🟣 गारगोटीत विद्यार्थ्यांस विहीरीत ढकलून खून....
🔵 आरोपीस कठोर कारवाई करण्याची यशवंत क्रांती ची मागणी.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/03/2025 :
बुधवार दि.१९ रोजी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी तानाजी भागोजी बाजारी(वय १८) मुळ रा.धनगरवाडा- फये, सध्या रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह,गारगोटी ता.भुदरगड)याला चेष्टेने पाण्यात ढकलले नसून त्याला मुद्दाम पाण्यात ढकलून त्याचा जीव घेतल्याचा आरोप समस्त गावकरी आणि यशवंत क्रांती संघटनेने केला आहे. सदर आरोपीस तात्काळ अटक करून संबधित संशयित आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी दिला आहे.
डोंगर दऱ्यात राहणारा डंगे धनगर समाज जंगलात मिळणाऱ्या रानमेवा आणि वाळलेला लाकूड फाटा विकून आपले जीवन व्यतीत करत आहे.वनविभागाच्या जाचक अटींमुळे त्याचे जगणे मुश्किल झाले आहे.शेकडो वर्षे जंगलात राहणारा हा समाज आजही प्राथमिक गरजांपासून कोसो दूर आहे.स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातही यांच्या वाड्या वस्त्यांवर रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, प्राथमिक शाळा नाहीत.त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अंगणवाडी पासून सुरू झालेली यांची पायपीट आयुष्यभर साथ सोडत नाही. करवंदे, जांभळे, फणस, केळी विकून हा समाज गुजराण करीत असतो. तानाजी हा लहानपणापासून शाळेत हुशार असल्यामुळे त्याचे वडील भागोजी बाजारी यांनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी गारगोटी येथील वसतिगृहात ठेवले.आई वडील करवंदे जांभळे विकून तानाजीला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून दिवसरात्र एक करीत होते. तानाजीला आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असल्याने तोही अतीशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वयाच्या बारा वर्षांपासून गावापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता.प्रत्येक इयत्तेत तो अव्वल गुणांनी उत्तीर्ण होत होता.सद्या तो इलेक्ट्रिक इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होता.यामध्ये त्याने ९० टक्के गुण मिळवले होते.शिक्षणात तरबेज असलेल्या या विद्यार्थ्याने पोहण्याचे धडे घेतले नाहीत. गावापासून दूर असून देखील तो कधीही नदीवर किंवा जवळच असलेल्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला नाही.
याबाबत ग्रामस्थ कोयाप्पा लक्ष्मण बाजारी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, तानाजी बाजारी याला पोहता येत नाही याची कल्पना त्याच्या मित्रांसह रोहित सुतार याला होती.त्याने जाणूनबुजून तानाजीला काठोकाठ भरलेल्या विहिरीत ढकलले आहे. त्याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कोणीही लगेच पाण्यात गेले नाही.तो खोल पाण्यात गाळात रुतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आम्ही समस्त ग्रामस्थांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे.आमच्या समाजातील शेकडो मुले गावापासून दूर वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत.या हत्येमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.सर्व मुलांचे आईवडील चिंताग्रस्त झाले आहेत.वर्गात यांना भविष्यातील चांगला इंजिनियर झाला असता.
यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हाध्यक्ष आप्पाजी मेटकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर,जिल्हा युवक अध्यक्ष अरुण फोंडे, विनायक पाटील, भागोजी मलगोंडा,सगु कात्रट,विठ्ठल मलगोंडा, विठ्ठल येडगे, विष्णु केसरकर, सोनबा बाजारी, कोयाप्पा बाजारी यांच्यासह सर्व ग्रामस्थ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो; रोहित सुतार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जमलेले धनगरवाडा येथील ग्रामस्थ आणि यशवंत क्रांती संघटनेने पदाधिकारी
ठळक घडामोडी,
हुशार विद्यार्थी तानाजी बाजारी मृत्यू
आरोपीस अटक केल्यानंतरच मृत देह ताब्यात घेऊ, ग्रामस्थ व यशवंत क्रांती ची भुमिका,
रात्री १२.३० वा. दरम्यान संशयित रोहित सुतार या तरुणाला अटक,
सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन सकाळी अंत्यसंस्कार मुळ गावी फये धनगर वाड्यावर करण्यात आले.
यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने गारगोटी पोलीस निरीक्षक यांना निवेदन
0 टिप्पण्या