इस्राइल & अमेरिका इराण युद्धज्वर भारतासाठी कसा असेल?

 इस्राइल & अमेरिका  इराण युद्धज्वर भारतासाठी कसा असेल?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 02/03/2026 :

एक काळ असा होता की, गाव गाड्यांमध्ये ठराविक घरानीच श्रीमंत असायचीत. गावातील ठराविक सावकारांच्याकडे किंवा धनदांडग्या जमीनदारांकडे सुखवस्तू पाहायला मिळत. उदाहरणार्थ मोटरसायकल, चार चाकी गाडी, रंगीत टीव्ही, ऐसपैस टोलेजंग वाडा किंवा बंगला वा इतर सुखभोग वस्तू, या वस्तू गावातील इतर एखाद्या सर्वसामान्य लोकांकडे आल्या किंवा एखाद्या गरीब लोकांकडे आल्या तर स्वतःला उच्चभ्रू समजणारी ही श्रीमंत मंडळी मनातल्या मनात कुडत असायचीत, किंवा याच्या जगण्यात आणि वागण्यात सुधारणा कशी झाली? याने कुठे ढपला मारला की चोरी केली? याची इत्यंभूत माहिती काढायला घरगडी तयारच असायचे. अगदी असाच प्रकार अमेरिका आणि इस्त्राईल हे देश सध्या करू पाहत आहेत. 

     काहीजणांना वाटल आम्ही इराणची बाजू घेत आहोत, परंतु खरी वस्तुस्थिती फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच वरील उदाहरण दिले आहे. कारण ज्यावेळी भारतावर संकट आले त्यावेळी एकूण 54 ते 55 मुस्लिम राष्ट्रांपैकी इराणनेच भारताच्या बाजूने बऱ्याच वेळा साथ दिलेली आहे. त्यामुळे केवळ मुस्लिम राष्ट्र आहे म्हणून आपल्या देशातील काही महाभाग आनंद व्यक्त करत असतील तर ते चुकीचे आहे. याबाबत सर्वात मोठी घडलेली घटना म्हणजे १९९७-९८ साली भारत-पाकिस्तान तणाव फार वाढला होता. त्यावेळी युनो मध्ये याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये बऱ्याच मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानच्या बाजूने मत दिले होते. अगदी काही मुस्लिम राष्ट्रे तटस्थ राहिली होती. परंतु त्यावेळी इराणने भारताच्या बाजूने आपले मत दिले होते. कारण त्यांना भारताची बाजू भक्कम होती आणि ती पटली होती. त्यावेळी देखील हेच आयातुल्ला खामेनी हेच इराणचे सर्वेसर्वा होते. याशिवाय संपूर्ण जगामध्ये तेल उत्पादनामध्ये इराणचा दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशाला देखील इराणकडून तेल खरेदी केले जाते. हे तेल भारतीय रुपयांमध्ये आपणाला खरेदी करून मिळते. इतर सर्व राष्ट्रांच्या बाबतीत आपण देवाण-घेवाण करत असताना डॉलरचा व्यवहार केला जातो. परंतु आपले भारतीय रुपये देऊन तेल देणारा आपला सर्वात जवळचा मित्र म्हणजे इराण. शिवाय हे तेल खरेदी करण्यासाठी 21 दिवसांचे क्रेडिट देखील इराणने दिले आहे. याशिवाय सध्याच्या केंद्र सरकारने इराण बरोबर चाबहार बंदराचा करार करून देशाच्या दळणवळण साधनांमध्ये अतिशय मोठी झेप घेतली आहे. या बंदरावरून दळणवळण, देवाण-घेवाण केल्यामुळे देशाचे बरेच परकीय चलन आणि वेळ वाचणार आहे. याबाबतही इराणने चांगल्या प्रकारे भारता सोबत करार करून संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे मित्राचा शत्रू आहे म्हणून इराण हा आपला शत्रू आहे हे मानने चुकीचे ठरेल. कारण आज भारताचे संबंध इस्राइल बरोबर देखील तितकेच चांगले आहेत म्हणून सर्वच बाबतीत इस्राईल आणि अमेरिका बरोबर आहे हे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण माथेफिरु माणसं काहीही करू शकतात, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ट्रम्प तात्या. सगळ्या जगाला कवेत धरण्याचे व आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे जणू कंत्राटच ट्रम्प तात्यांनी घेतल आहे. म्हणूनच सुरुवातीला मी हे उदाहरण दिले आहे. गावातील धनदांडग्या लोकांना इतर श्रीमंत झालेले अजिबात मनातून बरे वाटत नसते. अशीच अवस्था सध्या अमेरिकेची झालेली आहे. यांना दुसऱ्याचे म्हणून अजिबात बरे वाटत नाही. मनाला येईल तो कर लावायचा, तेही रतन खत्रीच्या अटक्या-मटक्यागत लावायचा. मनाला येईल तो आकडा ठरवायचा आणि तो फेकायचा आणि सर्वांनी तो निमुटपणे सोसायचा.

     बर सध्या इराण आणि इस्रायल व अमेरिका यांचे भांडण का? तर इराणने अण्वस्त्र नष्ट करावीत, यांनी मात्र ती वाढवावीत. म्हणजे हळूहळू सर्व जगातील गरीब राष्ट्रांनी काय शस्त्रे ठेवायची? किंवा किती सैन्य ठेवायचे? हे केवळ ट्रम्प तात्यास ठरवणार. हे म्हणजे "रोगापेक्षा इलाज भयंकर" अण्वस्त्रे नष्ट करायचीच असतील तर सगळ्या जागानेच नष्ट करायला हवीत. शेवटी  स्व-संरक्षणासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने हत्यारे पाळत असतो. एखादा तलवार घेऊन मारायला आला आणि समोरच्याच्या हातात लहान चाकू जरी असला तरी तो तलवार मोठी असून देखील घाबरत असतो. कारण त्याला वाटते की तलवारीचा वार चुकला तर याचा लहान चाकूच माझा घात करेल. म्हणून तो भीत असतो. इस्राईलची मोसाद संघटना काही बाबतीत फारच काम चांगले करते. परंतु सूड उगवण्यासाठी देखील या संघटनेचे काम कसे आहे हे पाहायचे असेल तर डाॕ. आशा भागवत यांनी अनुवादित केलेले, मार्क इ. वर्गो यांचे मोसाद हे पुस्तक वाचावे.

     व्हेनेझुएला या देशाबरोबर देखील अशीच तंबी करून अमेरिका सध्या वागत आहे. कारण व्हेनेझुएला या देशाकडे जगातील सर्वात जास्त तेलाच्या खाणी आहेत. म्हणजे हळूहळू जगभर ते आपले हातपाय पसरायला लागले आहेत. शेजारच्या घराला आग लागली किंवा शेजारच्या घरावर जप्ती आली म्हणून आनंद वाटून घेणारे मूर्ख असतात. कारण याची झळ आपणालाही शेजारी म्हणून सोसावी लागत असते. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. 

     खामेणी यांचे काही निर्णय वादग्रस्त नक्कीच आहेत. परंतु ते त्यांच्या देशातील लोकांसाठी होते. याचा आपल्याशी किंवा जगातील इतर देशांशी काही संबंध नव्हता. याचा अर्थ सुधारणा करू नयेत असे अजिबात नाही. तरीही जागतिक घडामोडी पाहता आपणाला अतिशय व्यापारी दृष्ट्या जवळचा असा इराण हा आपला मित्र आहे. आणि या देशावर ज्यावेळी अमेरिका कब्जा करेल, त्यावेळी ते आपल्यासाठी सुद्धा आर्थिक दृष्ट्या परवडणारे असणार नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, प्रत्येक गोष्टीत जात-पात पाहून आपले मत ठरवू नका.

     शेवटी आपल्याकडे असणारी एक म्हणच खरी ठरली --- 

बळी तो कान पिळी परंतु एक दिवस आपल्यावर पण येईल ती पाळी आणि मग सारं काही आठवल त्यावेळी.

शिवाजी माने, अध्यक्ष,

   जय शिवराय किसान संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या