रानभाजी - आंबुशी

 रानभाजी - आंबुशी 

शास्त्रीय नाव : ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा

कूळ : ऑक्झॅलिडीएसी

इंग्रजी नाव : इंडियन सॉरेल

वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 11ऑगस्ट 2024 :

आंबुशी या वनस्पतीला आंबुटी, आंबोती, चांगेरी अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशी प्रामुख्याने ओलसर जागी, तसेच कुंड्यांतून वाढणारे तण आहे. हे तण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते.

खोड - नाजूक गोलाकार पसरत वाढणारे, लोमश. खोडाच्या पेरांपासून तंतुमय मुळे तयार होतात.

पाने - संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी. पर्णिका तीन, त्रिकोणी आकाराच्या, १.२ ते २.५ सेंमी लांब उलटे हस्ताकृती. तळ शंक्वाकृती, कडा केशयुक्त.

फुले - पिवळी, नियमित, द्विलिंगी, पानाच्या बगलेतून येतात. पुष्पमंजिरी अक्ष ७ ते ८ सेंमी लांब. अक्षापासून २ ते ५ फुले टोकांवर येतात. पुष्पकोश पाच संयुक्त दलांचा, बाहेरील बाजूस केसाळ. पाकळ्या ५, टोकांकडे गोलाकार, आयताकृती. पुंकेसर १०, यापैकी ५ मोठे, ५ लहान. बीजांडकोश ५ कप्पी.

फळे - बोंडवर्गीय, लांबट गोलाकार, रेषाकृती, पंचकोनी, लोमश, चंचुयुक्त. बिया अनेक, अंडाकृती, आडवे पट्टे असलेल्या, करड्या तपकिरी रंगाच्या.

गुणधर्म

आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, चांगली भूकवर्धक आहे. ही रोचक, दीपन, पित्तशामक, दाहप्रशमन, रक्तसंग्राहक, शोथघ्न आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे. ही वनस्पती आमांश, अतिसार, त्वचारोग आणि चौघारे तापात उपयुक्त आहे. घृत गुदभ्रंश, योनिभ्रंशात उपयोगी.

वापर

#आंबुशीची पाने आमांश आणि स्कर्व्हीत वापरतात. आमांशात पानांचा रस, मध आणि साखर यांच्या बरोबर देतात.# कोवळ्या पानांचा फांट तापात उत्तम औषध आहे.# चामखीळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाह्य उपाय म्हणून वापरतात.# ताज्या पानाची कढी अपचनाच्या रोग्यांना पाचक आहे. कुपचनावर आंबुशी उत्तम औषध आहे.# वाटलेल्या पानांचे पोटीस केसतुटासाठी वापरतात.# कोकणात आंबुशी पाण्यात वाटून, उकळून कांद्याबरोबर पित्तप्रकोपात डोके दुखण्यावर डोक्याला लावतात.# सौम्य आमांशात पाने ताकात उकळून दिवसातून २ ते ३ वेळा दिल्यास अत्यंत उपयोगी आहे.# आंबुशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते.# धोतऱ्याने विष चढल्यास आंबुशीचा रस उतार म्हणून देतात.

*आंबट, रुचकर आंबुशी

# पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती आपल्याला अगदी हमखास उगवलेली पाहावयास मिळते.

# आंबट चवीमुळेच जेवणाची रुची वाढविण्यास या भाजीचा उपयोग होतो. आहारकल्प म्हणून या भाजीचा वापर करतात.# शरीरातील कफ व वातदोष वाढले असल्यास आंबुशीच्या भाजीचा आहारात समावेश करावा. कफ व वातप्रधान अशा जुनाट त्वचाविकारात आंबुशीची भाजी उपयुक्त ठरते.

# रोग्याच्या अन्नास आंबटपणा आणण्यासाठी, रुचीसाठी, कुपचनात ही वनस्पती सर्वत्र वापरतात. आयुर्वेदात, विशेषतः अन्नवह स्रोतसाच्या ‘ग्रहणी’ किंवा ‘कोलायटीस’ या अगदी चिवट आजारांत आंबुशीचा उपयोग आढळून येतो. या विकारात भूक मंदावलेली असते. मूळ पातळ होत असतो व आतड्याना सूज आलेली असते, अशा वेळी या भाजीच्या नियमित सेवनाने सुधारणा घडून येते.

पाककृती १

# साहित्य - आंबुशीची पाने, कांदा, लसूण, गूळ, शेंगदाणा कूट, तिखट किंवा ओली मिरची, मीठ इ.

# कृती - पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. तेलात कांदा परतून त्यामध्ये लसूण, ओली मिरची चिरून घालणे किंवा तिखट घालणे. थोडा गूळ, शेंगदाणा कूट घालून भाजी परतणे, चवीनुसार मीठ घालून भाजीला वाफ देणे.

पाककृती २

# साहित्य - आंबुशीची पाने, तूरडाळ (किंवा मूग, मसूरडाळ), दाणेकूट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, तेल, डाळीचे पीठ, लसूण पाकळ्या, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ.

# कृती - तेलाच्या फोडणीत लसूण परतून घेणे. आंबुशीची भाजी व डाळ कुकरमध्ये शिजवून, घोटून त्यात डाळीचे पीठ लावावे. फोडणीत भाजी घालावी. वाटलेली मिरची पेस्ट, मीठ, दाणेकूट व गूळ घालून शिजवावी.

पाककृती ३

# साहित्य - चिरलेली आंबुशीची पाने, डाळीचे पीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ, मीठ, तिखट, काळा मसाला, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, तुकडे केलेल्या लाल मिरच्या इ.

# कृती - तेलात फोडणी करून भाजी परतावी. मीठ, तिखट व काळा मसाला घालून दोन वाफा आणाव्यात, नंतर गूळ घालावा. नंतर डाळीचे पीठ घालून ढवळून पाण्याचे हबके देऊन, शिजवून दोन वाफा आणाव्यात. छोट्या कढईत तेलाच्या फोडणीत लसूण व लाल मिरच्या घालून, ही फोडणी भाजीवर ओतावी

संदर्भ : ऍग्रोवन/डॉ. मधुकर बाचुळकर

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या