🔰 संवादसेतू - प्रिय डायरी…

 🔰 संवादसेतू - प्रिय डायरी…

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/10/2026 :

आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे हे बऱ्याच अंशी स्वतःच्याच हातात असते. मानसिक स्वास्थ्यामध्ये अडचणी निर्माण होतात, तेव्हा आपले विचार, भावना आणि कृती या तीन गोष्टींची मेंदूमधील साखळी बिघडते. आपण जसा विचार करतो तशीच भावना निर्माण होते आणि त्याप्रमाणे कृती कधी होते हे काही वेळा आपल्यालाच समजत नाही. त्यामुळे आपले विचार कोणते आहेत, हे समजणे चांगल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु रोजच्या धावपळीमध्ये आणि तणावात आपण स्वतःकडे इतके लक्ष देत नाही. विशेषतः पूर्वीच्या काळी काही लोक डायरी आणि हिशोबाची वही आवर्जून लिहीत. आताची बहुसंख्य मंडळी मात्र डायरी वगैरे लिहण्याचा कंटाळा करतात, असे लोकांशी बोलताना जाणवते. तंत्रज्ञानही त्याला काही अंशी कारणीभूत आहे.

समुपदेशक खूपदा *जर्नलिंग करा…* म्हणजेच रोजनिशी लिहा, भावनांचे जर्नल ठेवा, असा सल्ला देतात. हे जर्नलिंग म्हणजे रोज दिवस सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरात काय काय घडले, हे झोपण्यापूर्वी आठवावे. रोजच्या घटना आणि त्याबद्दल केलेला विचार लिहून काढावा. त्याचा स्वतःच्या भावना कळण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. त्या भावनांमध्ये नक्की कोणती भावना मानसिक आरोग्याला घातक आहे, ते समजणे सोपे जाते. असे आपण रोज लिहीत गेलो, तर सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार कोणत्या बाबतीत केले जात आहेत, हे समजण्यास मदत होते. आपली रोजची एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची गरजसुद्धा डायरी लिहिल्याने काही प्रमाणात पूर्ण होऊ शकते. दिवसभरात साचलेल्या भावना कागदावर उतरवल्या जातात. विचार कागदावर उतरवताना आपला विचारांचा गोंधळ कोणत्या बाबतीत होतोय हे समजते. त्याबद्दलच्या भावना योग्य का अयोग्य आहेत, हेसुद्धा तपासता येते. आपल्या चांगल्या वाईट सवयीही हे लेखन करताना आपल्याला दिसू लागतात, त्या सहसा इतर वेळा स्वतःच्या लक्षात येत नसतात. मग त्यासाठी योग्य पावले उचलता येतात.

रोज पाने भरभरून डायरी लिहिणे लगेच आवश्यक नाही. आठवणारी, आवश्यक वाक्ये जरी लिहिली, तरी हळूहळू त्याची सवय होते. ही सवय स्वतःच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात ठेवावे. दैनंदिन घटना, त्याबद्दलचे विचार, अनुभव जेव्हा रोज लिहिले जातात, तेव्हा त्याबद्दलच्या भावना लिखाणाद्वारे व्यक्त होतात. डोक्यात चाललेला विचारांचा गोंधळ कागदावर मार्गी लागतो. थोडे मोकळे वाटते. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसमोर त्यांच्या भीतीपोटी व्यक्त करत नाही. त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल, ही धास्ती असते. ती डायरी लिहिताना वाटत नसते. फक्त नकारात्मक गोष्टीच नाही, तर दिवसभरात मिळालेल्या चांगल्या गोष्टीची नोंद केल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता वाटते. हीसुद्धा एक चांगली भावना आहे. स्मरणशक्तीलाही या सवयीमुळे चालना मिळेल.

*विचार बदला नशीब बदलेल,* असा एक वाक्प्रचार आहे. ते बऱ्याच अंशी खरेच म्हणायला हवे. भूतकाळातील स्वतःचे अनुभव आठवलेत तर तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या बाबतीत विचार करत होता, तसे तुम्ही आज घडला आहात, असे लक्षात येईल. म्हणून सकारात्मक विचार करण्याचे महत्त्व असते. रोज लिखाण करण्याची सवय लागणे, ही स्वतःला एक शिस्त लावण्याची सुरुवात असू शकते. मग ताण कमी करण्यासाठी आपलेआपण काही प्रयत्न सुरू केले जातात. सुट्टीच्या दिवशी स्वतःला वेळ देणे, छंद जोपासणे, व्यायाम करणे, फिरायला जाणे, मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, ध्यानधारणा करणे, अशा विविध गोष्टी सुरू करणे, हा त्या शिस्तीचा भाग असतो. त्यामुळे आजपासूनच डायरी लिहायला सुरुवात करा. पानेच्या पाने नाही लिहिली, तर दिवसातल्या काही नोंदी तरी नक्कीच करत जा. कागदावर पेनाने नाही लिहिलेत, तर 'ई-डायरी'त लिहा. पण लिहा! मानसिक शांतता आणि तणावमुक्तीसाठीची ती एक पायरी ठरेल.

सावनी देशपांडे, समुपदेशक

संकलन : प्रविण सरवदे, कराड

▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या