💢 पाेलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला*, 💢 पाेलीस हल्लेखाेराचा घेताहेत शाेध,

 💢 पाेलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक  हल्ला*, 

💢 पाेलीस हल्लेखाेराचा घेताहेत शाेध,

वृत्त एकसत्ता न्यूज  

नाशिक / प्रतिनिधी दिनांक 14/11/ 2024 : पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपनिरीक्षकावर थेट हल्ला झाल्याने पंचवटीत खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकार्‍यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंचवटी पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

पंचवटी परिसरात दुसर्‍यांदा पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने पोलीसांच्या कार्यशैलीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमान नेमाणे हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून  रात्री १० वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात होते. वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात दोन मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे  नेमाणे यांना दिसले. यावेळी नेमाणे यांनी त्यांना हटकले. राग अनावर झाल्याने मद्यपींनी दगडाने नेमाने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गुन्हे शोध पथकाच्या टीमला संशयितांच्या मागावर पाठवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे पोलीसांचा शहरातील गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे उघड झाले आहे.

गेल्या महिन्यात पोलीस अधिकार्‍यावर हल्ला

पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव ऊर्फ गटया (रा. अवधूत वाडी, पंचवटी) हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता.  यावेळी  गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७, रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे त्याच रस्त्याने घरी जात होते.  त्यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गट्याने थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसल्याची घटना घडली होती.

*एकीकडे रूटमार्च, कोंम्बिंग तर दुसरीकडे पोलीस अधिकार्‍यावर हल्ला

नाशिक शहरात वरिष्ठ पोलीस अधिकारी कोम्बिग ऑपरेशन आणि रूटमार्च करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. तर दुसरीकडे सोनसाखळी चोर रस्त्यावरून थेट घराच्या पार्किंगमध्ये येऊन महिलांचे सौभाग्याचे लेणं ओरबाडून नेत आहेत. आता थेट पोलीस अधिकार्‍यावरच प्राणघातक हल्ला झाल्याने नाशिक किती असुरक्षित आहे, याचा प्रत्यय जाणवू लागला आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काही ठोस भूमिका घेणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या