🔰 सहकार महर्षिंच्या कार्यस्मृतींना उजाळा; सदाशिवराव माने विद्यालयात ४७ वी पुण्यतिथी व ‘शेतशिवार’ अंकाचे प्रकाशन

 

🔰 सहकार महर्षिंच्या कार्यस्मृतींना उजाळा; सदाशिवराव माने विद्यालयात ४७ वी पुण्यतिथी व ‘शेतशिवार’ अंकाचे प्रकाशन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे

अकलूज. दिनांक 11/02/2026 :

माळशिरस तालुक्याच्या उजाड माळरानावर विकासाचे नंदनवन फुलविणारे, गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी समृद्धीची गंगा आणणारे विकासपुरुष व शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील (काकासाहेब) यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील सदाशिवराव माने विद्यालयात अभिवादनपर कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. याच वेळी विद्यालयाच्या ‘शेतशिवार’ या वार्षिक अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे ज्येष्ठ संचालक सुभाष दळवी होते. त्यांच्या हस्ते ‘शेतशिवार’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी प्रास्ताविकात सहकार महर्षिंच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व अथक परिश्रमातून कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यात शिक्षणक्रांती, धवल क्रांती आणि औद्योगिक क्रांती घडवून आणली, असे त्यांनी नमूद केले. सहकाराच्या बळावर ग्रामीण भागात समृद्धी निर्माण करणारे असे थोर व्यक्तिमत्त्व तालुक्याला लाभणे हे खऱ्या अर्थाने भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.


यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षिंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘महर्षि गीत’ सादर करून कृतज्ञतापूर्वक शब्दसुमनांजली अर्पण करण्यात आली.

विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. प्राजक्ता लोंढे व कु. समृद्धी सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून काकासाहेबांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, जिद्द आणि कार्याची माहिती मांडली.

यावेळी जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धा तसेच विद्यालयातील वक्तृत्व व निबंध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘शेतशिवार’ या वार्षिक अंकासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे सुभाष दळवी यांनी आपल्या  भाषणात काकासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक तसेच कलाक्षेत्रातील कार्याचा सखोल ऊहापोह केला. त्यांच्या सहवासातील विविध आठवणींना उजाळा देत त्यांनी सहकार महर्षींच्या पुण्यस्मरणातून विद्यार्थ्यांमध्ये आदर्श, परिश्रमशीलता व समाजाभिमुखतेचे संस्कार रुजावेत, हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचा प्रेरणादायी संदेश दिला. भाषणाच्या शेवटी त्यांनी काकासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित स्वरचित चारोळी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

या कार्यक्रमास माता-पालक संघाच्या रुपाली दबडे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकुळे, कल्पना मोरे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिला धाइंजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र धोत्रे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘सारे जहाँ से अच्छा’ या देशभक्तीपर गीताने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या