❝ मुर्खाशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्या गालावरील डास मारण्यासारखं ❞

 ❝ मुर्खाशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्या गालावरील डास मारण्यासारखं ❞ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 16/03/2026 :

❝ मुर्खाशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्या गालावरील डास मारण्यासारखं; डास मरेल की नाही माहीत नाही, पण आपल्याला थप्पड मात्र नक्की बसते.” ❞ “मुर्खाशी तर्क करणं म्हणजे वाऱ्याशी कुस्ती करण्यासारखं; घाम तुमचाच येतो, पण विजय कोणाचाच होत नाही.

            अज्ञानाला तर्काची भाषा कळत नाही; म्हणून मुर्खाशी वाद म्हणजे विवेकाचा अपव्यय ठरतो.

                   कधी कधी जीवनात आपण अशा परिस्थितीत अडकतो की, समोरचा माणूस सत्य ऐकायला तयार नसतो; पण आपल्याला मात्र आपलं म्हणणं सिद्ध करायची आग असते. तेव्हा मला एक बाब आठवते आहे —

                    “वाद बहुतेक वेळा सत्यासाठी नव्हे; तर अहंकाराच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पेट घेतो.”

           जिथे अहंकाराची ठिणगी पडते, तिथे संवादाचा दीप विझून वादाची ज्वाला भडकते.

            अहंकाराला तर्काची गरज नसते; तो स्वतःच वादाच्या अग्नीला हवा देत राहतो.

           एक लक्षात घ्या, सत्य शांत असतं; वाद मात्र तेव्हाच पेटतो जेव्हा अहंकार बोलू लागतो.

             केव्हाही  वादाची पहिली ठिणगी शब्दांत नसते, ती माणसाच्या अहंकारात दडलेली असते.

            समजुन घेण्याची कुवत जिथे कमी होते, तिथे अहंकाराची ठिणगी वादाचं वणवा बनते.

                 या साध्या दिसणाऱ्या वाक्यात जीवनाचं एक खोल तत्त्वज्ञान दडलेलं आहे.

        कारण वाद हा नेहमी बुद्धीचा खेळ नसतो; अनेकदा तो अहंकाराचा रणांगण बनतो. 

 आणि जिथे विवेक नसतो, तिथे विजय कोणाचाच होत नाही

 — नुकसान मात्र दोघांचं होतं.

वादाची सुरुवात   

   — अहंकाराची ठिणगी वादाचा उगम बहुतेक वेळा सत्यासाठी नसतो; तो अहंकारासाठी असतो.    

    आपलं म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण तर्क, उदाहरणं, अनुभव सगळं मांडतो. पण समोरचा जर समजून घेण्याच्या वृत्तीने ऐकत नसेल, तर त्या सर्व तर्कांचा अर्थ शून्य ठरतो.

म्हणतात ना —

    “जिथे विवेक झोपतो, तिथे वाद जागा होतो.” मुर्ख माणूस विचाराने नव्हे तर हट्टाने होतो. त्याच्यासाठी संवाद हा ज्ञानाचा पूल नसतो; तो केवळ स्वतःच्या मतांचा किल्ला असतो. अशा किल्ल्यावर तर्काची तोफ चालवली तरी भिंत कोसळत नाही.

“जिथे समजुतीचा प्रकाश नसतो, तिथे वादाचा अंधार आपोआप दाटतो.” वाद शब्दांमुळे निर्माण होत नाही; तो समजुतीच्या अभावातून जन्म घेतो. जिथे मन ऐकायला तयार नसतं, तिथे प्रत्येक संवाद वादात बदलतो.

समजुतीची दारे बंद झाली की, तर्काचे शब्दही भिंतीवर आदळून परत येतात.

              समज नसलेलं मन वाद निर्माण करतं; समज असलेलं मन  संवाद निर्माण करतं.वादाचा खरा उगम मतभेदात नसतो; तो एकमेकांना समजून न घेण्याच्या वृत्तीत असतो.

         समोरचा माणूस जर विचार करण्याची क्षमता किंवा तयारी ठेवत नसेल, तर संवादाचा मार्ग बंद होतो. तेव्हा वादाचा परिणाम काय होतो? राग वाढतो, नाती तुटतात आणि मनात कटुतेची राख साचते.

 ज्ञान नसलेला स्वभावातील हट्ट म्हणजे अंधारात केलेला आरडाओरडा. ज्याला ऐकायचंच नाही त्याला सांगण्यात अर्थ नसतो. कारण शब्द तेव्हाच परिणाम करतात जेव्हा मनाचे दरवाजे उघडे असतात. शहाणपण म्हणजे कधी बोलावं आणि कधी शांत राहावं.

शहाणपणाचं खरं मोजमाप म्हणजे वाद जिंकणं नाही; तर योग्य वेळी शांत राहणं होय. काही वेळा मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं.

म्हणतात —

“मौन हा शहाणपणाचा सर्वात सुंदर अलंकार आहे.”

कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण नसतं; काही गोष्टींना उत्तर न देणं हेच उच्च बुद्धिमत्तेचं लक्षण असतं. जिथे समजूत नाही, तिथे शांतता हीच प्रतिष्ठेची ढाल असते.

वादाचे परिणाम

  — ऊर्जा वाया जाण्याचा मार्ग

मुर्खाशी वाद घालताना आपण आपली मानसिक ऊर्जा खर्च करतो. वेळ जातो, मन थकते आणि शेवटी मिळतं ते केवळ असंतोष.

एक विचारप्रवर्तक वाक्य तुम्हाला सांगतो आहे. “शहाणा माणूस वाद टाळतो; मुर्ख माणूस वाद उकरून काढतो.”

जीवनात प्रगती करायची असेल तर ऊर्जा वादात नव्हे, तर विचारात गुंतवली पाहिजे. कारण वादातून विजय मिळत नाही; पण शांततेतून प्रतिष्ठा मिळते.

समाधानाचा मार्ग — “विवेक दिशा दाखवतो आणि संयम पावलं सांभाळतो;

या दोघांच्या संगतीतच समाधानाचा मार्ग सापडतो. 

  या सर्व परिस्थितीवर उपाय काय?

उत्तर अगदी सोपं आहे

 — विवेक आणि संयम.

संयम म्हणजे भीती नव्हे; तो स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव असते. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही, तोच खऱ्या अर्थाने स्वतःवर नियंत्रण ठेवतो.

“प्रत्येक युद्ध जिंकणं शौर्य नसतं; काही युद्ध टाळणं हेच मोठं शौर्य असतं.”

  समज नसलेल्या कानांपर्यंत सत्य पोहोचत नाही.

जिथे विचार थांबतो, तिथे वाद सुरू होतो.

शांत राहणं म्हणजे हार नव्हे; ती आत्मसन्मानाची ताकद असते. ज्याला स्वतःचं अज्ञान कळतं, तोच खरा ज्ञानी होण्याच्या मार्गावर असतो.

निष्कर्ष — जीवनात प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो असं नाही. पण हे नक्की आहे की प्रत्येक वाद आवश्यकही नसतो.     काही गोष्टी वेळेवर सोडून दिल्या तर मन हलकं राहतं आणि नातीही टिकून राहतात. म्हणूनच स्वतःला एक शांत प्रश्न विचारायला हवा —

  मी वाद जिंकण्यासाठी बोलतोय का, की सत्य समजून घेण्यासाठी?

जर हा प्रश्न मनापासून विचारला, तर अनेक निरर्थक वाद आपोआप थांबतील.

आणि शेवटी एक लक्षात ठेवण्यासारखी ओळ —

 “शहाणपण म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं नव्हे; तर कोणत्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं हे ओळखणं होय.” 

✍️ बिरादार किसन एन.

सेवानिवृत्त प्राचार्य,

वैभव नगर, लातूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या