मन इंद्रधनू
🟦 परिपक्वता मनाची
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/04/2025 : परवाच एका आईस्क्रीम पार्टीमध्ये अशीच चर्चा झाली तेव्हा एकीने सहज म्हटलं," परवाच एक सुविचार वाचला होता. आयुष्य हे आईस्क्रीम सारखं आहे. टेस्ट केलं नाही तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं...!! " त्यावेळी माझ्या मनात विचार आला की आपलं मन देखील आईस्क्रीम सारखंच आहे की.!! . पण ते कुणाचं तर जे लोक अति संवेदनशील म्हणजे सेन्सिटिव्ह असतात अशा लोकांचं...!! गंमत बघा काही लोक अतिशय भावनाप्रधान असतात ज्यांना आपण इमोशनल म्हणतो किंवा सेन्सिटिव्ह..!!! त्यांना लगेच राग येतो आणि तेवढेच ते प्रेमळ देखील असतात. त्यामुळे समोरच्याला चटकन माफ करून रिकामे होतात.
@ राजश्री (पूजा)
थोडक्यात काय त्यांचं मन हे आईस्क्रीम सारखंच असतं लगेच वितळणारं आणि काहींची मने म्हणजे अगदी अग्निजन्य खडका सारखी कठीण वगैरे...!! खडकाच्या खालच्या भागात म्हणजे खूप खोल अंतर्गत गाभ्यामध्ये लाव्हा उकळत असतो. आता याचा कधी स्फोट होईल याचा मात्र नेम नाही. काही माणसं असतात जागृत ज्वालामुखी पण बाहेरून दिसताना दिसतात मात्र निद्रिस्त ज्वालामुखी सारखी..!! आपण त्यांच्या बाह्य रूपाला फसतो कारण अचानक यांचा ज्वालामुखी उसळतो आणि त्याच्यामध्ये कारण नसताना आपण भाजून निघतो.
@ संकटांचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो! परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तीत होते. फक्त परिपक्व होण्यासाठी वाट पाहावी लागते.
आपल्या जीवनात परिपक्वता ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पिकलेली फळं खाण्यास खूप मधुर लागतात, कारण ती परिपक्व झालेली असतात. परिपक्वता हे दोन प्रकारची.... शारीरिक आणि मानसिक. शारीरिक परिपक्वता ही ऑटोमॅटिकली होत असते. मानसिक परिपक्वता मात्र आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींवर ती अवलंबून असते. आपल्या आयुष्यात अभ्यास, अनुभव शिक्षण याने आपण परिपक्व झालो की मग आपला सहवास प्रत्येक व्यक्तीला मधुर वाटतो..!! जे लोक मानसिक रित्या उत्तम परिपक्व होतात, अशा लोकांची मने प्रगल्भ झालेली असतात.
मंडळी, मुख्य मुद्दा हा आहे की माणसाला गरज पडली की मग अगदी बरोबर आपली आठवण येते. माणसांची गरज संपली की माणसे आपल्याला विसरून जातात. *गरज सरो वैद्य मरो.* हा काही लोकांचा स्वभाव गुण असतो. आपल्याला जरी या गोष्टी लगेच कळत नसल्या तरी वेळ हा असा एक तराजू आहे... जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवितो...!!
ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या अन्य कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. त्यामुळेच अशा समजदार लोकांच्या सहवासात रहा. या व्यक्ती कुल्फी सारख्या असतात. सुरुवात आईस्क्रीमने झालेली असल्यामुळे मी कुल्फीची उपमा दिली. खरं तर अशा लोकांना परिसाचीच उपमा दिली पाहिजे... कारण जरी खरोखरच कितीही कंटाळा आला असला जगण्याचा, तरी या लोकांच्या सहवासाने आपल्या जगण्याचे सोने होऊन जाते.
हे असं विचार करत असताना अचानक पणे *सौतन* मधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत मनात गुंजायला लागतं..
ज़िन्दगी एक अहसास है
टूटे दिल की कोई आस है
ज़िन्दगी एक बनवास है
काट कर सबको जाना पड़ेगा
ज़िन्दगी प्यार का गीत है
इसे हर दिल को गाना पड़ेगा...
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर

0 टिप्पण्या