घरच्या घरी मातीशिवाय हिरव्या चाऱ्याचे उत्पादन

 घरच्या घरी मातीशिवाय हिरव्या चाऱ्याचे उत्पादन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत  नायकुडे, मुंबई.

दिनांक 30/01/2026 : उन्हाळ्याची चाहूल लागताच हिरव्या चाऱ्याची चणचण चालू होते. त्यात महागडे पशुखाद्यही जनावरांना सतत देणं परवडत नाही. त्यामुळे अशा अवस्थेत शेतकऱ्यांसाठी हायड्रोपोनिक पद्धतीने चारा मिळवणे सोपे होते. कमी वेळात, दर्जेदार हिरवा चारा मिळवण्यासाठी शेतकरी हायड्रोपोनिक शेतीचा वापर करु शकतात.

हायड्रोपोनिक ही मातीविना शेती करण्याची पद्धती आहे. यात फक्त पाणी किंवा पोषणतत्वयुक्त पाण्याचा माध्यम म्हणून वापर केला जातो. बियांची उगवण करून त्याची थोडी वाढ केली जाते. यात पाण्याचाही पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कमी जागेमध्ये, मर्यादित पाण्यामध्ये व १०-१२ दिवसांत पोषक अशा हिरव्या उपलब्धता करणे शक्य होते.

हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी एक विशिष्ट संरचनेची गरज असते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने संरचना (स्ट्रक्चर) तयार केली. त्यामध्ये संरचना उभारणीसाठी लोखंडी अँगलऐवजी ३ बाय २ बाय ३ मीटर आकाराचे यू-पीव्हीसी पाइप वापरले. या संरचनेमध्ये फॉगर सिस्टिम, टायमर, प्लॅस्टिक ट्रे आणि छताला ५० ते ७५ टक्के क्षमतेचे शेडनेट बसवले जाते. ही संरचना उष्णतेचा परिणाम कमी करत आर्द्रता वाढवते. त्यामुळे अशा नियंत्रित वातावरणात बियांची उगवण होऊन ते वेगाने वाढतात.

साहित्य

1. प्लास्टिक ट्रे

2. फॉगर सिस्टिम (धुक्यासारखे पाणी फवारण्यासाठी)

3. टायमर

4. छतावर 50 ते 75 टक्के शेडनेट

◼️उत्पादनाची पद्धत :

हायड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करण्यासाठी चांगल्या प्रतिचा गहू किंवा मका बियाणे निवडावे.

बियाण्यांची उगवण क्षमता किमान ८० टक्क्यांपेक्षा अधिक असावी.

सुरुवातीला संबंधित बियाणे स्वच्छ धुऊन १२ ते २४ तास पाण्यात भिजवत ठेवावे.

नंतर त्यातील पाणी निथळून २४ ते ३० तास गोणीत झाकून ठेवून मोड आणावेत.

मोड आलेले बियाणे ट्रेमध्ये पसरवून हायड्रोपोनिक स्ट्रक्चरच्या रॅकमध्ये ठेवावे.

बाहेरीत तापमानाचा विचार करून दर दोन तासांनी दोन मिनिटे किंवा दर तासाला एक मिनिट या वारंवारितेने फॉगरद्वारे अत्यंत सूक्ष्म थेंबानी (धुके) तयार करावे. त्यामुळे शेडमध्ये आर्द्रतायुक्त वातावरण राहते.

प्रति ट्रे २५० ते ३०० मि.लि. पाणी दररोज लागते.

१० ते १२ दिवसांत २० ते ३० सेंमी उंचीचा हिरवा चारा तयार होतो.

हा सकस हिरवा चारा जनावरांना दिल्यास त्यांची उत्पादकता नक्की वाढते.

◼️हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे :

*१. मातीशिवाय वर्षभर चारा उत्पादन शक्य :* या पद्धतीत माती लागत नाही. त्यामुळे पावसावर किंवा जमिनीवर अवलंबून राहावे लागत नाही. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणत्याही हंगामात चारा तयार करता येतो.

*२. खूप कमी पाण्यात उत्पादन :* हायड्रोपोनिक पद्धतीत पाणी पुन्हा वापरले जाते. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा 80 ते 90 टक्के कमी पाणी लागते. पाणी टंचाई असलेल्या भागासाठी ही मोठी सोय आहे.

*३. कमी जागेत जास्त उत्पादन :* ही पद्धत शेडमध्ये किंवा छोट्या जागेत करता येते. एकाच जागेत अनेक ट्रे ठेवता येतात, त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त चारा तयार होतो.

*४. मजुरांची गरज कमी :* नांगरणी, पेरणी, खुरपणी अशी कामे नसतात. त्यामुळे रोज जास्त मजूर लागत नाहीत. एक-दोन माणसेही ही व्यवस्था सहज सांभाळू शकतात.

*५. ८ ते १० दिवसांत चारा तयार :* पारंपरिक पद्धतीत चारा तयार व्हायला ४५-६० दिवस लागतात. पण हायड्रोपोनिक्समध्ये फक्त ८-१० दिवसांत हिरवा चारा तयार होतो.

*६. चाऱ्याची वैशिष्ट्ये :* हा चारा कोवळा आणि स्वच्छ असतो. जनावरे तो आवडीने खातात. तो लवकर पचतो आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत करतो.

*७.* कोरडवाहू व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ज्यांच्याकडे जमीन कमी आहे किंवा पाणी उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही पद्धत खूप फायदेशीर आहे. कमी खर्चात स्वतःच्या जनावरांसाठी चारा तयार करता येतो.

*यूपीव्हीसी पाइपचा वापर फायद्याचा*

साधारणपणे अनेक शेतकरी हायड्रोपोनिक शेड उभारण्यासाठी एमएस स्टील किंवा जीआय पाइपचा वापर करतात. मात्र या पद्धतीमध्ये सतत पाणी आणि आर्द्रता असल्यामुळे असे लोखंडी पाइप लवकर गंजतात आणि काही काळानंतर संरचना कमकुवत होते.

याच्या तुलनेत युपीव्हीसी पाइप वापरल्यास गंज लागत नाही आणि संरचना जास्त काळ मजबूत राहते. युपीव्हीसी पाइपचा खर्चही स्टील किंवा जीआय पाइपपेक्षा कमी येतो. हे पाइप वजनाने हलके असल्यामुळे शेड एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे सोपे जाते. तसेच ऊन, वारा आणि पावसाचा यावर फारसा परिणाम होत नाही.

म्हणून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी संरचना उभारताना युपीव्हीसी पाइपचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आणि टिकाऊ ठरतो.

◼️एलईडी दिव्यांचा वापर :

हायड्रोपोनिक पद्धतीने हिरवा चारा लवकर वाढण्यासाठी प्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचा प्रकाश मिळाल्यास झाडांमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वेगाने होते, त्यामुळे चाऱ्याची वाढ चांगली होते.

संशोधनातून असे आढळून आले आहे की गहू आणि मका या चारा पिकांसाठी रात्रीच्या वेळेस सुमारे १२ तास लाल व जांभळ्या रंगाचा एलईडी प्रकाश (सुमारे ९३० लक्स तीव्रतेचा) दिल्यास चाऱ्याची वाढ अधिक जलद होते. तसेच तयार होणाऱ्या चाऱ्यातील पोषणमूल्य वाढते आणि एकूण उत्पादनही जास्त मिळते.

म्हणून हायड्रोपोनिक शेडसारख्या नियंत्रित वातावरणात चारा उत्पादन करताना एलईडी दिव्यांचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि उपयोगी ठरते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या