🔰 मानसवेध : सकारात्मक दृष्टिकोन,

 🔰 मानसवेध : सकारात्मक दृष्टिकोन,

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

आपण गेल्या आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी काय करायला काय पाहिजे, याची माहिती घेतली, मनाचं 'पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग' शक्य आहे, त्यासाठी काय करता येईल याचे आकलन आवश्यकच आहे.

१) आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट असेल तर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला मदत होईल. स्वतःसाठी काही कमी आणि दीर्घ कालावधीसाठी उद्दिष्ट ठरवावीत.

२) आयुष्यात घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं यांच्यातील चांगल्या गोष्टी पहाव्यात. कितीही प्रतिकूल गोष्ट असेल तरी त्यात काहीतरी चांगलं असतंच. फक्त पाहण्याची नजर हवी.

३) आयुष्यात नेहमी फक्त चांगलंच घडेल, आपल्याला अनुकूल अशाच गोष्टी घडतील ही अपेक्षा चुकीची आहे. त्यापेक्षा कितीही प्रतिकूल घडलं तरी त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे हा ठाम विश्वास असावा. हा. विश्वास असल्यास खरोखरच परिस्थितीला तोंड देण्याची ताकद निर्माण होऊ शकते. जीवनात कित्येक संकटं लीलया पेलणाऱ्या व्यक्तींची चरित्र आपल्यासमोर आहेत.

४) सकारात्मक स्वयंसूचना उपयोगी ठरतात. उदा. मी परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेन. ती क्षमता माझ्यात आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी निर्धाराने पुढं जात राहीन. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि मी ते करेन.

५) सर्जनशील संकल्पनेची तंत्रे खूप उपयुक्त ठरतात. परिस्थिती बिकट असते तेव्हा आपण त्यातून चांगल्या रीतीनं बाहेर पडत आहोत. यशस्वी होत आहोत अशा पद्धतीची सर्जनशील संकल्पना उपयोगी पडू शकतात. फक्त ती व्यवस्थित शिकून घ्यायला हवीत. नेल्सन मंडेला अनेक वर्षे तुरुंगात होते तेव्हा त्यांना बराच काळ जेमतेम सहा फूट रुंदी असलेल्या अंधाऱ्या, कोंदट सेलमध्ये ठेवलं होतं. त्यांनी म्हटलंय की, त्याकाळात मी सतत सकारात्मक विचार करायचो. त्याचा माझं मनोधैर्य टिकवायला आणि वाढवायला खूप उपयोग झाला. अतिशय बिकट आणि भयानक परिस्थितीतसुद्धा अशा व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. आपल्या रोजच्या जीवनातल्या चढउतारांना पेलायला आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवावा.

६) सतत तक्रारी करण्याची सवय बदलावी. गोष्टी, घटना मनाविरुद्ध घडत असल्यास काही काळ त्यातून मानसिक दृष्ट्या बाजूला होणं, तटस्थपणे मूल्यमापन करणं, तोडगा निघतंय का ते पाहणं, निघू शकत नसल्यास शांतपणे विनातक्रार आहे, त्याचा स्वीकार करणं महत्त्वाचं.

७) आयुष्यातलं विनोदाचं महत्त्व समजून घ्यायला हवं. सतत हसत राहण्याने आपण आनंदी राहतो आणि समोरच्यालाही प्रसन्न वाटतं. स्वतःवरही हसता यायला हवं. इतरांनी आपल्यावर केलेले विनोद 'एन्जॉय' करता यायला हवेत. मुळात या जगात गांभीयनि घ्यावी अशी एकही गोष्ट नाहीय. हे आयुष्य म्हणजेच 'कॉस्मिक जोक' आहे असंही म्हणता येईल.

८) आपल्यात कृतज्ञ राहण्याची भावना रुजवावी. आपल्याला जीवनाने दिलंय त्याबद्दल आपण कृतज्ञ असावं. योग्य वेळी योग्य व्यक्तींशी आपण ही भावना व्यक्त करावी. सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यासाठी कृतज्ञता वाटणं आणि त्याचबरोबर आवश्यक तेथे क्षमा मागण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याजवळ असावा.

९) सकारात्मक दृष्टिकोन संसर्गजन्य असतो. आपण जितके सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहू, तितका आपल्यातही तो रुजायला मदत होईल. त्याच बरोबर स्फूर्तिदायक आणि सकारात्मक लेखन वाचणं, विचार ऐकणं याचाही उपयोग होऊ शकेल.

आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीचं अनुकूल परिस्थितीत रूपांतर होऊ शकतं. लहानपणापासून मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचं बीज रुजवायला हवं. त्यानंच त्यांची व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं फुलतील. नकारात्मक विचार करणारा संधीतही अडचण शोधतो आणि सकारात्मक विचार करणारा अडचणीतही संधी शोधतो

डॉ. विद्याधर बापट

संकलन : प्रविण सरवदे, कराड

▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या