देवदर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ का बसावे?

 देवदर्शनानंतर मंदिराच्या  पायऱ्यांवर अथवा ओट्यावर थोडावेळ का बसावे?

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11/04/2025 : एखाद्या मंदिराला भेट दिल्यानंतर आपण बाहेर येऊन मंदिराच्या पायऱ्यांजवळ काही क्षण विसावतो असे परंपरेने चालत आले आहे परंतु यामागील कारण आपणांस माहीत आहे का?

ही प्राचीन परंपरा काही विशिष्ट उद्देशाने बनवली गेली आहे.

किंबहुना अशाप्रकारे शांतपणे मंदिराच्या पायऱ्यांशी बसले असताना  एका श्लोकाचे पठण करावे आजच्या काळात लोकांना या श्लोकाचा विसर पडला आहे. या श्लोकावर चिंतन करा आणि तो पुढील पिढीपर्यंतदेखील अवश्य पोहोचवा. 

 श्लोक पढीलप्रमाणेआहे~

            अनायासेन मरणम् ,

            विना दैन्येन जीवनम्।

            देहान्त तव सानिध्यम् ,

            देहि मे परमेश्वरम्॥


अर्थ ~ अनायासेन मरणम् ,

म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू आला पाहिजे, आजारी पडून, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यथित होऊन मरू नये...   तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वसाधारण दिवशी आपण जसे वावरतो तसेच मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे.

 विना दैन्येन जीवनम्।

म्हणजे आपले जीवन कोणावर अवलंबून नसावे. कोणाजवळ असहायपणे आधाराची याचना करायला लागू नये.

देहान्ते तव सानिध्यम् ,

  म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा.त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा.

  देहि मे परमेश्वरम्

हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे.

परमेश्वराची प्रार्थना करत असताना वरील श्लोकांचे पठण करावे.

नोकरी, गाडी, बंगला, कन्या,पुत्र पती-पत्नी, घरदार, पैसाअडका इ. (म्हणजे ऐहिक वस्तू) मागू नका. 

तुमच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर त्या स्वतःहून देत असतो. म्हणून आपण देवदर्शनानंतर स्वस्थचित्ताने बसून ही प्रार्थना करावी. 

ही प्रार्थना आहे, विनंती अथवा याचना नव्हे. घर  नोकरीधंदा मुलगा मुलगी ऐहिक सुखे संपत्ती यांसाठी प्रार्थना नसते. अशा प्रकारच्या लौकिक गोष्टींची मागणी करणे म्हणजे भीक मागणे होय.

'प्रार्थना' या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....

'प्र' म्हणजे विशेष, सर्वोत्तम  सर्वोच्च आणि 'अर्थना' म्हणजे विनंती.

अशा रीतीने प्रार्थना म्हणजे 'विशेष आणि सर्वोच्च विनंती.'

मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे. काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात जर आपण पाहायला आलो आहोत तर डोळे बंद कशाला?

तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पाहा. त्याच्या दर्शनाचा संपूर्ण आनंद घ्या. त्या सर्वांगसुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पाहा.

अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर स्वस्थ बसाल, तेव्हा  बंद  डोळ्यानी, तुम्ही पाहिलेल्या या निजस्वरूपाचे ध्यान करा. आणि जर ध्यानात परमेश्वर येत नसेल तर पुन्हा देवळात जा आणि पुन्हा दर्शन घ्या.

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या