जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी
" सन डे , वन डे " माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/03/2026 :
दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या देशपातळीवरील सुमारे अडीच हजार किलोमीटर सायकल वारीचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सायकल रायडर्स असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून यंदा प्रथमच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ५ एप्रिल रोजी "सन डे, वन डे" या सुमारे ७५ किलोमीटरच्या एकदिवसीय माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.
भिसे म्हणाले , संत नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या महाराष्ट्र , गुजरात, राजस्थान , हरियाणा , पंजाब या पाच राज्यातून जाणाऱ्या सुमारे अडीच हजार किलोमीटर सायकल वारीचे आम्ही दरवर्षी यशस्वी आयोजन करतो . या २५ दिवसांच्या सायकल वारीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सायकल रायडर्स सहभागी होतात . या सायकल वारीच्या माध्यमातून "शांती , समता व बंधुता " या संत विचारांचा प्रचार व प्रसार तसेच समाजामध्ये सायकल विषयी आवड निर्माण व्हावी , आरोग्य तंदुरुस्त रहावे याविषयी
" आरोग्य , पर्यावरण व प्रबोधन " या विषयावर जनजागृती करण्याचे काम गेली चार वर्षे ही संघटना करीत आहे .
यंदा जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवार दि. ५ एप्रिल रोजी " सन डे, वन डे" या अकलूज ते अकलूज सुमारे ७५ किलोमीटरच्या माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून मान्यवरांच्या हस्ते सायकल राईडचा शुभारंभ होईल. माळीनगर , २५/४ , महाळुंग , श्रीपूर , बोरगाव , माळखांबी, बोंडले, वेळापूर , खुडूस , माळशिरस , संग्रामनगर मार्गे ही सायकल राईड सायंकाळी ४ वाजता अकलूज क्रीडा संकुल येथे पोहोचेल . येथे मान्यवरांच्या हस्ते सायकल रायडर्सना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सायकल रायडर्स सतीश जाधव ( मुंबई) यांचे " सायकल काळाची गरज" या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायकल रायडर्सना प्रवासात चहा , नाश्ता व भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. या एकदिवसीय सायकल राईड मध्ये १८ वर्षापुढील महिला व पुरुषांना सहभागी करुन घेतले जाणार आहे . सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सायकल रायडर्सनी २९ मार्च पूर्वी ९८२२०२३५६४ या मोबाईल क्रमांकावर आपली नाव नोंदणी करावी असे भिसे म्हणाले.

0 टिप्पण्या