मी व माझा शत्रू पक्ष अर्थात काही अकारण शत्रू

 मी व माझा शत्रू पक्ष 

अर्थात काही अकारण शत्रू

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 11/9// 2024 : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व व सिद्धहस्त लेखक पु ल देशपांडे यांचे आपण माझे शत्रू पक्ष या विषयावरचे लेखन वाचले असेल व ऑडिओ क्लिप  ऐकलेली असेल त्यामध्ये पु ल देशपांडे यांनी मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने दाखवून काही विनोदी पद्धतीने शत्रु पक्षाबद्दल लेखन केले आहे 

पण माझा आजचा विषय शत्रू पक्षाबद्दल नाही काही अकारण पण छुपे शत्रू याबद्दल आहे.  

आपणा सर्वांना आपल्या आयुष्यात असा अनुभव आला असेल अनेक वेळा ज्या व्यक्तीच्या आपण वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय दिला नसतो  ते निष्कारण आपल्याबद्दल गैरसमज होईल अगर आपले नुकसान होईल असे वर्तन करत असते अर्थात ही त्यांची कामगिरी आपल्या पाठीमागे छुप्यापध्दतीत होत असते. आपणास त्याचे परिणाम मात्र भोगावे लागतात. पण त्या क्षणाला हे असे का घडले याचे उत्तर आपल्याला सापडत नाही.

फाशीची शिक्षा व माझी वकीली 

मी आज पर्यंत अनेक क्रिमिनल कामे चालवली आहेत. खूनापासून दरोडे बलात्कार अशी ही कामे चालवली आहेत. मला या कामात नव्वद टक्क्या हून अधिक यश मिळालेले आहे. काही बाबतीत माझ्या आरोपीला शिक्षाही झाली आहे  पण आज पर्यंत माझ्या कोणत्याही आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाही.

 "काड्या करणे" 

 एकदा काय झाले माझ्याकडे एक छळ केल्यामुळे आत्महत्या असे प्रकरण होते. सासरच्या घरची सर्व मंडळी त्यामध्ये आरोपी होते. 2005 पूर्वी ही कामे कोल्हापूरला चालत नंतर इचलकरंजीला सेशन कोर्ट झाल्यावर अशी कामे इचलकरंजीला चालू लागली. त्यामुळे पक्षकारांना पुढे पाठवून देणे व आपले बाकीची कामे आवरली की कोल्हापूरला जाऊन त्या पक्षकाराचे काम अटेंड करणे असा विषय असायचा. त्या पक्षकार यांना मी पुढे कोल्हापूरला पाठवले व मी बारा साडेबारा च्या दरम्यान कोल्हापूरात पोचलो. त्यादिवशी काम चालण्यावर नव्हते. मी जाईपर्यंत तारीख पडली. तारीख   मिळाल्यावर पक्षकार निघून गेले. 

 "काम परत द्या" 

हे रुटीन कोर्स मध्ये असल्याने मला त्यात काही वेगळे वाटले नाही. पण दोन दिवसातच पक्षकार आले व त्यांनी आम्ही अन्य वकील देणार आहे म्हणून मला सांगितले. अशा वेळी जाणाऱ्या पक्षकाराला थांबवणे हे योग्य होत नाही. मी त्याला त्यांचे दोष पत्राची कागद दिले. 

 "माझ काय चुकले" 

मी विचार करत राहिलो. आपले यात काही चुकलं. या लोकांचा जामीन वेळेवर  अल्प पैशात केला. काम चालावयास  आल्यावर फी मिळेल या आशेवर कोल्हापूरच्या फेऱ्या केल्या. पक्षकारांना नाराज होण्यासारखे काय घडले हे माझ्या लक्षात येईना. 

तर असे झाले होते 

हे पक्षकार मराठी व कानडी भाषिक होते. एक सीनियर वकील त्यादिवशी 11:30 च्या सुमारास या पक्षकाराना कोर्टात भेटले. सीनियर असल्यामुळे पक्षकारांनी त्यांना आदराने नमस्कार केला पूर्वपरीचय असल्याने वकिलांनी कानडी भाषेत यानरी येनरी अशा भाषेत त्यांच्याशी  बोलले. त्यावेळी पक्षकांरानी त्यांना आपण का आलो आहोत हे सांगितले. त्या सीनियर वकीलानी एवढ्या गंभीर केस मध्ये वकील कोण दिला आहे असे विचारले. त्यावर पक्षकांरानी माझे नाव सांगितले. त्यावर ते सीनियर आपल्या ज्युनिअर कडे पाहत म्हणाले अरे गेल्या महिन्यात तीन जणांना फाशी झाली त्या कामात रुईकर वकीलच होता ना? जुनिअर पण सीनियरच्या पठडीतच तयार असल्याने होय होय म्हणाला. एवढी काडी घालून सिनियर आपल्या कामाला निघून गेले. ते अधिकतर दिवाणी काम करायचे त्यांनी त्यांच्या आयुष्यात फौजदारी विषयाला हात लावला नव्हता. पण त्यांच्या अशा या प्रतिष्ठा सूचने मुळे पक्षकार घाबरून गेले व त्यांनी माझ्याकडील काम काढून घेतले. हे नंतर मला तेथे संभाषण ऐकणाऱ्या एका वकील मित्रांनी पंधरा-वीस दिवसानंतर सांगितले. मला हे कळेना या सिनियर वकिलाच्या वाळल्या पाचोळ्यावर मी कधीही पाय दिला नाही ना कधी त्यांचा अपमान केला. याउलट  मी त्या वकिलांशी  ते स्वर्गवासी होई पर्यंत आदराने वागलो. त्यांनी असे का करावे? त्याच्या एका वाक्यामुळे माझे जूनिअरशिपमध्ये एक काम गेले व हजारो रुपयांचे नुकसान झाले. त्यात त्यांना काय मिळाले हे मला समजून येत नाही. असे अकारण शत्रू आमच्या व्यवसायात जागोजागी पसरलेले आहेत त्यांनी लावलेली आग व केलेल्या काड्या दिसून येत नाहीत. पण त्याचे परिणाम मात्र भोगावे लागतात असे आहेत माझे अकारण शत्रू!

 "वकीली कथा व व्यथा" या आगामी पुस्तकातील वकिलांचे अकारण शत्रू या भागातील संक्षिप्त भाग

ॲड अनिल रुईकर

98 232 5 5049 

इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या