्पीभवनाद्वारे हवेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. एसीच्या कोरड्या हवेमुळे नाकातील मार्ग कोरडा पडतो, ज्यामुळे काहींना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. रूम मध्ये पाणी ठेवल्याने हवेत ओलावा टिकून राहतो, परिणामी श्वास घेणं सोपं होतं आणि घसादुखीचा त्रास कमी होतो.

जेव्हा श्वास घेण्यास अडथळा येत नाही आणि शरीराला योग्य तापमान आणि आर्द्रता मिळते, तेव्हा झोपेची गुणवत्ता सुधारते. एसीमुळे होणारा श्वसनाचा त्रास कमी झाल्यामुळे मध्येच जागे न होता शांत झोपू शकता. डिहायड्रेशनमुळे अनेकदा सकाळी उठल्यावर डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो. तसेच, एसीच्या थेट थंडाव्यामुळे मान आणि खांद्याचे स्नायू जकडतात. हवेतील आर्द्रता या समस्यांची तीव्रता कमी करण्यास मदत करते.

पाण्याची बादली हवेतील धुलीकण आणि अ‍ॅलर्जन्सना पकडून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रूम मधील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारते. एसीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या निर्जलीकरणाशी लढण्यासाठी हायड्रेशन गरजेचे आहे. रूम मध्ये पाणी ठेवणे हा हवेतील ओलावा टिकवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. मात्र बादलीतलं पाणी दररोज बदला, जेणेकरून डास किंवा बॅक्टेरिया होणार नाहीत.बादली एसीच्या थेट हवेच्या प्रवाहात न ठेवता कोपऱ्यात ठेवावी.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या