चांदापुरीच्या जैद पठाण यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुडभरारी!
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/10/2026 : चांदापुरी (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील पठाण वस्तीतील डाॅ.जैद जाकीर पठाण यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पठाण वस्ती येथील अमीरखान पठाण यांचे नातू व अकलूजचे बांधकाम व्यावसायिक जाकीर पठाण यांचे ते चिरंजीव असून, त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.एस. (जनरल सर्जरी) या पदव्या प्रथम श्रेणीत मिळवल्या आहेत. गावातील मुस्लिम समाजातून या स्तरावरील यश संपादन करणारे ते पहिले ठरल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ.जैद पठाण यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मेडियम स्कुल धवलनगर येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या ठिकाणी झाले. नीटच्या अभ्यासासाठी बाहेरील शहरात न जाता शाळेतच अभ्यास करून त्यांनी NEET परीक्षेत ७८५ रँक मिळवली. त्यानंतर लातूर येथे एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले. पुढे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.
आईचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्य आणि स्वतःची मेहनत यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता असते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. भविष्यात अल्पदरात शस्त्रक्रियेच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉक्टर जैद पठाण यांच्या यशामुळे चांदापुरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाचे ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक होत असून, सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर उच्च शिक्षणाची शिखरे गाठता येतात, याचा आदर्श जैद पठाण यांनी घालून दिला आहे. त्यांच्या यशामुळे गावातील नव्या पिढीला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळणार असून, भविष्यात उत्कृष्ट शल्यचिकित्सक म्हणून रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याच्या त्यांच्या ध्येयाला यश लाभो, अशा शुभेच्छा ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

0 टिप्पण्या