मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/10/2026 :
आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला जीवनात काही ना काही मोलाचे शिकवून जाते. त्या व्यक्तीमधील चांगले गुण आपल्याला समाजात कसे वागावे हे शिकवतात; तर त्यांच्यातील काही दुर्गुण आपल्या नजरेस आले, तर आपण तसे कधीही वागू नये हे आपण स्वतःच स्वतःला शिकवतो.
कोणतीही व्यक्ती पूर्णपणे सद्गुणी किंवा परिपूर्ण दुर्गुणी नसते; प्रत्येकाच्या अंगी काही गुण असतात, तसेच काही उणिवा वा दुर्गुणही असतात. मात्र स्वतःतील दुर्गुण कमी करत सद्गुणांची जोपासना करत राहावे हे जेव्हा माणसाला उमगते, तेव्हाच त्याचे आदर्श व्यक्तिमत्त्व घडते.
आपण प्रत्येकाने स्वतःतील दुर्गुण दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. खोलीतील विजेचे बटण दाबले की दिवा लागतो आणि अंधार क्षणात नाहीसा होतो; अगदी तसेच एक चांगला सद्गुण अंगी बाणवला की एक दुर्गुण आपोआप गळून पडतो. यासाठी सत्संगती ठेवणे व सुसंवादातून शिकणे फार महत्त्वाचे आहे.
आजचा संकल्प
आपल्याला घडवणारे दुसरे-तिसरे कोणी नसून आपण स्वतःच आहोत हे सदैव ध्यानात ठेवू; जाणीवपूर्वक सत्याची व सदाचाराची कास धरू आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या