सुरक्षितता व विकास वर्गाऐवजी जातीत शोधल्यामुळे जातीव्यवस्था मजबूत होत आहे! 🟡 ओबीसीनामा-41. भाग-4

 💢 सुरक्षितता व विकास वर्गाऐवजी जातीत शोधल्यामुळे

जातीव्यवस्था मजबूत होत आहे!

🟡 ओबीसीनामा-41. भाग-4 

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 13/12/2024 : जीव अस्तित्वात आला तेव्हापासून सजीव प्राण्याची सर्वोच्च प्राथमिकता जीव वाचविणे हीच राहिलेली आहे. दुसरी प्राथमिकता त्याची जीवाचे पुनरूत्पादन करणे, ही आहे. म्हणजे एकपेशीय ऍमिबापासून तर आजपर्यंतच्या आधुनिक मानव प्राण्यापर्यंत जीवाला जपण्याची, वाचविण्याची व जीवाला सुरक्षित करण्याची धडपड कायम राहीलेली आहे. अन्न साखळीत तर ती धडपड फारच अधोरिखीत होते.

जीव लावणे, जीव देणे, जीव घेणे या सगळ्या क्रियांवर सर्वात भारी पडते ती जीव वाचविण्याची क्रिया! जीव वाचविण्याची क्रिया त्याच्या जन्माशीच निगडीत असल्याने ती सतत धडपडीच्या स्वरूपात जीवासोबत असते. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जीव देणार्‍याला म्हनजे आत्महत्त्या करणार्‍याला भेकड म्हटले जात असले तरी असह्य झालेल्या दुखःतून जीवाची सुटका करण्यासाठीच माणूस आत्महत्त्या करीत असतो. आत्महत्त्या ही माणसाच्या आयुष्यातील एकमेव अशी कृती आहे की, ती करण्याआधी तो 100 वेळा विचार करून, अनेक दिवसांच्या घालमेलीतून ती कृती करायला तयार होतो. या अनेक दिवसांच्या घालमेलीत तो जीव वाचविण्यासाठी मार्ग शोधत असतो व सर्व मार्ग बंद झाल्यानंतरच तो आत्महत्त्या करायला प्रवृत्त होत असतो. दुसर्‍यांसाठी स्वेच्छेने जीव देण्याला बलीदान म्हटले जाते व बलीदान करणार्‍याला हुतात्मा म्हटले जाते. या कृतीत तो स्वतःचा जीव देऊनही नावाने अजरामर होत असतो.

पोटच्या गोळ्यासाठी जीवघेणा संघर्ष करणार्‍या जंगली जनावरांपासून आधुनिक मानवांपर्यंतच्या आई बापाच्या कथा आपण वाचत असतो. पण स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आपल्याच बाळाच्या डोक्यावर पाय देणारी माकडीणची कथा आपल्याला आवडत नसली तरी सर्वात जास्त विचार करायला लावणारी कथा तीच आहे.

आत्महत्त्या करणे भेकडपणा आहे, बलीदान देणे उदात्त आहे, जीव गेला तरी चालेल पण तत्व सोडणार नाही वगैरे असे अनेक सिद्धांत मानव समाजात आज मान्यताप्राप्त आहेत. परंतू जीवाच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा तत्व व सिद्धांत एका क्षणात बाजूला सारले जातात. आपला जीव केवळ आपल्या शरिरात असतो असे नाही तर तो आपल्या रक्ताच्या नात्यात, वंशात व समाजातही असतो. आपापल्या समाजाचे अस्तित्व जेव्हा धोक्यात येते व सुरक्षिततेचा प्रश्न जेव्हा समोर उभा ठाकतो, तेव्हा त्या समाजाचे नेते देश, भाषा वगैरे बाजूला ठेवून समाजाचे अस्तित्व वाचविण्यासाठी लढायला तयार होतात!

जीव वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे आपण निसर्गाशी संघर्ष करतो व नंतर निसर्गाच्या बदलत्या वातावरणाशी जुळते-मिळते घेउन जीव वाचवितो! ‘‘Survival of the fittest’’ हा डार्विनचा सिद्धांत यापेक्षा वेगळे काय सांगतो!

जीव वाचविण्याचे म्हणजे सुरक्षिततेचे हे पुराण मला आज का मांडावे लागते आहे? कारण भारतात असे अनेक समाजघटक आहेत की ज्यांना जाणीवपूर्वक ‘‘असुरक्षित’’ करण्यात आले व त्यांच्या असुरक्षिततेवर आधरित एक संपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यात आली. शासन-शोषण करणारी ही समाजव्यवस्था असंख्य समाजघटकांच्या जीवाशी खेळत असते. त्यामुळे प्रत्येक समाजघटक आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडत असतो त्यामुळे ती व्यवस्था अजून जास्त मजबुत होत असते.

अस्तित्व टिकविण्यासाठी आपले हितसंबंध अधिक दृढ करण्यासाठी समान हितसंबंधी समाजघटक सह-अस्तित्वात येतात व त्यांचा विकास होतो. जातीव्यवस्थेतील शोषक-शासक समाजघटक समानहितसंबंधी म्हणून एकत्र येतात व आपली शोषण-शासनाची समाजव्यवस्था मजबूत करतात. परंतू शोषित-शासित समाजघटक मात्र समानहितसंबंधांखातर एकत्र येत नाहीत, कारण असुरक्षिततेपायी तो स्वतःच्या समाजघटकाचेच अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीत असतो.

फुले-आंबेडकरांनी शोषित-शासित समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी आपले आयुष्य झिजविले, मात्र आजही प्रत्येक जातीचा नेता आपापल्या जातीच्या अस्तित्वासाठी धडपडतांना दिसतो आहे. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी समाजाचे ब्राह्मणी-अब्राह्मणी असे धृवीकरण करून शूद्रादिअतिशूद्रांना समानहितसंबंधांसाठी संघटित करण्याचा प्रयत्न केला. परंतू अब्राह्णी समाजघटकात क्षत्रिय-जमीनदार जाती प्रभुत्वशाली असल्याने त्यांच्या बदलत्या हिसंबंधांमुळे ते ब्राह्मण-वैश्यांना जाऊन मिळालेत व त्यांनी शोषण-शासनाची समाजव्यवस्था (जातीव्यवस्था) अधिक मजबूत केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समान सांस्कृतिक हितसंबंधांवर आधारित तीन वर्गात शूद्रादिअतिशुद्रांना संघटित होण्यासाठी आवाहन केले. एस्सी, आदिवासी व ओबीसी हे ते तीन वर्ग! परंतू या तिनही वर्गात काही जाती वरचढ असल्याने त्यांनी इतर लहान अ-जागृत जातींना त्यांचा हिस्सा द्यायला विरोध केला आहे. यामागे असुरक्षिततेची भावना प्रबळ असते. स्वतःचे अस्तित्व व विकास केवळ आपल्या जातीच्या आधारावर आपण शोधत असतो, संवैधानिक वर्गाच्या आधारावर नाही. त्यामुळे दलित, आदिवासी व ओबीसी जात-वर्ग हे आपापल्या कॅटेगिरीच्या विभाजनाला जातीच्या अधारावर विरोध व समर्थन करतात. प्रभुत्वशाली जाती विरोध करतात व लहान-अजागृत जाती समर्थन करतात.

विविध समाजघटकांना जात-धर्माच्या आधारावर असुरक्षित ठेवण्यासाठी प्रस्थापित जाती काय काय कारस्थाने करतात, तेआपण लेखाच्या पाचव्या भागात पाहू या! तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!

-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,

ओबीसी राजकीय आघाडी,

75 88 07 2832 

ईमेलः obcparty@gmail.com

लेखन दिनांकः 13 डिसेंबर 2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या