श्री विठ्ठल मूर्ती संवर्धन कामाची जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून पाहणी
वृत्त एकसत्ता न्यूज
पंढरपूर, दि. २४ : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व राज्य पुरातत्त्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम सुरू आहे. श्री विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू असून, या कामाची पाहणी आज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केली.
यावेळी मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, शिवाजीराव मोरे, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे डॉ. एस. विनोद कुमार, डॉ. विमल जयस्वाल, निलेश महाजन आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठल मूर्तीची संवर्धन प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने पार पाडण्यात येत आहे. मूर्तीच्या प्राचीन स्वरूपास, पावित्र्यास अथवा धार्मिक परंपरांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन संवर्धनाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्या.
यावेळी श्री विठ्ठल सभा मंडप येथे मंदिर समितीच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते करण्यात आली.
मूर्तीचे लायडर स्कॅनिंग
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मूर्तींचे लायडर स्कॅनिंग करण्यात आले आहे. भविष्यातील संवर्धन प्रक्रियेसाठी हे स्कॅनिंग अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या माध्यमातून मूर्तींची डिजिटल ट्विन तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मूर्तीची झीज होत आहे किंवा नाही, तसेच झीज झाल्यास ती नेमकी कोणत्या भागात झाली आहे, याची शास्त्रीय पद्धतीने माहिती मिळणे शक्य होणार आहे.
मूर्ती हाताळण्याबाबत पुजाऱ्यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. लायडर स्कॅनिंगचा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून १२ दिवसांत सल्लागार समितीला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी विविध गणेश मंडळांना दिल्या भेटी
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज पंढरपूर येथील गणेश सेवा गणेशोत्सव मंडळ, शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ, न्यू छत्रपती संभाजी महाराज मित्र मंडळ व सहकार गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणेशाची मनोभावे आरती केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी सचिन इतापे उपस्थित होते.





0 टिप्पण्या