"फोटोतल्या नैवेद्यापेक्षा जिवंत माणसाच्या पानावरील 'पिठलं-भात' महत्त्वाचा!"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/10/2026 :
आपल्या समाजात एक विरोधाभास नेहमीच डोळ्यांत भरतो. एखादी व्यक्ती जिवंत असेपर्यंत, ती घरात किंवा समाजात असताना तिची साधी विचारपूस केली जात नाही. दोन वेळच्या अन्नासाठी किंवा प्रेमाच्या दोन शब्दांसाठी ती व्यक्ती आसुसलेली असते. पण, दैवगतीने तीच व्यक्ती जेव्हा जग सोडून जाते, तेव्हा मात्र तिच्या प्रतिमेसमोर (फोटोजवळ) ताट वाढले जाते. त्या ताटात खीर, पुरी, भजे, वडे आणि पंचपक्वान्नांचा थाट असतो.
हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर मनात एकच प्रश्न उभा राहतो – खरंच त्या फोटोतली व्यक्ती येऊन ते अन्न खाते का?
श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ
शास्त्र किंवा धर्म सांगतो की, आत्म्याला तृप्त करण्यासाठी हा नैवेद्य असतो. पण, चिकित्सेचा विचार केला तर मृत्यूनंतर फोटोतील व्यक्ती अन्नाचा घास कधीच घेत नाही. हे आपण सगळेच जाणतो. तरीही भीतीपोटी किंवा परंपरेचे ओझे म्हणून हा दिखावा वर्षानुवर्षे चालत आला आहे. जी व्यक्ती हयात असताना तिच्या आवडी-निवडीची, तिच्या आरोग्याची विचारपूस केली नाही, तिच्या ताटात दोन घास प्रेमाने वाढले नाहीत, ती गेल्यानंतर अशा प्रकारे नैवेद्य दाखवल्याने आत्म्याला खरंच शांती मिळेल का? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
"जिवंतपणीची हेळसांड आणि मरणोत्तर दिखावा"
आजकाल अनेक घरांमध्ये वृद्ध आई-वडील किंवा आजी-आजोबा कोपऱ्यात पडलेले असतात. त्यांच्या औषधपाण्याची, खाण्यापिण्याची हेळसांड होत असते. अनेक ठिकाणी तर जिवंत असताना त्यांना साधं-सुधा जेवण मिळणेही दुर्मिळ होते. त्यांच्याशी आदराने दोन शब्द बोलणारा कुणी नसतो.
पण गंमत अशी की, ज्या दिवशी तीच व्यक्ती जगाचा निरोप घेते, त्याच दिवशी आप्तस्वकीय शेकडो लोकांचे जेवण घालतात, ताटात वेगवेगळे पक्वान्ने सजवतात. हा जिवंत माणसाचा अपमान आणि मृत व्यक्तीचा केवळ देखावा नाही का?
आत्म्याला खरी शांती कशात मिळते?
खरी श्रद्धा आणि आत्म्याला शांती तेव्हाच मिळू शकते, जेव्हा आपण जिवंत माणसांच्या भावनांचा आदर करतो.
जर एखाद्या भुकेलेल्याला, गरजूला किंवा आपल्या घरातील ज्येष्ठांना त्यांच्या हयातीत प्रेमाने साधं पिठलं-भात, भाकरी किंवा वरण-भात खाऊ घातला, तर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान उमटते, तीच खरी ईश्वरसेवा आहे.
जिवंतपणी दिलेले एक वेळचे साधे जेवण आणि प्रेमाची फुंकर मृत्यून्यूनंतर दाखवलेल्या हजारो पक्वान्नांपेक्षा कैक पटींनी श्रेष्ठ असते.
एक पाऊल बदलाचे...
परंपरांचा स्वीकार जरूर करा असावा, पण त्यात विचार हवा, अंधळेपणा नको. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या फोटोसमोर ताट ठेवण्यापेक्षा, तो फोटो जिवंत असताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे जास्त मोलाचे आहे.
चला, आजपासून एक संकल्प करूया – मृत्यूनंतरच्या थाटामाटापेक्षा, आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्यासोबत असणाऱ्या प्रत्येक जिवंत माणसाच्या जगण्याला आणि खाण्यापिण्याला आपण मान देऊया. कारण, गेलेल्या माणसाला नैवेद्य मिळो ना मिळो, पण जिवंत माणसाला दोन वेळचे प्रेमाचे जेवण मिळाले, तर त्याचे जीवन नक्कीच धन्य होईल!
✍🏼सौ. मेघा श्रीराम ठोंबरे शेगाव महाराष्ट्र

0 टिप्पण्या