सप्टेंबर महिन्याचा लेखाजोखा...!!!

 

सप्टेंबर महिन्याचा लेखाजोखा...!!!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

खूप वेळा अनेक संस्था व्याख्यानासाठी बोलावतात. व्याख्यान झाल्यानंतर लोक सद्गदित होऊन भेटायला येतात, म्हणतात, 'डॉक्टर आम्हाला सुद्धा सेवा करायची आहे पण...'

 व्यक्तीपरत्वे या "पण" च्या पुढची वाक्ये बदलतात...

तिथून बाहेर पडेपर्यंत, इथून तिथून, सेवा... सेवा...सेवा... हेच शब्द कानावर येत राहतात...

घरी येताना "सेवा" या शब्दामुळे मी सुद्धा कितीतरी वेळा अंतर्मुख व्हायचो ...!

खरंच सेवा म्हणजे काय...? 

या सेवेला काही व्याख्या आहे का...???

असं हजार वेळा अंतरबाह्य ढवळून निघाल्यानंतर, मी माझ्या मनात, आलेल्या अनुभवांवरून सेवेची सोपी व्याख्या ठरवली ती अशी : 

*"कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता, आपल्याकडे जे काही आहे, त्याचा उपयोग करून, दुसऱ्याचं दुःख कमी करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे सेवा...!!!"*

एक स्नेही बोलता बोलता म्हणाले, 'अरे अभिजीत, सेवा म्हणजे प्राणिमात्राची केलेली "भक्ती" रे ...'

होय तेही खरंच आहे...! 

पण, पुन्हा प्रश्न पडला भक्ती म्हणजे काय...? 

पुन्हा ढवळून निघालो...

*"समोर जे कुणी आहे त्याचं अस्तित्व मनापासून मान्य करून, आपण थिटे आहोत हे स्वीकारून, निष्ठेनं आणि श्रद्धेनं केलेलं आत्मसमर्पण म्हणजे भक्ती...!!!"*

भक्ती आणि सेवेच्या संकल्पना आता माझ्या मनात नितळ पाण्यासारख्या स्वच्छ आहेत...! 

जीव हलका हलका झाला...! 

खरंतर भक्ती आणि सेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू...! 

सेवा हातानं होते, भक्ती हृदयानं...!

पण जेव्हा भक्ती हातात अवतरते, तेव्हा हृदयापासून केलेली ती सेवाच ठरते ...!!

बघा ना...

भक्ती अन्नात शिरते तेव्हा ती प्रसाद होते...

भक्ती भूकेत  शिरते तेव्हा ती उपवास होते...

भक्ती पाण्यात शिरते तेव्हा ती तीर्थ होते...

भक्ती प्रवासाला निघते  तेव्हा ती वारी होते...

भक्ती संगीतात शिरते तेव्हा ती भजन होते...

भक्ती माणसात  शिरते तेव्हा ती माणुसकी  होते...

भक्ती घरात शिरते तेव्हा ती मंदिर होते...

भक्ती डोक्यात शिरते तेव्हा ती ध्यान होते...

आणि भक्ती हातात शिरते तेव्हा ती सेवा होते...!

आपणही भक्ती भावाने माणुसकीची पूजा करत आहात, सेवा करत आहात, मी फक्त तुमच्या आरतीत, टाळ्या वाजवणारे हात म्हणून उपस्थित असतो, बाकी माझा काही रोल नाही ...!!!

आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर...! 

रस्त्यावर प्रथमोपचार स्वरूपाची वैद्यकीय सेवा देतच आहे, आवश्यक असणाऱ्या रक्त लघवी तपासण्या करवून घेत आहे,  यासोबत कुबड्या, काठ्या, मानेचे,कमरेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने देत आहे. परंतु जे रस्त्यात करणे शक्य नाही अशा गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी ऍडमिट करत आहे. 

1. एक गंभीर रुग्ण, संपूर्ण दीड महिना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, परंतु आता संपूर्णपणे बरा आहे एक जीव वाचला. 

2. दुसरा एक जण वेगळ्या आजाराने त्रस्त. यालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आता तोही संपूर्ण बरा आहे, दुसराही जीव वाचला. 

दोघांसाठी प्रचंड खर्च आला, अर्थात अप्रत्यक्षपणे आपणच तो केलात. बरं झाल्यानंतर दोघांनी कृतज्ञतेने हात जोडले, त्यांच्या हातांची दिशा मी तुम्हा सर्वांकडे फिरवली...! 

माझ्यासाठी काही करायचं असेल तर भीक मागणं सोडा म्हणालो, त्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, दोघांनाही आपण व्यवसाय टाकून देणार आहोत. 

"भिक्षेकरी"म्हणून जगले आता "गावकरी" म्हणून जगतील...!

3. एक ताई, आपल्या लहान मुली बरोबर भीक मागायची. गणेश उत्सवापूर्वी, सजावटीसाठी  लागणारे साहित्य उदा. आरास, रुमाल, आसन, पूजा साहित्य इत्यादी घेऊन दिले आहेत. ही ताई हे साहित्य विकून आपला उदरनिर्वाह सन्मानाने चालवेल. 

4. अशीच एक दुसरी ताई, मुला बाळांना घेऊन भीक मागते. तिलाही सजावटीसाठी लागणारे तथा वरील प्रमाणे साहित्य घेऊन दिले आहे. 

 फोटोत दिसणाऱ्या मुलामुलींना शाळेत घातलं आहे. 

घरातले एक मूल शिकले तर पुढच्या पिढ्यांना ते भीक मागू देणार नाही, हे बघायला मी असेन नसेन, परंतु बीज तरी रोवलं आहे. 

5. वृद्धापकाळात घर सोडावे लागलेले एक आजारी आजोबा, रुग्णालयात यांच्यावर आधी उपचार केले, शुचिर्भूत केले, नवीन कपडे दिले. 

वृद्धत्वामुळे शारीरिक क्षमता कमी, आणि म्हणून वजन काटा देऊन बैठा व्यवसाय सुरू करून दिला आहे. 

आता हौशे नवशे गवशे लोक येतील, या वजन काट्यावर वजन करतील आणि या बाबांना पैसे देतील. लोकांनी केलेल्या "वजनामुळे" बाबांच्या डोक्यावरचा जगण्याचा "भार " थोडा तरी कमी होईल. 

6. एक प्रौढ मावशी, झोपडपट्टीत राहणारी परंतु तरुण कमावता मुलगा नुकताच गेला, अत्यंत विमनस्क अवस्थेत नाईलाज म्हणून जगण्यासाठी भीक मागू लागली. 

दरवेळी "पोरगं गेलो हो...." म्हणून गळ्यात पडून हंबरडा फोडायची...

हाच धागा पकडून तिला लहान मुलांची खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. 

खेळण्याच्या निमित्ताने मुलं तिच्याकडे येतील आपोआप काही बाही बोलणं होईल आणि आपला मुलगा गेला या आठवणीवर थोडा वेळ तरी पडदा पडेल....! 

काँग्रेस भवन, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर परिसर येथे फिरून ती हा व्यवसाय करते. 

असा हा स्वार्थातून परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

 या सर्वांना  हा जो व्यवसाय टाकून दिला आहे, यात काही लाखो रुपयांची उलाढाल होणार नाही, एका रात्रीत हे लोक काही श्रीमंत होणार नाहीत, याची मलाही जाणीव आहे. 

परंतु हे छोटे व्यवसाय म्हणजे, त्यांनी भीक मागणे सोडून गावकरी होण्याच्या दिशेने टाकलेलं एक छोटं पाऊल आहे.

जगातली सर्वात मोठी नदी ॲमेझॉन...! 

या नदीत म्हणे सात सेकंदाला फक्त एक थेंब पडतो.

कुणी म्हणेल, 'छे, अशा एकेका थेंबामुळं कुठं एवढी मोठी नदी बनती का राव ...?'

खरंच आहे, एका थेंबामुळे एवढी मोठी नदी बनूच शकत  नाही, पण नदी बनते ती त्या एका थेंबा मुळे नाही, तर ती थेंबाच्या पडण्याच्या  सातत्याने....! 

इथं थेंब नाही, थेंबाचं सातत्य महत्त्वाचं...!!!

जिंकणारा नेहमीच फक्त वेगाने पळतो असं नाही, तो सातत्याने फक्त एक एक पाऊल पुढे टाकत असतो आणि वाटेत कुठेही थांबत नाही.... सातत्य हेच त्याच्या यशाचं रहस्य...! 

लाचारीच्या वृत्तीविरुद्ध  आमच्या लोकांनी टाकलेल्या पहिल्या पाऊलाचं प्रतीक आहे हे, यात सातत्य राहिलं पाहिजे याची थोडी जबाबदारी त्यांची आणि बाकी जबाबदारी माझी आहे असं मला वाटतं....

7.  या महिन्यात गणेशोत्सव येऊन गेला, या काळात रस्त्यावरील शेकडो गोरगरिबांना आपण मोदक आणि खिचडी दिली आहे, त्याचप्रमाणे तितक्याच लोकांना अन्नपूर्णा या प्रकल्पातून पूर्ण अन्न दिले आहे. 

भुकेल्याला अन्न देताना त्याचं पोट भरण्याआधी, आपलं मन समाधानाने भरून गेलेलं असतं हेच खरं ...

आपल्या अन्नातला केवळ एक घास, समोरच्या व्यक्तीची संपूर्ण आस असू शकते ...

नैवेद्य आणि प्रसादाचे ताट घेऊन बाप्पा मी तुझ्याच मंदिरातच निघालो होतो, परंतु वाटेतच रस्त्यात माझी परीक्षा घेण्यासाठी  मला देव, अल्लाह, येशू वेगवेगळ्या रूपात भेटले, उजव्या हाताची पाच बोटे तोंडाकडे नेऊन, डाव्या हाताने खपाटीला गेलेल्या पोटावर त्यांनी हात फिरवला,  मग मी हे सर्व त्यांनाच अर्पण केलं बाप्पा ... 

यावर त्यांनी हाताचे,गालाचे, कपाळाचे मुके घेतले...  गालावरून पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद दिले....

नव्हते देखावे... नव्हती आरास...नव्हता डीजे... नव्हता ढोल ताशा.... 

हे बसले होते काळ्याकुट्ट अंधारात, कचऱ्याने बरबटलेल्या जागेत, गंजलेल्या एका पाइपावर...

भारताची लोकसंख्या किती आहे ते त्यांना माहीतच असणार, आडबाजूला बसून कदाचित ते " माणुसकीची " संख्या मोजत होते...!

आता तुमाला म्हून कानात सांगतूय बरं, 'पन त्यादिशी म्या द्येव पायला...!!!'

नव्हते माझ्याकडे धूप दीप 

नव्हती माझ्याकडे पंचारती... I 

ना मी काही मागितले, ना त्यांनी काही दिले 

पण भक्ती घडली सेवेने, पदरी पडली तृप्ती.. II 

8. आमच्या भिक्षेकर्‍यांमध्ये एक गट आहे जो पोलादाहून टणक आहे, अजिबात जवळ येऊ देत नाहीत, मुलांना घेऊन भीक मागतात, शाळेचे नाव काढलं तरी अंगावर येतात. 

यावर एक तोडगा म्हणून या पालकांना आणि लहान मुलांना ऑक्टोबर महिन्यात आपण स्वेटर आणि गरम कपडे देणार आहोत, यानिमित्ताने त्यांनी आम्हाला त्यांच्यात घेतले तर , मग हातात हात घेऊन मुलांच्या शाळेचा हळूच विषय काढता येईल. 

रस्त्यावरची का होईना परंतु आपण एक शाळा सुरू करणार आहोत...

वह्या पुस्तके, चित्रकला वही, रंगीत खडू , रंगीत पेन्सिल, रंगीत खोडरबर, खेळणी यामुळे मुलं हरखून जातील, पालकांना सुद्धा आपण सोबत बसवणार आहोत, बेसिक अंकगणित आणि अक्षर ओळख शिकवणार आहोत. 

बघू तुमचे आशीर्वाद तर आहेतच, येत्या काही दिवसात ही मुले पालकांच्या मर्जीने शाळेत जातील अशी आशा आहे...! 

गरम कपडे देण्याच्या बहाण्याने, आपण या मुलांच्या अंगावर कायमची.,.. शिक्षणाची मखमली शाल टाकणार आहोत....!!!

यातली पाच मुलं जरी शाळेत गेली तरी आपण जिंकलो....! 

9. जे हात आधी भीक मागत होते अशांना फुलं आणून दिली आहेत, आता ते या फुलांचे गजरे करतात आणि विकतात...

ही फुलं कधी अंबाड्यात जातील, कधी वेणी होतील, कधी मनगटावर  गुंडाळली जातील, कधी तिरडीवर जातील तर कधी देवाच्या पायाशी जातील....

काहीही असो माझी तळागाळातली लोकं यानिमित्ताने माणूस होतील...! 

भीक मागणारे त्यांचे हात आता सुगंधी होतील...

10. थंडीच्या पार्श्वभूमीवर, रस्त्यावरील आई-वडिलांना हाताने शिवलेल्या नवीन ब्लॅंकेट ऑक्टोबर मध्ये  ( माझ्या लहानपणी मी याला गोधडी किंवा वाकळ म्हणत असे ) देणार आहोत. 

या महिन्यात फार काही नाही, परंतु आपल्या साथीने इतकंच करू शकलो... 

काही चुकत असेल तर मनमोकळेपणाने सांगावे, कारण झालेल्या गोष्टी खोडता येत नाहीत, पण दुरुस्त नक्की करता येतात...! 

चुकत असेल तर मी नक्की दुरुस्त करेन...

असो, आपणच केलेल्या कामाचा, या महिन्याचा हा भला बुरा लेखाजोखा आपणास सविनय सादर...

 1 ऑक्टोबर  2026 

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे

9822267357

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या