यालाच "सत्यमेव जयते्" म्हणायचे का?

 यालाच "सत्यमेव जयते्" म्हणायचे का?

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 28/02/2026 :

सत्याचा नेहमीच विजय होतो असे म्हटले जाते. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजीत नही. हे जरी खरे असले तरी सध्या खोट्याने संपूर्ण भारत देश व्यापला आहे. याला एकमेव कारण म्हणजे केंद्रात बसलेली भारतीय जनता पार्टी. नुकतेच न्यायालयाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली. जो घोटाळा कधी झालाच नाही, या घोटाळ्याचा एकही पुरावा नसताना लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अरविंद केजरीवाल विद्यमान मुख्यमंत्री असताना त्यांना सहा महिने जेल मध्ये टाकले. त्यांच्या मंत्र्यांना, नेत्यांना जेल मध्ये टाकले. त्यांची सत्ता दिल्लीतून उखडून टाकली. अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला बदनाम करुन टाकले. जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. दिल्लीची सत्ताही भारतीय जनता पक्षाने हस्तगत केली. पण शेवटी सत्याचा विजय होऊन अरविंद केजरीवाल सहीसलामत निर्दोष बाहेर आले.

    इथे सत्याचा विजय झाला, पण केजरीवाल आणि पक्षाच्या वाट्याला मानहानी आली, त्यांची बदनामी झाली, सहा महिने विनाकारण कारावास भोगावा लागला, सत्ता गेली, मानसिक खच्चीकरण झाले. मग याला जबाबदार कोण? न्यायालयाने जर केजरीवालांची निर्दोष मुक्तता केली तर मग त्यांच्यावर खोटी केस करणाऱ्या पोलिसांवर, ईडीच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली का? अशाच प्रकारे महाराष्ट्रात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तत्कालीन विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर अनेकांवर खोट्या केसेस करुन त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले, हे सर्वजण नंतर निर्दोष मुक्त झाले. न्यायालयाने अधिकाऱ्यांची फक्त कानउघाडणी केली. अशा निर्लज्ज अधिकाऱ्यांना आणि त्यांनी कोणाच्या दबावाखाली ही कारवाई केली अशा लोकांची नावे वदवून घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांवर "थर्ड डिग्री" अथवा त्याहीपेक्षा भयंकर यंत्रणेचा वापर करुन त्या सर्वांवर कडक कारवाई केली तरच यापुढे कोणताही शासकीय अधिकारी खोटी कामे आणि खोटी कारवाई करण्याची हिंमत करणार नाही. 

    अरविंद केजरीवाल सारख्या ईमानदार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल केले. सरकारी शाळा अत्याधुनिक केल्या. गरीबांची मुले शिकू लागली. भारताची पुढची पिढी घडविण्यासाठी मोठे ऐतिहासिक पाऊल उचलले. मोहल्ला क्लिनिक सुरु करुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली. दिल्लीकरांना विज मोफत दिली. महिलांना सरकारी बस मोफत केली. जनतेच्या भल्याच्या बऱ्याच योजना कागदावरुन प्रत्यक्षात जमिनीवर उतरविण्याची तयारी सुरु केली होती. भविष्यात अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला पराजित करणे शक्य होणार नाही, शिवाय ही लाट देशभरात येईल म्हणून यांना संपविण्याचा घाट केंद्र सरकारने घालून बनावट मद्य घोटाळा उभा करुन दिल्लीतून त्यांची सत्ता उलथून टाकली. अरविंद केजरीवाल जरी निर्दोष सुटले तरी त्यांचा हा सत्याचा विजय म्हणता येईल का? एखाद्याला संपुर्ण उध्वस्त केल्यावर त्याचा गेलेला वेळ, त्याला झालेल्या यातना भरुन निघतील का? सत्याचा विजय तेंव्हाच होईल जेंव्हा जेल मध्ये टाकण्यासाठी विनाकारण बनाव करणा-या लोकांना कडक शासन होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने "सत्यमेव जयते्" बोलता येईल. अन्यथा सत्याचा विजय अशाच प्रकारे सर्व उध्वस्त झाल्यावरच होईल! ✍️

महेंद्र कुंभारे,

संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.

मो.नं. 8007741356

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या