कुरुल येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती  विविध उपक्रमांनी साजरी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज / कुरुल ( प्रतिनिधी)

दिनांक 2/10/2026 :

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुरुल (ता. मोहोळ) येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले.

कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  रांगोळी, हस्ताक्षर, वक्तृत्व  आणि निबंध या स्पर्धा आणि विज्ञान व  चित्रकला प्रदर्शन इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी कुरुल गावातून  काढलेल्या  शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्य, लेझीम, झांज पथक, वारकरी दिंडी  आणि विविध सामाजिक विषयांवरील पथनाट्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.



साईसुमन मंगल कार्यालय येथे मुख्य कार्यक्रम स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य  विलास मारुती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव जे. जी. जाधव  व जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब बळीराम क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शत्रुघ्न जाधव, मेजर लिंगेश्वर निकम, विद्यालयाचे देणगीदार  विश्वनाथ बोंगे, दत्तात्रय बोंगे, अर्जुन बोंगे, प्रा. शिवव्याख्याते माऊली जाधव, वैभव जाधव यांच्यासह  चंद्रसेन जाधव,  बाबासाहेब जाधव, राजेंद्र जाधव,  गहिनीनाथ जाधव,  बाळासाहेब लांडे, म्हाळप्पा पुजारी, भारत जाधव,  सीताराम जाधव, अशोक क्षीरसागर, वासुदेव जाधव, चंद्रकांत लांडे, भैरू दादा भोसले इत्यादी अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

याप्रसंगी विद्यालयाच्या शाखा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

वक्त्यांच्या मनोगतातील ठळक मुद्दे :- 

"आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे आहे. यामध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी NMMS, स्कॉलरशिप यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभागी होऊन मेहनत घेतली पाहिजे. त्यातूनच उद्याचे उत्तम अधिकारी घडतील. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे."- बाबासाहेब  क्षीरसागर 


  "कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे महान कार्य केले. कर्मवीरांनी केवळ शैक्षणिक कार्यच केले नाही, तर तालमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुदृढ पैलवान आणि खेळाडू घडविले.-"प्रा. माऊली जाधव.


 रयत शिक्षण संस्था म्हणजे गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणाची खाण"-  जे. जी. जाधव


  कर्मवीरांनी स्वावलंबी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून तळागाळातील गोरगरीब, वंचित आणि बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांचे 'कमवा आणि शिका' हे ब्रीदवाक्य आजच्या तरुण पिढीला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देते" -  मुख्य वक्ते

शिवाजी श्रीपती सोनवणे 


 "कर्मवीर अण्णांनी लावलेला शिक्षणाचा छोटासा वटवृक्ष आज प्रचंड विस्तारला आहे. त्यांचे विचार व शिक्षण क्षेत्रातील योगदान हे येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत राहील."  कार्यक्रमाध्यक्ष विलास  पाटील

गुणवंत विद्यार्थ्यांचा व कुस्तीपटूंचा गौरव

कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील इयत्ता १० वी व १२ वी मधील प्रथम तीन क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल ओम रमेश जाधव, ओम प्रमोद लांडे, प्रतीक पंडित जाधव व इतर खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वस्ताद परमेश्वर जगताप यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.  

 प्रास्ताविक प्राचार्य बी. ए. देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक व्ही. एन. नागणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन  मडके पी. एस. व सौ. शेटे पी. पी. यांनी केले. आभार पर्यवेक्षक  बी. के. घार्गे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या