🔲 महापुर आणि सर्व नद्या , नाले आणि ओढे यांच्यावरील 100 % अतिक्रमण

 🔲 महापुर आणि सर्व नद्या , नाले आणि ओढे यांच्यावरील 100 %  अतिक्रमण 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई 

दिनांक 01/10/2025 : महापुराकडे या दृष्टीने सुद्धा बघणे आवश्यक आहे. सरासरीच्या दुप्पट चौपट पाऊस पडला म्हणून पुर आला हे सांगणे आणि तशी आकडेवारी सादर करणे हा खेळ आपले राजकीय नेते आणि प्रशासन लीलया खेळणार आहे परंतु पुर का येतो ? या प्रश्नाचे उत्तर कोणी शोधेल का ???? 

इतर कोणी शोधणार नाही म्हणून आपण शोधूया. 

आता आपल्याकडे उपग्रह आहेत त्यामुळे आपण त्या द्वारे महाराष्ट्रातील सर्व नद्या, नाले आणि ओढे यांचे mapping करू शकतो. म्हणजे यांचे  मूळ पात्र किती लांब , रुंद आणि खोल आहे हे तपासू शकतो. माझी महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हे काम अग्रक्रमाने करा. हे mapping सार्वजनिक करा. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांच्या हद्दीतील mapping उपलब्ध करून द्या. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञांना हे mapping विनामूल्य उपलब्ध करून द्या. या mapping नुसार प्रत्येक जलप्रवाहाची लांबी , रुंदी आणि खोली ही वास्तवात आहे का याची तपासणी करण्यासाठी एक तज्ञांची समिती नेमा. याचा निकाल काय येईल ??? मी हे अगदी ढोबळमानाने सांगतो आहे बर का... कमीत कमी 50 % नद्या नाले आणि ओढे यांची पात्रे आपण अतिक्रमण करून संकुचित केलेली दिसून येतील. नागरी वस्तीमध्ये तर आपण 100 % अतिक्रमण केल्याचे सिद्ध होईल. 

भविष्यात पुरामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये , मालमत्ता  नष्ट होऊ नये. जीव जाऊ नये असे वाटत असेल तर आज निर्दयी , निर्मम होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व नद्या , नाले आणि ओढे यांच्यावरील 100 %  अतिक्रमण काढून टाका. नद्या नाले आणि ओढे यांना मुक्त श्वास घेऊ द्या.

नदी नाले आणि ओढे यांच्या दोन्ही किनार्‍यांना लागून बफर झोन निर्माण करा त्या बफर झोन मध्ये फक्त प्राचीन मंदिरे , STP / ETP प्लांट असावेत आणि बाकी या संपूर्ण बफर झोन मध्ये भारतीय महावृक्षांची लागवड केली जावी. नदी नाले आणि ओढे यांच्या दोन्ही किनार्‍यांना असे हरित पट्टे निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. 

समस्त महाराष्ट्रातील नदी नाले आणि ओढे यांचे किनारे संरक्षित रहावेत यासाठी एक महामंडळ तयार करा. त्यात कर्मचारी भरती करा. एक नियम बनवा. संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही ग्रामपंचायतीपासून एकाही महानगरापर्यन्त कशातील सुद्धा मलमूत्रविसर्जन थेट जलप्रवाहात होणार नाही. STP / ETP प्लांट प्रत्येकाला अनिवार्य करा. त्याच प्रमाणे एकही कारखाना आपल्याकडील प्रक्रिया केलेले पाणी नदीत , नाल्यात , ओढ्यात थेट प्रवाहीत करणार नाही याचे पालन व्हावे यासाठी कठोर व्हा. आणि हे काम गणपती विसर्जन नदी, नाले आणि ओढ्यात होऊ नये म्हणून जितक्या निष्ठेने करता ना.. त्याच आणि तितक्याच निष्ठेने एसटीपी / ईटीपी बनवा आणि सगळ्या कारखान्यांना सुद्धा त्यांच्याकडील पाणी शुद्ध केल्याशिवाय नदीत टाकू देऊ नका. 

सगळे नदी नाले ओढे यांचे दोन्ही किनारे महामंडळाच्या ताब्यात द्या. त्यांच्याकडे पोलिसांच्या समकक्ष अधिकार आणि शस्त्र असणारे कर्मचारी द्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात वाळू उपसा करायला पुढील 25 वर्षांसाठी बंदी घाला. वीटभट्टी उद्योगावर पुढील 25 वर्षांच्यासाठी बंदी घाला. महापूर येण्याच्या अनेक कारणांच्या पैकी सर्वात महत्वाची दोन कारणे म्हणजे वाळूचा उपसा आणि वीटभट्टी साठी खणून काढली जाणारी माती ही आहेत. या दोन्ही कारणांना पुढील 25 वर्षांसाठी तरी थोपवणे आवश्यक आहे. 

नदीत वाळू असेल तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग मंद होतो. नद्यांनी जमिनी गिळल्या ही जी मिडिया ओरड करतो आहे ती खोटी आहे. नद्यांनी आपले पात्र परत मागून घेतले या शब्दाचा वापर आवश्यक आहे. तुम्ही एका बाजूला भरती घालून तिथे शेती सुरू केली , भंगार चे गोडाऊन बनवले , झोपडपट्टी उभी केली नदीने तिथे घुसखोरी केलीच आणि दुसर्‍या किनार्‍याची माती ओढून तिने आपले मूळ पात्र परत मिळवले असा आणि असाच या पुराचा अर्थ आहे. 

त्यामुळे शासनाने मदत जरूर करावी. भरपूर मदत करावी. परंतु पुररेषेच्या आत केलेल्या बांधकामांना , शेतीला मदत देताना हात आखडता घेणे सुद्धा आवश्यक आहे. 

आता अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान एक अंश वाढले आहे आणि त्यामुळे भविष्यात सातत्याने अतिवृष्टीचा आपल्याला सामना करावाच लागणार आहे. याच्याशी लढायचे असेल तर पहिल्यांदा नदी , नाले आणि ओढे त्यांच्या मूळ स्वरुपात आणण्याचे पहिल्यांदा नियोजन करावे लागणार आहे. अतिक्रमणाचा त्याग करावा लागणार आहे आणि त्यांना ग्रीन बेल्ट मध्ये रूपांतरित करावे लागणार आहे. हे पहिले पाऊल असेल ज्यामुळे भविष्यात इतकी मोठी हानी होणार नाही... 

या शिवाय काय करता येईल त्याचा पुढील भागात ऊहापोह करूया. 

©सुजीत भोगले 

तळटीप - वाळू उपसा करणारी मंडळी आंदोलक, आमदार आणि मंत्री असताना हे कसे साधेल हा चिंतेचा विषय आहे. विशिष्ट समाजातील मंडळी वीटभट्टी व्यवसाय करत असतांना त्या लाडक्यांना दुखावणे कसे साधेल हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. पण हे साधले नाही तर तुम्ही आम्ही मरणार आहोत म्हणून यावेळी सरकारची गचांडी धरावीच लागेल हे समजून घ्या. 

वाळू उपसा केला नाही तर बांधकामाला वाळू कुठून आणायची हा प्रश्न विचारू नका.. सध्या पश्चिम बंगाल मधून आपल्याकडे वाळू येते... बिल्डर तितके हुशार आहेत. सामान्य माणसांनी त्यांची काळजी सोडून स्वतःची काळजी करणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या