बसलास कशाला, आळशी बनायला?

 

बसलास कशाला, आळशी बनायला? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 01/03/2026 : आळस हा माणसाचा शत्रू आहे. कारण आळसामुळे कार्यक्षमता कमी होते, संधी वाया जातात आणि मानसिक-शारीरिक आरोग्य खालावते. हा आळस प्रगती थांबवतो, काम पुढे ढकलण्यास प्रवृत्त करतो आणि जीवनात असंतोष निर्माण करतो. ज्यामुळे यश मिळणे कठीण होते. कष्ट केल्याशिवाय यशाचे फळ मिळत नाही. यशासाठी आळस त्यागून मेहनतीची सवय लावणे आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात, तोपर्यंत काम सोपे असते पण आळस असल्यावर कोणतेही काम करणे सोपे वाटत नाही.

बसलास कशाला, आळशी बनायला?

चाल पुढ देशाचं, काम करायला ||धृ||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या भजनाचा मुख्य उद्देश समाजाला आळस सोडून कर्माप्रती जागृत करणे हा आहे. वं. महाराजांनी नेहमी कर्माला अग्रस्थानी ठेवले होते. गीतेचा दाखला देऊन ते म्हणतात, "कर्म करो आसक्त न हो, यह है अमर गीता की बाणी"  कर्म करीत रहा. आळशी राहू नका. आपल्या सर्वांच्या कर्माच फलित हे देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे. महाराजांनी खडसावून सांगितले, "आड नका येऊ चला फिरा माघारा | आळशी लोकांचा मला न लागो वारा ||" शारीरिक दृष्ट्या सक्षम असूनही आळशीपणा करणाऱ्या तरुणांना स्वतः कष्ट करून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी हे भजन प्रेरीत करते. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास देशाची प्रगती होईल.

दिसायला धट्टा, शक्तीनं लठ्ठा |

जेवायला पाहिजे, दही दुध मठ्ठा |

काय झालं शेतावर जायला?

उगा मागतोस भीक, अरे काहीतरी शिक |

अन् चाल पुढ देशाचं, काम करायला ||1||

          तरुण असून शरीराचे लाड पुरवितोस. त्यामुळे तू दिसायला धट्टाकट्टा आणि शक्तीनं लठ्ठा आहेस. जेवायला दही, दुध, मठ्ठा पाहिजे. शरीर धडधाकट असूनही काम न करता आळशी बनून बसणाऱ्यांना महाराज विचारतात की, शेतात किंवा कामावर जाण्यास तुला काय हरकत आहे? दुसऱ्यांवर अवलंबून न राहता किंवा भीक न मागता, स्वतः कष्ट करुन पैसा मिळव. ग्रामगीतेतून तर ते सांगतात, "एरव्ही उद्योगविण जे भोगणे | ते मानवासी लाजिरवाणे | आळसाशी खाणेपिणे देणे असे महापाप ||" श्रम शक्तीवर देशाची प्रगती असल्याचे त्यांनी ठासून सांगितले व देशातील प्रत्येकाने आपापल्या परीने कार्य करीत राहावे. अडथळ्यांची तमा न बाळगता सतत प्रयत्नशील रहावे. आपल्या वैयक्तिक कामापेक्षा राष्ट्रहित, समाजसेवा किंवा देशहिताला प्राधान्य द्यावे.  सामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या परीने देशाला हातभार लावावा.

बापाचा धंदा होता भिकेचा |

तो काळ गेला मोफत जगायचा |

काय झालं भिकारी व्हायला?

लाज अता सोड तू, कामाला धज तू |

अन् चाल पुढ देशाचं, काम करायला ||2||

   तुझ्या बापाचा उदयनिर्वाहाचा (पोट भरण्याचा) मुख्य मार्ग किंवा व्यवसाय हा लोकांकडे भीक मागणे हाच होता. आता तो काळ मोफत जगायचा निघून गेला. पूर्वी ज्या गोष्टी विनामूल्य किंवा कमी किंमतीत मिळत होत्या, आता त्यासाठी पैसे मोजावे लागतात. फुकट मिळत नाही. तू कां बरं भिकारी होतोस. आता लाज सोडून कष्टानेच नव्हे तर आर्थिक नियोजनाने जगणे शक्य आहे. आता संकोच न करता पुढाकार घेऊन कठोर परिश्रम करण्याबद्दल ही एक प्रोत्साहन देणारी उक्ती आहे. जी कामावर लक्ष केंद्रित करण्यास सांगते. व्यक्तीगत स्वार्थ, संकटे किंवा अडचणी बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी, हितासाठी आणि निस्वार्थ सेवेसाठी पुढे चालत राहावे. ज्यामुळे देश सुरक्षित राहून प्रगती करतो.

आपलं कमाव अन् आपल्याला सुख दे |

सगळ्यांच जीवन उद्योगी होऊ दे |

उगाच फिरु नको नसला |

दास तुकड्या म्हणे, घेई ऐकून गाणे |

अन् चाल पुढ देशाचं, काम करायला ||3||

      कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता, स्वतःच्या हिंमतीवर कमवावे आणि त्यातून स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करावा. स्वतःच्या व कुटुंबाच्या सुखासाठी जीवन जगावे. प्रत्येकाने आळस सोडून स्वकष्टाने, सर्जनशीलतेने स्वतःच्या पायावर उभे राहावे. प्रत्येक व्यक्तीने कौशल्य वापरून उत्पादक (उद्योगी) कार्य करावे. प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार बनून समाजाला समृद्ध करावे. काहीही कारण नसताना उगाच इकडे तिकडे भटकू नको, फिरु नको किंवा व्यर्थ वेळ वाया घालवू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाची केवळ आळवणी करण्यापेक्षा भक्ती सोबतच देशाची सेवा करावी. हे राष्ट्रसंताचे भजन ऐकून आणि समजून घ्या. राष्ट्रहिताचे, गावाच्या विकासाचे आणि समाज सुधारणेचे काम करणे म्हणजेच आपला राष्ट्रधर्म पाळणे होय.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9970404180

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या