💢 2024 च्या विधानसभा निवडणूकीत जरांगेचे प्राधान्य शरद पवार, मराठा पक्ष व मराठा मुख्यमंत्री हे होते!
🟧 ओबीसींचे प्राधान्य सुरक्षितता, मविआ सरकार व फडणवीस मुख्यमंत्री हे होते!
🟪 ब्राह्मण-मराठा संघर्षात ओबीसी निर्णायक परंतू तरीही अस्तित्वहीन सत्वहिन कसा?
🟦ओबीसीनामा-40. भाग-3. लेखकः प्रा. श्रावण देवरे
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 08/12/2024 :
ओबीसीविरोधात मराठा हे धृवीकरण आधी कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी व नंतर फडणवीसांनी भाजपच्या फायद्यासाठी 2016-17 पासून पुन्हा सुरू केलेले असले तरी ते नियंत्रणात ठेवण्यास सक्षम ठरलेले होते. लाखांच्या मोर्च्यांच्या भयग्रस्त वातावरणातही त्यांनी फारसा कुठे हिंसाचार होऊ दिलेला नव्हता. परंतू मराठा आरक्षणाचा कायदा 29 नोव्हेंबर 2018 साली फडणवीसांनी मंजूर करून घेतल्यामुळे 2019 च्या निवडणूकीत ओबीसींनी फडणवीसांना फटका दिला. 17 जागा गमावल्या, मुख्यमंत्रीपद गमावले व सरकारही गमावले. परिणामी त्यांची आधीची मराठावादी घोषणा बदलली आणी ओबीसींना खूश करण्यासाठी नवी घोषणा दिली. ‘‘भाजपाचा डी.एन.ए. ओबीसीच आहे,’’ अशी घोषणा त्यांनी वारंवार दिली व ओबीसींना खूश केले.
फडणवीसांनी 2022 मध्ये मविआ सरकार फोडल्यानंतर महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं. मराठा आरक्षणाचं हत्यार हायजॅक करण्यासाठी शरद पवारांनी जरांगे फॅक्टरची निर्मिती केली. वडी-गोद्री व आंतरवली सराटी येथे जरांगेला उपोषणाला बसविले. सुरूवातीला फारसा प्रतिसादही नव्हता व मिडियानेही फारशी दखल घेतली नव्हती. मात्र काही दिवसानंतर शरद पवारांच्या पक्षाची रसद येऊ लागल्यावर उपोषण दखलपात्र होऊ लागले.
हे वाढते व लांबते उपोषण नियंत्रणात आणले पाहिजे, म्हणून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी उपोषण मंडपावर पोलीस फोर्स वापरून उपोषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शरद पवार हे सत्तेत नसले तरी प्रशासनावरची त्यांची पकड कायम असते. फडणवीसांच्या पोलीसी अटॅकला सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांनी जरांगेच्या मंडपात आपली माणसं घुसविली व पोलीसांची जाम धुलाई केली. 70 ते 80 पोलीस जखमी केलेत. या दंगलीत दोन कार्यकर्त्यांकडे लोडेड दोन पिस्तुल सापडलेत, यावरून शरद पवारांना नेमके काय घडवून आणायचे होते, हे लक्षात येते.
उपोषण मंडपात दंगल झाल्यानंतर सर्व परागंदा झालेत व स्वतः जरांगेने उपोषण गुंडाळून घराकडे धाव घेतली. मात्र शरद पवारनियुक्त जरागे-संयोजक राजेश टोपेसाहेब जरांगेच्या घरी जाऊन त्यांना उचलून आणून पुन्हा मंडपात बसविले व पक्षाचे नेटवर्क वापरून उपोषण पुन्हा सुरू केले. दंगलग्रस्त व हिंसक वातावरणात प्रसिद्धी माध्यमांना भरपूर माल-मसाला मिळत असल्याने त्यांनी टी.आर.पी. साठी या उपोषणाला भरपूर प्रसिद्धी दिली. त्यातून जरांगे फॅक्टर अनियंत्रित झाला. ओबीसी नेते यांना अपमानास्पद व अश्लील शीव्या देणे, फडणवीसांना आर-कारेची एकेरी भाषा वापरून अपमानित करणे. मुख्यमंत्री शिंदेंना अद्वा-तद्वा बोलणे. याला गाडू, त्याला पाडू, याला तुडवू, त्याला झोडपू अशी हिंसक वक्तव्ये जरांगेच्या तोंडून रोज ओकारीसारखी भडाभडा बाहेर पडत होती.
जरांगे इकडे आंतरवली सराटीत उपोषणाला बसण्याच्या दिवशीच तिकडे चंद्रपूरमध्ये ओबीसी नेते रविन्द्र टोंगे उपोषणाला बसले होते. परंतू तिकडे कुणी फारसे नेते, मिडिया व सरकारी प्रतिनिधी फिरकले नाहीत. जे दलित, ओबीसी व पुरोगामी-डावे नेते उपोषण मंडपात जरांगेच्या पायाशी बसून उपोषणाला पाठींबा देत होते, त्यापैकी एकही नेता चंद्रपूरच्या ओबीसी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी गेला नाही. मिडिया तर फिरकलाही नाही. कारण ओबीसींचे उपोषण लोकशाही पद्धतीने शांततेत चाललेले होते, कुठेही तोडफोड नाही, हिंसाचार नाही. गाडा, पाडा, तुडवा अशी हिंसक भाषाही नाही. त्यामुळे तेथे काय टि.आर.पी. मिळणार, या आशंकेने मिडिया चंद्रपूरच्या ओबीसी उपोषणाकडे फिरकले नाहीत. मिडियाच नाही तर प्रसिद्धीही मिळनार नाही, म्हणून दलित-पुरोगामी नेतेही तिकडे गेले नाहीत.
जरांगेच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी धावत गेलेल्या दलित-ओबीसी-पुरोगामी-डाव्या नेत्यांना जरांगेने एक खास ‘पुरस्कार’ जाहीर केला. त्यांचे कौतुक करतांना जरांगे म्हणाला- ‘‘दलित, आदिवासी व ओबीसी हे लायकी नसलेले लोक आहेत, त्यांना मिळत असलेल्या आरक्षणामुळे या नालायक लोकांच्या हाताखाली आम्हा 96 कूलीन माणसांना काम करावे लागते, ही मराठ्यांसाठी फार लाजीरवाणी गोष्ट आहे!’’ जरांगेने दिलेला हा मानाचा पुरस्कार जरांगेला पाठिंबा देणार्या दलित, ओबीसी व पुरोगामी नेत्यानी मोठ्या आनंदाने स्वीकारला व आम्ही दलित नेते, ओबीसी नेते किती निर्लज्ज व हरामखोर आहोत, हे सिद्ध केले.
दरम्यान कोणत्याही निवडणूका नसतांना शरद पवारांनी भुजबळांच्या व धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात जाऊन ओबीसीविरोधी सभा घेउन वातावरण अधिकच पेटवीले. त्यातून जरांगेला प्रोत्साहन मिळत गेले. जरांगे-समर्थकांनी बीड येथील सुभाष राऊत या समता परीषदेच्या नेत्याचे आठ कोटी किमतीचे भव्य हॉटेल जाळून बेचिराख केले. ओबीसी आमदार क्षीरसागर यांचे घर पेटवून दिले, ज्यात आमदाराची बायको, लहान मुले व म्हातारे आई-वडिल जळून राख होणार होते. परंतू शेजारी राहणार्या मुसलमान बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीत उडी घेतली व सर्व कुटुंबाला वाचविले. म्हाडा मतदारसंघातील तुळशी गावातील नाभिक-ओबीसी बांधवांची घरे जाळली, स्त्री-पुरूषांना बेदम मारहाण केली गेली. त्यानंतर बीड जिल्याह्यातील पंकजा मुंडेच्या मतदासघात ओबीसींमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील गंगामसला गावातील नाभिक बांधवांची कटिंग सलूनची दुकाने उध्वस्त करण्यात आलीत. बीड शहरातली सोनार-ओबीसी जातीच्या लोळगे बंधूंचे शुभम ज्वेलर्सचे दुकान जाळून भस्मसात करण्यात आले. जरांगेविरोधात किंवा ओबीसी आरक्षणाच्या समर्थनासाठी सोशल मिडियावर पोस्ट टाकणार्या डॉक्टर, प्राध्यापक आदि बुद्धीवंवर शाईफेक करणे, मारहाण करणे आदि हिंसक परकार गावोगावि सुरू झालेत. काही ओबीसी प्राध्यापकांना मराठा संस्थाचालकांनी नोकरीवरून काढून टाकले. गावोगावचा ओबीसी कार्यकर्ता किंवा सामान्य ओबीसी मानूसही दहशतीत आला होता.
शेवटी 17 नोव्हेंबर 2023 रोजी भुजबळसाहेबांनी अंबड येथे ओबीसींची महाकाय क्रांतीसभा घेऊन दहशतीने भरलेले आकाश मोकळे केले व ओबीसींनी सुटकेचा श्वास सोडला. यासाठी भुजबळसाहेबांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अर्थात भुजबळांचा दरारा पाहता मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याइतकी हिम्मत नव्हती.
ओबीसी-मराठा यांचे जे हिंसक धृवीकरण झाले ते केवळ माननीय शरद पवारांमुळे हिंसक झाले हे आज कोणीही सूज्ञ माणूस सांगेल! 2024 च्या विधानसभा निवडणूकीत ओबीसींसमोर सर्वात मोठा व सर्वात पहिला महत्वाचा प्रश्न ‘‘सुरक्षितता’’ हा होता. जर मविआ सत्तेत आली तर तीचे पूर्ण नियंत्रण शरद पवार यांचेकडेच राहणार हे वेगळे सांगायला नको. शरद पवार सत्तेत नसतांनाही त्यांनी जरांगे फॅक्टरला हिंसक बनविले, सत्तेत आलेत तर शरद पवार जरांगे फॅक्टरला सत्तेचं बळ देतील. पवारांच्या पाठबळाने जरांगे फॅक्टर अधिक हिंसक होईल व हरियाणा, मणीपूरसारख्या जातीय दंगलीत ओबीसींचे अस्तित्वच नष्ट होईल, या रास्त भीतीपोटी ओबीसींचे पहिले प्राधान्य (First Priority) शरद पवारप्रणित मविआला निवडणूकीतून सफाचट करणे व भाजपप्रणित महायुतीला सत्तेत बसविणे, हे होते. ओबीसींचे दुसरे प्राधान्य (Second Priority) होते ते फडणवीसांना मुख्यमंत्री करणे. फडणवीस मुख्यमंत्री झालेत तर ओबीसींना किमान सुरक्षितता मिळेल. कारण त्यांनी गृहमंत्रीपदाचा योग्य वापर करून जरांगे फॅक्टरला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे जरांगेने फडणवीसांची प्रतिमा ‘‘मराठ्यांचे खलनायक’’ अशी केली होती. त्यामुळे ‘‘ब्राह्मण परवडला पण मराठा नको’’ या सूत्रानुसार फडणवीस मुख्यमंत्री होणे हे ओबीसी मतदारांचे दुसरे प्राधान्य होते. त्यासाठी ओबीसींनी भाजपाचे मराठा उमेदवारही निवडून आणलेत व युतीमधील मराठा पक्ष असलेले शिंदेसेना व अजित पवार राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांनाही भरघोस मते देऊन निवडून आणलेत. कारण महायुतीचे बहुमत असेल तरच भाजप सत्तेत येईल व भाजपासाठी ओबीसी मतांची त्सुनामी उभी केली तरच शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा दावा खतम होईल व फडणवीस दमदारपणे मुख्यमंत्री होतील.
या निवडणूकीत ओबीसींनी जरांगेप्रमाणे ‘‘सरसकट जात-द्वेष’’ नाही पाळला. ओबीसींनी वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी उमेदवारांनाही नाकारले. कारण वंचिततर्फे निवडून येणार्या ओबीसी आमदारांचे नियंत्रण बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांकडेच राहीले असते. आणी बाळासाहेब हे सुरूवातीपासूनच जरांगेचे खंदे-समर्थक होते व आहेत. निवडणूक जुमला म्हणून निवडणूक काळात त्यांनी ओबीसींची बाजू घ्यायला सुरूवात केली होती. निवडणूक संपल्यावर ते पुन्हा ओबीसीविरोधात जरांगेला डोक्यावर घेऊन नाचतील, याची आबीसींना खात्री होती व आहे. दलित-ओबीसीविरोधात असलेल्या जरांगे प्रणित सगे-सोयरे मुद्द्याला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला उघड पाठींबा आजही कायम आहे, हे ओबीसी कसे विसरतील? त्यामुळे या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. जरांगेला पाठींबा देणार्या प्रत्येक नेत्याला या निवडणूकीत ओबीसी मतदारांनी असे फटके लगावलेले आहेत की ते जन्मभर या जखमा विसरणार नाहीत.
मविआच्या पराभवाचे व महायुतीच्या विजयाचे विश्लेषण करणारे बहुतेक सर्वच पत्रकार, विद्वान व नेते नेहमीप्रमाणे ईव्हीएम, लाडकी बहिण व पैसा वाटपसारखे फालतू मुद्दे पुढे करीत आहेत. या विश्लेषणाचे विश्लेषण, सरकार बनवितांना होत असलेली महायुतीची रस्सीखेच, तीचे खरे कारण व ओबीसींच्या पुढील टप्प्यावरची वाटचाल यावरचर्चा करण्यासाठी आता आपण या लेखाच्या चौथ्या भागाची वाट पाहू या! तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
नवा व्हाटसप नंबर- 75 88 07 2832
ईमेलः obcparty@gmail.com
दिनांकः 2-3 डिसेंबर 2024

0 टिप्पण्या