ऊस आंदोलनातील ३ गुन्ह्यातून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 16/02/2026 : इंदापूर येथे २०१२ साली झालेल्या ऊस आंदोलनात एकुण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज या ८ गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यातून राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतिश काकडे, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली .
२०१२ साली आम्ही ऊस आंदोलनात २७०० रूपये पहिली उचलीची मागणी केलेली होती. राज्यातील साखर कारखानदार कोणीच दर जाहीर केले नव्हते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले होते.
सोलापूर- पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी या आंदोलनात शहीद झाला . यानंतर शेकडो शेतक-यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
जवळपास आठवडाभर झालेल्या आंदोलनातील संघर्षानंतर २५०० रूपये राजारामबापू कारखान्याने पहिली उचल जाहीर केली व उसदराची कोंडी फुटली. मात्र राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या आंदोलनाने प्रतिटन ३०० रूपये जादा दर मिळाला.
इंदापूर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एच.फारूकी यांचे कोर्टात या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज ॲड. एन. जे. शहा ,ॲड. महेश ढुके , ॲड. श्रीकांत करे यांनी विनामुल्य पाहिले.

0 टिप्पण्या