महिला दिनाच्या निमित्ताने.....✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/03/2026 :
आपण आपल्या मतांवर, विचारांवर ठाम असायला हवं हे बरोबर आहे परंतु काही वेळा परिस्थिती अशी येते की आपल्याला एखाद्या गोष्टी च्या दोन्ही विरुद्ध बाजूंशी सहमत व्हायला होतं. कधी एखाद्या गोष्टीची एक बाजू पटते तर कधी ह्याच्या अगदी विरुद्ध बाजू पण खरी वाटायला लागते. अगदी दोलायमान अवस्था होते कधीकधी.
उद्या महिला दिन असल्याने ह्या विषयाचे विचार मनात फेर धरू लागलेत. एकदा वाटत महिला दिन साजरा करणं म्हणजे पोळा ह्या सणासारखं आहे. एक दिवस साजरा करायचा आणि बाकीचे 364 दिवस मात्र........
दुसऱ्या बाजूने विचार केला तर वाटतं हा दिवस म्हणजे स्त्रियांचा सन्मान, स्त्री विषयी आदर, स्त्री च्या कार्यक्षमतेवर विश्वास, असच अजून ही बरंच काही.......
कधी कधी मनात प्रश्न पडतो स्त्री ही खरंच स्वतंत्र झाली का ? की ही स्वतंत्रता एक निव्वळ भास, जणू मृगजळच.
मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त एका ग्रुप वर चर्चासत्र होत. विषय होता "घराबाहेर पडून अर्थार्जन करणे ही काळाची खरी गरज की काळाची गरज खरंच ???
आजच्या धकाधकीच्या काळात, महागाई च्या काळात संसार रुपी रथाचे दोन्ही चाके पतीपत्नी असतात ही पक्की मनाशी खूणगाठ बांधत स्त्रिया हसतमुखाने मनापासून त्याचा निम्मा भार अर्थातच अर्थाजनासकट स्वतःच्या खांद्यावर घेतात. परंतु असे करता करता त्या रथाचा संपूर्ण भार त्या स्त्रीवर कसा व केव्हा लादला जातो हे तिचे तिलासुध्दा कळत नाही.
आजच्या काळाची गरज म्हणून आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी तडजोड म्हणून तिच्या अर्थाजनाला माझा अजिबातच विरोध नाही , पाठींबाच आहे परंतु घराचा उंबरा ओलांडून घर दुसर्याच्या भरवशावर सोडून बाहेर जाऊन अर्थाजन करण्याच्या निर्णयाबाबत माझी मत थोडी दोलायमान आहेत. जर आपल्या घरात घराकडे, मुलांकडे लक्ष देणारी हक्काची, प्रेमाची, घरचीच व्यक्ती असली तर गोष्ट निराळी. आपल्या घराकडे, मुलांकडे स्वतःच्या आवडीने लक्ष देण्याची घरच्या वडीलधाऱ्या व्यक्तींची आनंदाने तयारी असली तर मात्र गृहिणी निर्धास्तपणे अर्थार्जनाला बाहेर पडू शकते. अन्यथा घार आकाशी आणि लक्ष घरट्यातील पिल्लांपाशी अशी कुतरओढ त्या नोकरदार महिलेची होते.
मला मान्य आहे पैशाचे काम पैसाच करतो पण प्रसंगी कोंड्याचा मांडा करण्याची शक्ती बाईमध्ये उपजतच असते पण घराचा समतोल बिघडला तर सगळच बिघडतं.
मला प्रश्न पडतो की बक्कळ पैसा कमवून मुलांना वेगवेगळ्या सुविधा पुरविणारी ती आई सुखी की त्या सुविधांचा उपभोग घेतानाचा त्या चेहर्यावरील आनंद बघण्यास मुकणारी ती आई दुःखी
मुलानी बाळसे धरावे म्हणून नोकरी करून काजू खाऊ घालणारी आई सुखी की गरमागरम साधा वरणभात स्वतःच्या हाताने भरवणारी ती आई सुखी?
खरोखरच मनात प्रश्नांप्रश्नांचा हलकल्लोळ उठतो. आणि काही गोष्टींची ठाम उत्तरच मिळतं नाही अथवा अशा समस्येवर परफेक्ट सोल्युशन पण मिळत नाही.
कल्याणी बापट(केळकर)
9604947256 बडनेरा अमरावती
0 टिप्पण्या