रानभाजी - मटाळू
शास्त्रीय नाव : Dioscorea Bulbifera
कुळ : Dioscoreaceae
स्थानिक नावे : मटाळू, डुकरकंद, करांदे
इंग्रजी नाव : एअर पोटॅटो
वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रवीण सरवदे /आकाश भा.नायकुडे
दिनांक 20ऑगस्ट 2024 :
मटाळू ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदा सोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी कोरडी भाजी पण बनवतात. मटाळू उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंची पर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृत मध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका (bulbils) किंवा धनाकंद द्वारे (corm) केली जाते. या वेलाची फुलेही फांदीच्या काखेत किंवा बगलेत गुच्छाच्या स्वरूपात उगवतात व त्यांचा रंग पांढरट असून आकाराने ती लहान असतात. फळे लहान गोलाकार असून यांची बीजे पंखयुक्त असतात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा उपयोग खवखवणारा घसा, मुळव्याध, अतिसार यावर केला जातो. शरीरावर आलेल्या गाठींवर देखील ते प्रभावी ठरते.
पाककृती - भाजी
# साहित्य - मटाळू, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टमाटे, कोथंबीर, मसाले.
# कृती - एक पातेल्यात पाणी घेऊन त्यात मटाळू मीठ घालून उकळून घ्यावे. शिजल्या नंतर मटाळू सोलून घ्यावे. नंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, जिरे, तिखट, मीठ, हळद व मसाला तळून घ्यावे. नंतर त्यात मटाळूचे बारीक तुकडे टाकून शिजू द्यावे. नंतर त्यात कोथंबीर टाकावी. अशा प्रकारे भाजी तयार होईल.
पाककृती - पानांचे वडे
# साहित्य - मटाळूची कोवळी पाने, बेसन, तेल, तिखट, मीठ, हळद.
# कृती - प्रथम बेसन मळून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, हळद मिसळून घ्यावे. मळलेले बेसन मटाळूच्या पानावर पसरून त्यावर दुसरे पान ठेऊन गुंडाळून घ्यावे. नंतर पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्याव्या. त्यांचे बारीक तुकडे किंवा वड्या करून तेलात तळून घ्याव्या.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या