सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल बाटली, कॅन/ड्रममध्ये देण्यास बंदी; शेतकऱ्यांची अडचण वाढली
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पेट्रोल व डिझेल कॅन, ड्रम किंवा बाटलीमध्ये देण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा गैरवापर टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली असली, तरी या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडे वापरात असलेली स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर तसेच डिझेल जनरेटर ही यंत्रे शेतातच असतात. त्यामुळे शेतकरी नेहमीप्रमाणे कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल घेऊन जातात. मात्र नव्या आदेशामुळे त्यांना १० ते १५ किमी दूर असलेल्या पेट्रोल पंपावर यंत्रे घेऊन जाणे भाग पडत असून, त्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आदेशाची प्रत सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडे शेतकऱ्यांसाठी सवलतीचा किंवा पर्यायी मार्ग काढण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना अडचण न होता सुरक्षेचे भान राखणारा तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने सर्व पेट्रोल पंप चालकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
======================
0 टिप्पण्या