लागला रंग भजनाचा !

 

लागला रंग भजनाचा !

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे, 

अकलूज दिनांक 13/02/2026 : या भजनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ईश्वराप्रती असलेले समर्पण, भक्तीची पराकाष्ठा आणि देवाच्या सहजावस्थेचे वर्णन केले आहे. जेव्हा भजनाचा रंग जमतो तेव्हा वातावरणात सात्विकता निर्माण होते. देवाचे सगुण रुप हे भक्तीचा मार्ग सोपा करते. जेथे प्रेमाचा भाव आहे तेथे देव लक्ष्मीसहीत वास करतो. असे सुख मिळण्यासाठी देव आतुर असतो.

लागला रंग भजनाचा |

डोलला देव आमुचा ||धृ.||

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना असे वाटते की, भक्तीच्या रंगात किंवा ईश्वराच्या भक्तीत इतके तल्लीन व्हावे की, ईश्वरालाही (देवाला) भक्तांच्या भावनेवर नाचावे लागेल. भक्ताची निष्ठा पाहून देव प्रसन्न होऊन भक्तीच्या तालावर नाचतो. भक्ताला मनापासून अहंकार विसरुन भजन करावे लागते. तेव्हा देव प्रत्यक्ष भक्तात वास करतो आणि आनंदाने डोलू लागतो. खरी भक्ती ही भावावर अवलंबून असते. बाह्य देखाव्यावर नाही. आपण जेव्हा भजनात रंगून जातो तेव्हा देव स्वतःचे देवपण विसरुन भक्तासोबत एकरुप होतो.

या बघा बघा रे कुणी, नाचतो देव रंगणी |

ना पारचि आनंदाचा, डोलला देव आमुचा ||1||

 राष्ट्रसंत म्हणतात, कुणीतरी येऊन बघा. ईश्वर रंगमंचावर नाचत आहे. हे जगच देवाचा रंगमंच आहे आणि त्यामध्ये सर्व सजीव प्राणी, पक्षी, फुलझाडे, निसर्ग हे देवाच्या रुपानेच आनंदाने नाचत  आहे. भक्ताचा आनंद इतका अफाट आणि उत्कंठ झाला आहे की, त्याला कशाचीच मर्यादा राहिलेली नाही. आनंदाला कोणताही अंत किंवा मर्यादा नाही कारण तो अथांग आहे. अंतर्यामीचा देव म्हणजेच आत्मा किंवा परमात्मा अत्यंत प्रसन्न होऊन आनंदाने डोलत आहे.

नेसला पितांबर कटी, भाळास दिसे मळवटी |

चमकतो हिरा मुकुटाचा, डोलला देव आमुचा ||2||

           वरील ओळीत श्री विठ्ठल (पांडुरंगाच्या) मनोहर रुपाचे वर्णन राष्ट्रसंतानी केले आहे. देवाने कमरेला पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केले आहे. कपाळावर मळवट (गंधाचा टिळा) लावला आहे. डोक्यावरच्या मुकुटात हिरा चमकत आहे, तो तेजस्वी दिसत आहे. हे देवाच्या अत्यंत सगुण आणि सुंदर रुपाचे वर्णन राष्ट्रसंतानी केले आहे. ते रुप भक्तांना मोहित करते. देवाचे सगुण रुप आपण राम, कृष्ण, विष्णू यामध्ये पाहत असतो. असा आमचा देव भक्तासाठी नाचत आहे, डोलत आहे.

तल्लीन होऊनी भला, हा देवपणा विसरला |

समजुनी भाव तुकड्याचा, डोलला देव आमुचा ||3||

भक्त जेव्हा अंत:करणा पासून भक्ती करतो, तेव्हा देव इतका प्रसन्न होतो की, तो स्वतःचे मोठेपण, पावित्र किंवा देव असण्याचा अहंकार विसरून सामान्य भक्तासारखा होतो. देव केवळ भक्ताच्या हाकेला धावून येतो असे नाही तर भक्तांच्या घरची चाकरी, संरक्षण आणि त्याच्या योगक्षेमाची जबाबदारी स्वतः घेतो. उदाः- संत एकनाथाचे घरी श्रीखंड्याचे रुप घेऊन कावडीने पाणी वाहिले. संत जनाबाईचे दळणकांडण करु लागले. संत चोखोबाचे ढोरे ओढू लागले. विदुराच्या घरच्या पातळ कण्या देवाने खाल्ल्या. म्हणून देवाची भक्ती अशी असावी की, देवच आपल्या घरी यावा. भक्ताची निस्वार्थ भक्ती देवाला भान हरपायला लावते. "ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला |" भक्ताच्या प्रेमापोटी विठ्ठलाने स्वतःचे वैकुंठ धाम विसरुन संत आणि भक्तांच्या हृदयात किंवा त्यांच्या घरी राहणे पसंत केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भक्तीतील निखळ भाव देवाला समजावला. या प्रेमापोटी देव सुखावून डोलू लागला. भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे, रुप नाही. खरा भाव असेल तर देव भक्ताच्या आधाराने राहतो आणि भक्ताच्या भक्तीवर खूश होऊन डोलू लागतो.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9921791677

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या