घाम कसा तयार होतो? उग्र वास कोणत्या आजाराचा संकेत देतो? डॉ रैनांनी सांगितले झाकलेले भाग साफ व फ्रेश ठेवायला उपाय
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/03/2026 :
उन्हाळ्यात घाम येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही लोकांच्या शरीराला जास्त दुर्गंधी का येते हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. घाम स्वतः गंधहीन असतो, पण त्वचेवरील बॅक्टेरियांसोबत त्याची रासायनिक क्रिया झाल्यावर वास निर्माण होतो. उष्ण हवामान, स्वच्छतेचा अभाव, हार्मोन्स आणि काही आजारही यामागे कारणीभूत असू शकतात. योग्य काळजी घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रित करता येते. पण कधी कधी घामाचा उग्र वास येण्यामागे एखादी आरोग्याची समस्याही कारणीभूत असू शकते म्हणूनच वेळीच डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
उन्हाळ्याच्या दिवसांत घामामुळे येणारी दुर्गंधी ही केवळ सौंदर्याची समस्या नसून ती आपल्या शरीराच्या आरोग्याशी निगडित आहे. माझ्याकडे येणारे अनेक रुग्ण विचारतात, "डॉक्टर, घाम तर सर्वांनाच येतो, मग काही लोकांच्या शरीराचा वास इतका उग्र का असतो?" एक त्वचाविकार तज्ज्ञ म्हणून मला सांगावेसे वाटते की, घाम स्वतःहून कधीच दुर्गंधीयुक्त नसतो; त्यामागे एक विशिष्ट जीवशास्त्रीय प्रक्रिया असते. तुमच्या शरीराची दुर्गंधी (Body Odour), त्यामागची कारणे आणि घ्यायची काळजी याबद्दल जाणून घेऊया.
घामाचा वास नक्की येतो कुठून?
आपल्या शरीरावर दोन प्रकारच्या घामाच्या ग्रंथी असतात. त्यापैकी काखेतील 'अपोक्राइन' (Apocrine) ग्रंथींतून निघणारा घाम सुरुवातीला पूर्णपणे गंधहीन असतो. मात्र, जेव्हा हा घाम आपल्या त्वचेवरील सूक्ष्मजीवांच्या (Micro-organisms) संपर्कात येतो, तेव्हा खरी प्रक्रिया सुरू होते. आपल्या त्वचेवर असलेले 'कोरीनेबॅक्टेरिया' (Corynebacteria) आणि 'स्टॅफिलोकोकाय' (Staphylococci) हे बॅकटेरिया घामातील प्रथिनांचे विघटन करतात. या रासायनिक प्रक्रियेतून जो वायू बाहेर पडतो, त्यालाच आपण 'शरीराची दुर्गंधी' म्हणतो.
*भारतीय हवामान आणि बॅक्टेरिया
भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे आपल्याला जास्त घाम येतो. दमट हवेत घाम लवकर सुकत नाही, ज्यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो. हा ओलावा जिवाणूंच्या वाढीसाठी पोषक असतो. जेवढा जास्त घाम आणि ओलावा, तेवढी या जिवाणूंची सक्रियता वाढते आणि दुर्गंधी अधिक प्रखर होते. त्यामुळे अशा वातावरणात केवळ डियोड्रंट वापरणै पुरेसे नसते तर त्वचेची मुळापासून स्वच्छता राखणे गरजेचे असते.
*अति घामाची (Hyperhidrosis) विविध कारणे
नेहमीपेक्षा जास्त घाम येण्यामागे केवळ उष्णता हेच कारण नसते. आपली मानसिक स्थिती आणि शारीरिक आरोग्य यांचाही त्यावर मोठा परिणाम होतो.
*मानसिक ताण: भीती, ताण किंवा भावनिक प्रतिसादामुळे घाम वाढतो.
*हार्मोनल बदल:* रजोनिवृत्ती (Menopause) किंवा पौगंडावस्थेतील बदलांमुळे घाम येऊ शकतो.
*वैद्यकीय परिस्थिती:
हायपरथायराॅईडीझम (थायरॉईडची अति सक्रियता), मधुमेह (Diabetes) किंवा काही विशिष्ट औषधे (उदा. ॲंटी-डिप्रेसंट्स) यामुळे अचानक किंवा सतत घाम येण्याचे प्रमाण वाढू शकते. जर तुम्हाला अचानक जास्त घाम येऊ लागला असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
*शरीराची दुर्गंधी : चेतावणीचा संकेत
जरी शरीराची दुर्गंधी धोकादायक नसली, तरी ती तुमच्या अंतर्गत आरोग्याबद्दल काही संकेत देऊ शकते. तुमच्या घामाच्या पॅटर्नवर लक्ष ठेवणे हा सेल्फ केअरचा एक भाग आहे.जर तुमच्या घामाला अचानक खूप वेगळा किंवा उग्र वास येऊ लागला असेल, तर ते शरीरातील संसर्ग किंवा चयापचय क्रियेतील बिघाडाचे लक्षण असू शकते. गंभीर किंवा शरीराच्या ठराविक भागातच (उदा. फक्त हाताचे तळवे किंवा पाय) जास्त घाम येत असेल, तर त्वरित डर्मेटीलाॅजिस्टचा सल्ला घ्यावा.
स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय
दुर्गंधी टाळण्यासाठी महागड्या परफ्यूमपेक्षा स्वच्छतेच्या साध्या सवयी जास्त प्रभावी ठरतात.
*रोजची आंघोळ: दिवसातून किमान एकदा आणि शक्य असल्यास दोनदा अंघोळ करा.
त्वचा कोरडी ठेवा: आंघोळीनंतर शरीर विशेषतः काख आणि जांघ असे सतत झाकलेले भाग नीट कोरडे करा. ओलावा राहिल्यास बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते.
कपड्यांची निवड: घामाने भिजलेले कपडे त्वरित बदला. सुती आणि सैल कपड्यांचा वापर करा, ज्यामुळे हवा खेळती राहील आणि घाम लवकर सुकेल.
तज्ज्ञांचे उपचार: जर स्वच्छता राखूनही दुर्गंधी कमी होत नसेल, तर मेडिकल ग्रेड ॲंटी परस्पिरंट्स किंवा इतर प्रगत उपचारांसाठी तज्ज्ञांची मदत घ्या.
घामाचा वास लपवण्यासाठी डियोड्रंटचा मारा करण्यापेक्षा, तो वास निर्माण करणाऱ्या जिवाणूंना रोखण्यावर भर द्या. तुमच्या शरीराचे आरोग्य तुमच्या स्वच्छतेच्या सवयींमध्ये दडलेले आहे. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्यातून येणारी दुर्गंधी ही मुख्यतः जिवाणूंमुळे निर्माण होते. त्यामुळे केवळ सुगंधी उत्पादने वापरण्यापेक्षा त्वचेची स्वच्छता आणि योग्य सवयी अंगीकारणे अधिक महत्त्वाचे आहे. जर दुर्गंधी किंवा घामाचे प्रमाण अचानक वाढले असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य काळजी घेतल्यास ही समस्या सहज नियंत्रित करता येते.
सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स.काॅम
संकलन : यशवंत वाघ

0 टिप्पण्या