🟪अक्कलकोट मधील ' शाई ' ची लीला
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 4/8/2025 : अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्याची अघटीत घडले आणि ज्यांनी कधी काळी हेच प्रयोग करून महाराष्ट्रात वैचारिक दहशत निर्माण व हिंसा केली त्यांनीच आणि त्यांच्या संघटनानी आता गळे काढायला सुरुवात केली. ज्या स्वामी समर्थांच्या बद्दल संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांच्या समक्ष महाराव बरळला होता त्याच स्वामींच्या समाधी मंदिराच्या जवळ अक्कलकोट मध्ये ही घटना घडावी हा योगायोग म्हणावा की स्वामींची लीला ? पण स्वामींची लीला असो नसो ह्या शाईची लीला मात्र महाराष्ट्रात सर्वत्र दिसायला लागली आहे.ज्यांच्या बाबतीत ही घटना घडली त्या प्रवीण गायकवाड ह्यांनी हिंदूत्ववादी संघटनाना ह्यात दोषी धरले आहे. जी काही घटना घडली त्याचा निषेधच केला पाहिजे आणि सर्वांना आपले विचार मांडू दिले पाहिजे परंतु त्याच्या काही मर्यादा आणि त्यास वैचारिक अधिष्ठान सुध्दा असले पाहिजे. ह्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या काही दुटप्पी सेक्युलर मंडळी व प्रसार माध्यम कर्मी मंडळींना हिंदुत्ववादी , संघटना भाजपला झोडपायची एक संधी प्राप्त झाली आहे. सोबत आता शाहू , फुले , आंबेडकरांचा महाराष्ट्र ही सोयीची व दुटप्पी जपमाळ करत आहेतच.आता लाजे काजेस्तव शिवाजी महाराजांचे नाव ही मंडळी घेत आहेत. वास्तविक पाहता तीन दशकापासून महाराष्ट्रात भंडारकर वरील हल्ल्याचा उन्माद , विचाराचा दुराग्रह ,भडक भाषणे ईत्यादि द्वारे तरुणाची माथी भडकावून जाती जाती मध्ये विद्वेष आणि संघर्ष कुणी निर्माण केला ह्याचा शोध घेऊन महाराष्ट्रात वैचारिक क्षेत्रात असहिष्णु वृत्ती कुणी आणली , कुणी जोपासली आणि कुणी आपल्या राजकीय फायदा साठी खतपाणी घालून ती फोफावत ठेवली ह्याचा शोध घेऊन किंवा त्या प्रवृत्तीवर भाष्य करण्याची हिंमत सेक्युलर पोंगापंडीत व काही बटिक प्रसार माध्यमे दाखवणार आहेत का ? किंवा दुटप्पी प्रसार माध्यमे आता तारी आपली दुटप्पी भूमिका सोडतील काय ? पुण्यातील भंडारकर संस्थेवर फुलं शाहू आंबेडकर यांच्या नावाचा जप करीत ज्यांनी हल्ला करून "भांडारकर तो झाकी है, शनिवार वाडा बाकी" अशा घोषणा दिल्या ज्यांनी दहशतिचे उघड समर्थन केले होते.केतकर ते कुबेर यांना सुद्धा त्रास दिला तीच मंडळी आता गळे काढून. वळवळ करीत आहेत.ह्या मंडळींना मग एक प्रश्न विचारायचा आहे तो हा की शाहू , फुले , आंबेडकर ह्यांचा महाराष्ट तेंव्हा नसतो का ? नामदेव जाधव मराठा आरक्षणाचे गुन्हेगार शरद पवार आहेत असे म्हटल्यावर शाई फेकली जाते तेव्हा महाराष्ट्र कुणाचा असतो ? जरांगे बरोबर साथ देणारे एक डॉक्टर थोडी वेगळी भूमिका घेतात त्यांच्यावर शाई फेकणारे कोण असतात आणि त्यावेळी महाराष्ट्र कोणाचा असतो ? जरांगे विरुद्ध नगरचा बारस्कर काही बोलल्यावर त्याच्या घरावर हल्ले करणारे कोण ? पंढरपुरात त्याची गाडी जाळणारे कोण ? अकोला जिल्ह्यात सचिन पाटील नावाचा एक कार्यकर्ता हिंदुत्वावर बोलतो म्हणून प्राणघातक हल्ला. हिंगोली मध्ये ह.भ.प.यांच्या वर शाई फेक नव्हे हल्ला करून मारझोड केली जाते.. भांडारकर इन्स्टिट्यूट सारख्याप्राचीन ग्रंथांचे जतन करणारी संस्थावर हल्ला ! निनाद बेडेकर सारख्या इतिहास अभ्यासकाने कुठेही भाषण करू नये ही दहशत कुणी निर्माण केली ? बाबासाहेब पुरंदरे ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यावर धमक्या कुणी दिल्या ? फार पूर्वी हिंदुत्ववादी विचाराचे पू. भा. भावे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले .त्यावेळी युक्रांदचे मंडळी अधिवेशनात घुसले आणि त्यांनी संमेलन उधळून लावले हे पाप कुणाचे होते ? वैचारिक क्षेत्रात महाराष्ट्रात सातत्याने अभिव्यक्त होताना ज्यांनी वैचारिक दहशतवाद पोसला त्यांच्या कृत्याला आलेल्या विषारी फळातून अक्कलकोट येथील घटना घडली आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना असल्या दहशतीला अनेक दशका पासुन जे तोंड द्यावे लागले त्याची कल्पना न केलेली बरी..पण अशा लोकांना ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यातून जी उद्दाम , असहिष्णु वृत्ती निर्माण झाली त्याचा ऊहापोह एकदा प्रसार माध्यमात करण्याची आता खरोखर गरज आहे. कुणी उठावे आणि हिंदुत्ववादी मंडळींना झोडावे हे आता महाराष्ट्रात चालणार नाही. हे सूत्र आता सर्वांना समजावून घेण्याची गरज आहे.पुरुषोत्तम नसलेला खेडकर नावाचा विषारी इसमाला हाताशी धरून ह्या महाराष्ट्रात जे काही विदर्भ विचार पेरले गेले त्याने कुणाचे नाही पण मराठा समाजाचे आणि हिंदू समाजाचे खूप नुकसान झाले आहे. त्यांनी प्रत्येक सामाजिक प्रश्नात जात शोधण्याची गिधाडी वृत्ती ज्यांनी जन्माला घातली त्यांनी आजच्या महाराष्ट्रातील बिघडलेल्या सामाजिक वातावरणाची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि प्रसार माध्यमांनी ह्या गोष्टींचे सोशल ऑडिट करण्याची आवश्यकता आहे. हिंदुत्वाच्या पवित्र , सर्वसमावेशक विचाराला एका विशिष्ट जातीशी जोडून जातीय ध्रुवीकरण करत सत्ता उपभोगणाऱ्या मंडळींना जागृत झालेल्या हिंदू समाजामुळे आपली सत्ता आवाक्याच्या पलीकडे गेली आहे असे वाटते ,अशावेळी वेगवेगळ्या घटनांचे भांडवल करून आणि पोटजीवी , लाचार , लोचट लंपट स्वार्थी मंडळी आणि तथाकथित वि(चा) खारजंताना पोपटपंची करायला लावून हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्त्यांना झोडपायचे कारस्थान कुणी रचत असेल तर ते आत्ता खपवून घेण्याचे काही कारण नाही.कायदा , सुव्यवस्था राहिलीच पाहिजे . सरकारने ती जबाबदारी घेतलीच पाहिजे. पण हा प्रश्न उपस्थित करणारे एवढे सिलेक्टिव्ह , सोयीस्कर कसा विचार करतात ?. अडीच वर्षाच्या मविआ काळात कुरमुसे प्रकरण झाले. अर्णव गोस्वामी बाबत खोटी केस झाली , सैन्याचे माजी अधिकाऱ्यांना मारहाण झाली , पालघर साधू हत्याकांड झाले , हनुमान चालीसा बद्दल अटक झाली त्यावेळी हे प्रश्न ह्याच आविर्भावात विचारले गेले का ? हिंदुत्व चळवळ , नेते , कार्यकर्ते ह्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे सोपे आहे .पण उपरोक्त उल्लेखित घटनावर दुटप्पी मौन बाळगणे कितपत योग्य आहे? स्वतःच्या पोट धंद्यासाठी विष पेरणारे चोरमारे ते जोशी ह्यांनी हे लक्षात ठेवावे की, सुखाने खेडोपाडी नांदणाऱ्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार ह्या सर्वांचा हा महाराष्ट्र आहे . ह्या पायावर येथे भक्तिमार्ग उभा राहिला ,वारकरी परंपरा उभी राहिली , स्वराज्य त्याच पायावर साकार झाले , छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या बलिदानंतर महाराष्ट्र लढला आणि औरंगजेबाला असमान दाखवले ते ह्या एकात्मिक हिंदू धारणेने .पुन्हा एकदा निक्षून असे सांगावे वाटते की शाई फेकणे किंवा तत्सम गोष्टी करून विचाराला व्यक्त होण्यापासून रोखणे चुकीचे आहे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात तसे ' शुद्ध बीजा पोटी , फळे रसाल गोमटी !' जो विचार शुद्ध असेल तो विचार टिकेल .हिंदुत्ववाद्यांना कोणावर शाईफेक करून कुणाला संपवायचे नाही. ज्यांनी हिंदुत्ववाद्यांना संपवायचा विचार केला त्यांची स्थिती काय आहे हे आपण बघतो आहोत.कालची ' शाई ' ची लीला इतकी प्रभावी ठरली की आता खेडेकर म्हणायला लागले आहेत की , मराठा ही व्याख्या व्यापक करावी लागेल आणि देश पातळीवर न्यावी लागेल . हिंदू विचार हेच सांगतो की आम्ही सारे भारत पुत्र आहोत आणि आम्हाला सर्वांना मिळून आमचे प्रश्न सोडवायचे आहेत. छत्रपती शिवरायांची स्वराज्याची कल्पना ही अखंड भारतव्याप्त आणि जातीच्या पलिकडची होती .पण ह्या विचाराला संकुचित करण्याचे पाप अनेक दशका पासुन महाराष्ट्रात सातत्याने होत राहिले आहे .जातींचा संकुचित विचार करण्याचे सोडून जर शिवाजी महाराजांचे शौर्य , संभाजी राजांचे बलिदान आणि ध्न्यानेश्वर माउली , तुकाराम महाराज ह्यांनी दाखवलेला भक्ती मार्ग ह्यांच्या आधारावर महाराष्ट्र घडवला तर पुन्हा असे प्रसंग घडणार नाहीत. आणि हे काम राजकारणी किंवा प्रशासन नाही तर समाज स्वतःच करू शकेल . मग तो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने शाहू , फुले आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा महाराष्ट्र असेल . छत्रपती शिवराय सावरकर , टिळक ह्यांचा असेल. चाफेकर बंधू , वासुदेव बळवंत ह्यांचा असेल. ' शाई ' ची लीला सर्वांची बुद्धी ताळ्यावर आणण्यात यशस्वी होवो , म्हणजे वाईटातून काही तरी चांगले निष्पन्न होईल.
अशोक राणे , अकोला भ्रम.९४२३६५८३८५
0 टिप्पण्या