■ भारतीय ट्रेनच्या कोचवर..
■ M1 बोर्ड का लावलेला असतो ?
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
भारतीय रेल्वेत ट्रेनच्या प्रत्येक डब्यावर S1, B1, A1, D1 यांसारखे वेगवेगळे कोड लिहिलेले असतात. हे कोड समजून घेतल्यास तिकीट तपासताना, आपला डबा शोधताना आणि डब्यात कोणत्या सुविधा मिळतील याचा अंदाज घेण्यास मदत होते. यापैकी M1, M2, M3 हा एक महत्त्वाचा कोड आहे. हा कोड पाहून अनेक प्रवाशांना हा थर्ड एसीचा डबा आहे की आणखी काही, असा संभ्रम होतो. या गोंधळामुळे काही वेळा प्रवासी चुकीच्या डब्यात चढतात आणि नंतर त्यांना त्रास सहन करावा लागतो. खरं तर, M म्हणजे AC 3-Tier Economy किंवा Third AC Economy क्लास.
*M1 कोच* : M1 कोच हा भारतीय रेल्वेने २०२१ च्या आसपास सुरू केलेला एक नवीन प्रकारचा डबा आहे. याला 3E (AC Three Tier Economy) असेही म्हटले जाते. हा सामान्य थर्ड एसी (3A) कोच पेक्षा काहीसा वेगळा असतो. यातील मुख्य फरक म्हणजे या डब्यात बर्थची संख्या अधिक असते. साधारणपणे एका M1 कोच मध्ये ८३ बर्थ पर्यंत असू शकतात, तर स्टँडर्ड थर्ड एसी कोच मध्ये सुमारे ६४ ते ७२ बर्थ असतात. त्यामुळे ट्रेनच्या डब्यावर M1, M2, M3 असे लिहिलेले दिसले, तर तो थर्ड एसी इकॉनॉमी क्लासचा डबा आहे, हे समजून घ्या.
*M1 कोच वेगळा कसा?* : M1 कोचचे भाडे सामान्य थर्ड एसी पेक्षा साधारण ६ ते ८ टक्के कमी असते. त्यामुळे कमी बजेट मध्ये एसी प्रवास करण्याची सुविधा मिळते. यात एअर कंडिशनिंग, बर्थ, दिवे, पंखे यांसारख्या मूलभूत सुविधा थर्ड एसी प्रमाणेच असतात; मात्र आरामाच्या बाबतीत काही फरक जाणवू शकतो. जास्त प्रवाशांना सामावून घेण्यासाठी बर्थची रचना थोडी कॉम्पॅक्ट ठेवली जाते. साइड बर्थ असलेल्या प्रवाशांना अनेकदा थर्ड एसी सारखाच अनुभव येतो. थर्ड एसीच्या तुलनेत जागा आणि प्रायव्हसी थोडी कमी असते, मात्र स्लीपर क्लास (SL) पेक्षा ही सुविधा अधिक आरामदायी असते. ज्यांना एसी प्रवास करायचा आहे, पण थर्ड एसीचे पूर्ण भाडे द्यायचे नाही, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. भारतीय रेल्वेने अधिकाधिक प्रवाशांना एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि ट्रेनची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी हा कोच सुरू केला. आज अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन मध्ये M1, M2 यांसारखे कोच पाहायला मिळतात.
*कोचवरील इतर कोड* : सामान्यतः प्रत्येक ट्रेनच्या कोचवर एक विशिष्ट कोड लिहिलेला असतो. कोचच्या बाहेरील बोर्डवर मोठ्या अक्षरात हा कोड असतो, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांना आपला डबा सहज ओळखता येतो. रेल्वे कर्मचारी आणि टीटीई यांनाही या कोडच्या मदतीने ट्रेनची व्यवस्था हाताळता येते.
*S1, S2* : स्लीपर क्लास (नॉन-एसी)
*B1, B2* : थर्ड एसी (3A)
*A1, A2* : सेकंड एसी (2A)
*H1* : फर्स्ट एसी (1A)
*D1* : चेअर कार (CC)
*M1, M2, M3* : थर्ड एसी इकॉनॉमी (3E)
*हे लक्षात ठेवा* : तिकीट बुक करताना अॅप किंवा वेबसाइटवर कोच टाइप मध्ये M दिसले, तर तो इकॉनॉमी थर्ड एसीचा डबा असतो. म्हणजेच कमी किमतीत एसी प्रवासाची सुविधा मिळते. मात्र जास्त प्रवासी असल्यामुळे या डब्यात काही वेळा थोडी गर्दी जाणवू शकते. त्यामुळे कुटुंबासोबत किंवा ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असल्यास स्टँडर्ड 3A अधिक आरामदायी पर्याय ठरू शकतो. M1 हा केवळ एक कोड नसून, प्रवाशांना तुलनेने कमी किमतीत एसी प्रवासाची सुविधा देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यामुळे ट्रेनची प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होते आणि अधिक प्रवाशांना एसी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होतो.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या