दारा सिंग आणि किंग काँग
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 1/10/2026 :
भारतीय कुस्तीचा आणि मनोरंजनाचा इतिहास जेव्हा जेव्हा सांगितला जातो, तेव्हा एका नावाची आवर्जून चर्चा होते, ते म्हणजे 'रुस्तम-ए-हिंद' दारा सिंग. आपल्या ५०० हून अधिक सामन्यांच्या कारकिर्दीत एकही लढत न हरण्याचा विक्रम दारा सिंग यांच्या नावावर आहे. पण त्यांच्या कुस्तीच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्णक्षण आणि सर्वाधिक गाजलेला सामना कोणता असेल, तर तो म्हणजे १९५६ साली किंग काँग विरुद्ध झालेली महाभयंकर लढत.
किंग काँगचे मूळ नाव एमिल स्जाजा होते. तो मूळचा हंगेरीचा होता, पण ऑस्ट्रेलियाकडून खेळायचा. किंग काँगची शरीरयष्टी अत्यंत अवाढव्य होती. त्याचे वजन तब्बल २०० किलो (सुमारे ४४० पाउंड) होते. त्याचा भयानक चेहरा आणि विशाल शरीर पाहून भल्याभल्या मल्लांच्या छातीत धडकी भरायची. त्या काळात किंग काँग जगभरातील मल्लांना अक्षरशः धुळीस मिळवत होता.
१९५६ मध्ये भारतात कुस्तीचा एक मोठा थरार रंगणार होता. दारा सिंग आणि किंग काँग आमनेसामने येणार होते. किंग काँगच्या २०० किलो वजनासमोर १३० किलो वजनाचे दारा सिंग कसे टिकणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. स्टेडियम खचाखच भरले होते आणि प्रेक्षकांच्या श्वास रोखला गेला होता. सामना सुरू झाला आणि सुरुवातीला किंग काँगने आपल्या प्रचंड वजनाचा फायदा घेत दारा सिंग यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण दारा सिंग आपल्या चपळाईने त्याचे हल्ले परतवून लावत होते.
सामन्याच्या मध्यंतरी एक असा क्षण आला, ज्याने कुस्तीच्या इतिहासात कायमची नोंद केली. दारा सिंग यांनी अचानक किंग काँगला पकडले आणि आपल्या संपूर्ण ताकदीनिशी त्या २०० किलो वजनाच्या महाकाय मल्लाला चक्क आपल्या डोक्यावर उचलले. किंग काँग हवेत हातपाय मारत होता, पण दारा सिंग यांच्या पोलादी पकडीतून तो सुटू शकला नाही. दारा सिंग यांनी त्याला डोक्यावर गोल फिरवले आणि थेट रिंगच्या बाहेर भिरकावून दिले.
किंग काँग जेव्हा रिंगच्या बाहेर आदळला, तेव्हा स्टेडियम मध्ये एकच जल्लोष झाला. स्वतः किंग काँगलाही या गोष्टीचा धक्का बसला होता की, एखाद्या माणसाने आपल्याला डोक्यावर कसे उचलले? या एकाच दावाने दारा सिंग यांनी केवळ सामनाच जिंकला नाही, तर संपूर्ण जगाला आपल्या ताकदीची ओळख करून दिली. या सामन्या नंतर दारा सिंग रातोरात जागतिक सुपरस्टार बनले. त्यांच्या या अविश्वसनीय कामगिरीची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरातील वृत्तपत्रात झाली. पुढे चित्रपटसृष्टीतही 'बजरंगबली' आणि 'हनुमान' यांसारख्या भूमिका साकारून त्यांनी भारतीयांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
[ *═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या