रानभाजी - केना
शास्त्रीय नाव : Commelina Benghalensis
इंग्रजी नाव : Benghal Dayflower
वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10 ऑगस्ट 2024 :
केना वनस्पती ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला आढळून येते. ही पावसाळ्यात वाढते. कालावधी जून ते सप्टेंबर महिना असतो. केना हे जमिनीवर वेगाने पसरत जाणारे तण आहे. याच्या नाजूक खोडाच्या पेराला मुळे फुटतात. या वनस्पतीची पाने साधी, लंबगोलाकार, टोकदार आणि थोडी जाडसर असतात. केनाच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. केनाला छोटी तीन पाकळ्यांची निळसर जांभळी फुले येतात.
औषधी गुणधर्म
पचनक्रिया चांगली होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज कमी होते. लघवी साफ होण्यास मदत होते.
केनाचे वडे
साहित्य - केना. तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर.
कृती - एक पातेले घेउन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन मळून घ्यावे. नंतर एक कढई घेउन त्यात तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे वडे बनवून लालसर होई पर्यंत तळून घ्यावे.
केनाचे थालीपिठ
साहित्य - केना, तांदळाचे पिठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथबीर, ओवा, तीळ.
कृती - एक पातेले घेऊन त्यात कापलेली केना भाजी घेऊन त्यात तांदळाचे पिठ, बारीक चिरलेला कांदा, मिरची, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर, कोथींबीर, ओवा, तीळ टाकुन व आवश्यकतेनुसार पाणी टाकुन पातळ मिश्रण करावे. नंतर गॅसवर तवा गरम करून त्यावर चमच तेल टाकुन त्यावर वरील मिश्रण टाकुन वर्तुळाकृती पसरवावे व त्याला झाकुन घ्यावे. काही वेळा नंतर झाकणी काढून त्याला पलटवून पुन्हा एक चमच तेल टाकुन शिजवावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची केनाचे थालीपीठ तयार होतील.
केनाचे भजे
साहित्य - २० ते २५ केनाची पाने, २ मोठे चमचे बेसन, १ मोठा चमचा तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पावडर, चवीनुसार मीठ, आवडीनुसार ओवा, तळण्यासाठी तेल.
कृती - केनाची पाने धुऊन निथळत ठेवावीत. उर्वरित साहित्य एकत्र करून भजीचे पीठ भिजवून घ्यावे. कढईत तेल कडकडीत तापवून केनाची पाने भजीच्या पिठात बुडवून तळावीत. खमंग, कुरकुरीत भजी तयार.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या