लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत पारंपरिक भोंडला उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/10/2026 : शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे पारंपरिक भोंडला कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक प्रशाला समितीच्या सदस्या माने, मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार व सर्व महिला शिक्षिका यांच्या हस्ते हत्तीचे पूजन करुन झाले.
भोंडला कार्यक्रमाचे महत्त्व व परंपरा याविषयी प्रशालेच्या सहशिक्षिका थोरात यांनी माहिती दिली. पूजनानंतर पारंपरिक भोंडला गीतांच्या तालावर उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापिका, महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी गोल फेर धरून विविध भोंडल्याचे खेळ खेळले. पारंपरिक गीतांनी व उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
यानंतर प्रत्येक वर्गातून आणलेल्या खिरापती ओळखण्याचा मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थिनींना भोंडल्याच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली तसेच एकोप्याची व आनंदाची भावना वृद्धिंगत झाली. प्रशालेच्या वतीने सर्वांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका भक्ती सोनकांबळे व काजल लोंढे यांनी केले. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


0 टिप्पण्या