'एआय'ला या पाच गोष्टी विचारून संकटात सापडू नका

 


'एआय'ला या पाच गोष्टी विचारून संकटात सापडू नका 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 02/03/2026 :

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कडे माहितीचा खजिना आहे. तोही विविध भाषेतील. त्यामुळे त्याच्या आधारे तो आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो. एका अर्थाने तो त्याची बुद्धी तुमच्यासाठी वापरतोय. हे चांगलंच आहे. कमी वेळेत त्यामुळे कदाचित जास्त कामे होतील. पण त्यातला एक सुप्त धोका आहे. तो म्हणजे 'एआय' डेटा गोळा करत असतो. आणि त्याचा माहिती खजिना जास्तीत जास्त समृद्ध करत असतो. जेणेकरून वरचेवर अचूक उत्तर त्याला देता येईल, मात्र तुमचा डेटा हाच आजच्या काळात मौल्यवान असून त्यावरच मोठी बाजारपेठ उभी आहे. त्यामुळे कळत नकळत तुम्ही प्रश्न विचारताना एआय तुम्हाला काही प्रश्न विचारते. त्यावेळी तुम्ही ती माहिती त्याला पुरवली की ती तो साठवून ठेवतो. तुम्हाला तुमचे उत्तर मिळते पण तुम्ही 'एआय'ला दिलेल्या माहितीमुळे तुम्हीच संकटात येऊ शकता. त्यामुळे किमान पुढील पाच गोष्टी तरी 'एआय'ला कधी विचारू नका. का विचारू नका ? तेही त्यासोबत सांगतोय.

१) तुमच्याबद्दल, तुमच्या नातेवाईक / मित्रमंडळीबद्दल खाजगी माहिती शक्यतो विचारू नका.

कारण त्यामुळे तुमचे व तुमच्या त्या परिचितांचे खाजगीपण धोक्यात येते व तुमचा डेटा मधेच कुठे लीक झाला तर त्याच माहितीच्या आधारे तुम्हाला सायबर फ्रॉड मध्ये अडकवायला भामटे लोक टपूनच बसले आहेत

२) आजारावर औषध विचारू नका

अनेकांना स्वतःला झालेल्या आजाराबद्दल गुगल करायची सवय असते. (पुण्यातल्या माझ्या एका डॉक्टर मित्राने म्हणूनच दारावर पाटी लावलीय. की, गुगल करून येणाऱ्या पेशंटनी आत येऊच नये) आता गुगल पेक्षा 'एआय' आधी प्रभावी पर्याय मिळाल्याने अनेकजण आपल्या आजाराबद्दल त्याला प्रश्न विचारतात. अमुक आजारावर कोणते औषध चांगले आहे ? अशा शंका विचारतात. त्यावेळी 'एआय' उत्तर देतो. मात्र ते उत्तर त्याच्याकडे असलेल्या माहितीवर आधारित असते. म्हणजेच ती माहिती "कालची" असते. आणि आजार "आजचा" असतो. त्यामुळे 'एआय'च्या भरोशावर राहू नका.

सेकंड ओपिनियन म्हणून सुद्धा 'एआय'कडे पाहू नका. नाहीतर रोग परवडला पण वैद्य नको अशी अवस्था होईल. त्यापेक्षा सरळ वैद्यकीय तज्ज्ञांना समक्ष भेटा. भले दोन पैसे डॉक्टर घेईल पण मोफत मिळालेला 'एआय'चा सल्ला जास्त घातक आहे.

३) बेकायदेशीर गोष्टी विचारू नका

सोशल अकाऊंट हॅक कसे करावे, ट्रोल कसे करावे, ब्लॅकमेल करण्याच्या आयडिया..... असले प्रश्न कधीच 'एआय'ला विचारू नका. कारण तुमच्या या गोष्टीवर सायबर पोलिसांचीही नजर पडू शकते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

४) आर्थिक नियोजनाबद्दल विचारू नका

कोणत्या शेयर्समध्ये पैसे गुंतवू, सोन्यातली गुंतवणूक चांगली की म्युच्युअल मधील, माझा पगार अमुक आहे तर त्यातले सेव्हिंग किती व कुठं करू ? यासारखे आर्थिक नियोजनाबद्दलचे प्रश्न 'एआय'ला कधीच विचारू नका. कारण त्याच्याकडे असलेली माहिती "कालची" आहे आणि 'एआय' भविष्यात कायु घडू शकेल हे ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक गोष्टीबद्दल 'एआय'पेक्षा जवळचा एखादा अर्थतज्ज्ञ शोधा, त्याचा सल्ला घ्या. कारण त्याच्याकडे इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्हींची सांगड घालून योग्य तो सल्ला देण्याची क्षमता असते जी 'एआय'कडे असेलच असं नाही

५) करियरविषयक प्रश्न विचारू नका.

माझी आताची नोकरी अमुक तमुक आहे तर ती सोडू का ? सोडून कुठली दुसरी पकडू ? कोणत्या फिल्डमध्ये चान्स आहे ? माझे वय अमुक आहे तर लग्न कधी करू ? असले करियर आणि जीवन विषयक प्रश्न 'एआय'ला कधीच विचारू नका. कारण पुन्हा तेच.... 'एआय'कडे असलेली माहिती कालची आहे आणि तुमचा प्रश्न "उद्या" विषयी आहे. त्यामुळे 'एआय'ने दिलेले उत्तर परफेक्ट असेल असं नाही. उलट तुम्ही ते ऐकल्याने गोत्यात याल अथवा नुसतं मत जरी घेतलं तर डोक्याचा गोईंदा करून घ्याल अन जगण्याचा गोंधळ अजून वाढेल. यासाठी कौन्सेलरची भेट घेऊन निरसन करून घेणे बेटर ! कारण एआय कडे माहिती आहे पण भावना नाहीत. आणि तुमचे हे प्रश्न "भावनेशी" संबंधित आहेत. हा फरक समजून घ्या.

डॉ. डीडी क्लास : सहज सुचलेले पाच प्रश्न तुम्हाला इथं सांगितले आहेत. या समकक्ष इतरही असे प्रश्न विचारू नका जेणेकरून तुम्ही तुमच्या नकळत त्याला डेटा देऊन बसताना स्वतः पुढेमागे अडचणीत येणार नाही. एक लक्षात घ्या.

'एआय'कडे माहिती आहे पण तुमच्याकडे शहाणपण आहे. ते जास्त महत्वाचे आहे. ते वापरा.

93 26 36 53 96

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या