अपेक्षा

 अपेक्षा 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/10/2026 : असंच विचार करता करता एक गोष्ट मला जाणवली. आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याकडे नाही, याचा आपण सकारात्मक विचार केला, तर त्याचा त्रास कमी होतो किंवा कदाचित होतच नाही. पण त्याच गोष्टीचा नकारात्मक विचार केला, तर मात्र नक्कीच त्रास होतो. तोही दुसऱ्या कोणाला नाही, तर स्वतःलाच!

उदाहरणार्थ, अपेक्षा!

हो, अपेक्षा! आपण इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतो. म्हणजे अमुक एका व्यक्तीने माझं हे काम केलं नाही, मला विचारलं सुद्धा नाही, फोन केला नाही, मेसेज केला नाही किंवा भेटायला आली नाही, अशा अनेक गोष्टींच्या आपण अपेक्षा करतो.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अलीकडे या गोष्टींनाही खूप महत्त्व आलं आहे. माझ्या वाढदिवसाला माझं स्टेटस ठेवलं नाही, त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा मी एखाद्याचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, तरी त्या व्यक्तीने माझे आभारसुद्धा मानले नाहीत, अशा अनेक गोष्टी आपण मनाला लावून घेतो.

अशाच अनेक अपेक्षा आपण इतरांकडून, विशेषतः आपल्या प्रिय व्यक्तींकडून ठेवतो. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपल्याला खूप त्रास होतो. एवढंच नाही, तर आपण स्वतःकडूनही अनेक अपेक्षा ठेवतो. एखादी गोष्ट आपल्याला करायची असते; पण काही कारणांमुळे ती करता येत नाही. अशा वेळीही आपण स्वतःलाच दोष देत बसतो आणि त्रास करून घेतो.

माझंसुद्धा असंच होत होतं. मी इतरांकडून किंवा स्वतःकडून अपेक्षा करायचे आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की मला खूप त्रास व्हायचा. चिडचिड व्हायची. मन अस्वस्थ व्हायचं.

पण नंतर मी याच गोष्टीचा दोन्ही बाजूंनी विचार करायला लागले आणि विचार करता करता एका निष्कर्षापर्यंत पोहोचले. तो म्हणजे, कोणतीही गोष्ट असो, तिच्याकडे शक्य तितक्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं.

सर्वप्रथम मी इतरांकडून अपेक्षा करणं कमी केलं. कधी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तरी त्याचा त्रास करून घेण्याऐवजी त्या गोष्टीचा सकारात्मक विचार करायला सुरुवात केली.

हळूहळू मला त्याचा फायदाच जाणवू लागला. मन शांत राहू लागलं आणि विनाकारण होणारी चिडचिडही कमी झाली.

म्हणूनच मी अपेक्षा करणं पूर्णपणे सोडून दिलं नाही; पण त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याचा त्रास करून घेणं सोडलं. त्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकले.

कारण अपेक्षा पूर्ण न होणं आपल्या हातात नसतं; पण त्या परिस्थितीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, हे मात्र बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं.

आणि जेव्हा आपण सकारात्मक विचार करायला शिकतो, तेव्हा अपेक्षा पूर्ण न झाल्या तरी मनाला होणारा त्रास नक्कीच कमी करता येतो.

✍️ ©️ सौ. धनश्री म्हेत्रस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या