विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/10/2026 :
आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस, म्हणजेच आदिशक्तीची दुसरी माळ! या नऊ दिवसांत आपल्या संस्कृतीत देवीची मनोभावे उपासना व पूजा-अर्चा केली जाते. घरोघरी कडक उपवास केले जातात आणि देवीचा भक्तीमय जागर मांडला जातो.
काही वडीलधारी माणसे या उपवासाच्या काळात मऊ गादीवर न झोपता जमिनीवर झोपतात; अनवाणी पायाने म्हणजेच चप्पल न घालता फिरतात. काही जण 'एकभुक्त' राहतात, म्हणजेच दिवसातून एकदाच फराळ करतात, तर काही जण केवळ फलाहार करून व्रतस्थ राहतात.
मुलांनो, हे सर्व कठीण सोपस्कार तुम्ही लहान वयात नाही केले तरी चालेल; पण या काळात काही चांगल्या आणि योग्य सवयी स्वतःला नक्की लावून घ्या. देवी म्हणजेच साक्षात आदिमाता, स्त्रीशक्ती! आपण देवीची मनोभावे उपासना करतो, याचाच खरा अर्थ आपल्याला स्त्रियांचा मनापासून आदर करता आला पाहिजे. याची खरी सुरुवात आपल्या घरातूनच... आई, ताई, आजी आणि काकी यांचा आदर करून व त्यांना कधीही उलट उत्तर न देण्याची सवय लावून करूया!
खऱ्या अर्थाने आदिशक्ती आणि स्त्रीशक्तीचा जागर अशाच संस्कारातून करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या