■ अगरबत्तीच्या धुरामुळे..
■ खरोखरच डायबेटीस होतो ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/10/2026 :
भारतातील घरांमध्ये रोज पूजेच्या वेळी, सण समारंभामध्ये छान सुगंध येण्यासाठी अगरबत्ती लावली जाते. परंतु, अगरबत्तीच्या या धुरामुळे डायबेटीसचा धोका असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. इंटरनेटवर यासंदर्भात अनेक अफवा आणि अर्धवट माहिती आहे. भारतात आधीच डायबेटीसच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने यामागील नेमकं सत्य काय आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
झँड्रा हेल्थकेअरचे डायबेटीस व ओबेसिटी स्पेशालिस्ट डॉ. राजीव कोव्हिल यांच्या मते, इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये तथ्य नसून अगरबत्ती हा डायबेटीससाठी कोणताही थेट कारणीभूत घटक सिद्ध झालेला नाही. अगरबत्तीमुळे लोकांना डायबेटीस होतो हे सिद्ध करण्यासाठी सध्या पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. राजीव कोव्हिल यांनी इंडियन एक्स्प्रेसला याबाबतची माहिती दिली आहे.
हवेच्या प्रदूषणाविषयी चिंता नक्कीच व्यक्त केली जाते. सूक्ष्म कण सातत्याने शरीरात गेल्यामुळे इन्फ्लमेशन निर्माण होऊ शकतो आणि इन्सुलिनच्या संवेदन शीलतेवर परिणाम होऊ शकतो. परंतु, हा नियम थेट अगरबत्तीला लागू करून अगरबत्तीच्या धुरामुळे डायबेटीस होतो, असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.
*धुराचा रक्तातील साखरेवर परिणाम होतो का?* : अन्न, आजारपण किंवा काही औषधांमुळे जशी रक्तातील साखर थेट वाढते, तसा अगरबत्तीच्या धुरामुळे थेट परिणाम होतो, असा कोणताही ठोस पुरावा नाही. हा केवळ एक चिंतेचा विषय आहे. धुरातील प्रदूषकांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज येऊ शकते, ज्याचा संबंध इन्सुलिनच्या संवेदन शीलतेशी जोडला जातो. परंतु, विशेषतः अगरबत्तीच्या धुरामुळे वैद्यकीयदृष्ट्या असा थेट परिणाम होतो का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अगरबत्तीच्या धुरामध्ये सूक्ष्म कण, कार्बन मोनॉक्साइड आणि व्होलॅटाइल ऑरगॅनिक कंपाऊंड्स असतात. हे घटक शरीरात गेल्यावर जळजळ किंवा सूज निर्माण करू शकतात. पण जैविक प्रक्रिया घडणे आणि प्रत्यक्ष आजार होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
*रोजच्या वापराचा जास्त परिणाम होतो का?* : धुराचं प्रमाण, वेळ आणि वारंवारता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. चांगली हवा खेळती असलेल्या खोलीत कधीतरी एक अगरबत्ती जाळणं आणि बंद खोलीत दररोज तासनतास धुराच्या संपर्कात राहणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे सण उत्सव किंवा धार्मिक विधींमध्ये कधीतरी लावली जाणारी अगरबत्ती पाहून भीती बाळगण्याचं कारण नाही. खरी काळजी बंद खोलीतील हवेच्या गुणवत्तेची घेतली पाहिजे.
*आधीच डायबेटीस असलेल्यांवर याचा परिणाम होतो का?* : डायबेटीसच्या रुग्णांना अगरबत्तीच्या धुराचा अतिरिक्त धोका असतो, असं दर्शवणारे ठोस पुरावे नाहीत. परंतु, डायबेटीसच्या रुग्णांना आधीच हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो आणि प्रदूषित हवेचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असतो. त्यामुळे ज्यांना मधुमेह, हृदयविकार किंवा श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी बंद खोलीत धूर साचू न देणे हेच आरोग्यासाठी हिताचे ठरेल.
*नैसर्गिक अगरबत्ती सुरक्षित असते का?*
नैसर्गिक किंवा सेंद्रिय म्हणून विकल्या जाणाऱ्या अगरबत्त्या जळतानाही सूक्ष्म कण तयार होतातच. त्यामुळे एखादी विशिष्ट अगरबत्ती डायबेटीसला आमंत्रण देते, असे सिद्ध करणारा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. अगरबत्ती जाळल्यामुळे डायबेटीस होतो या दाव्यात तथ्य नाही. फक्त बंद खोलीत जास्त धूर साचू न देणं आणि घरात हवा खेळती ठेवणं ही काळजी घेणं पुरेसं आहे.
डॉ. राजीव कोव्हिल
झँड्रा हेल्थकेअरचे डायबेटीस व
ओबेसिटी स्पेशालिस्ट
====================

0 टिप्पण्या