🔰 हल्ली मुलांना इतका राग का येतो?
🟣 मुलं चिडचिड करतात, पालकांना ब्लॅकमेल करतात,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/10/2026 :
छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना पाहून पालकांना अत्यंत अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. कौटुंबिक वाद, मुलांवर असलेला ताण, मुलांच्या आत्महत्या या आणि अशा प्रकारच्या घटना आपल्या भोवताली सातत्याने घडताना दिसतात, अगदी या टोकाच्या नसल्या तरी आपल्याला एखादी गोष्ट मिळावी यासाठी चिडचिड करणं, आदळ आपट करणं, घर सोडून जाण्याची धमकी देणं यासारख्या गोष्टी मुलं करतात. त्यांना राग जास्त येतो. तीव्र भावनिक होत पालकांना ब्लॅकमेलही केलं जातं.
*हे 'असं' का होतं?*
एक तर आजच्या काळात समाज माध्यमांमुळे मुलांसमोर एक अवकाश खुलं झालं आहे आणि त्याचबरोबर त्यांची स्वप्नेसुद्धा विस्तारली आहेत. राहण्याच्या, जगण्याच्या कल्पनाही बदलल्या आहेत. बऱ्याचदा असं दिसतं की मुलं समाज माध्यमांवर आधारित आपले जगणे ठरवतात आणि तसा हट्ट धरतात, ते मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी घरून नकार मिळाला की मग चिडचिड, आदळआपट करतात. अनेकदा आपल्या भोवतालच्या मित्र मैत्रिणींमध्ये वावरतानाचा स्टेटस सिम्बॉल म्हणूनही अशा गोष्टी हव्या असतात. मग ते वेगवेगळे फॅशनचे कपडे असोत, फोन असो किंवा अजून काही. यात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तोही नाकारता येणारा नाही. बन्याचदा आई-वडील आपल्या मुला-मुलीने चांगला अभ्यास करावा, परीक्षेत चांगलं यश मिळवावं यासाठी महागडा फोनसारख्या वस्तूंचं किंवा अजून काही महागड्या गोष्टीचं आमिष समोर ठेवतात. हेतू चांगला असतो, मुलांनी अभ्यास करावा, पण त्याचा परिणाम वेगळा होतो. मुलं आई वडिलांना त्यावरून ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात.
त्यातही आजच्या इन्स्टंट जमान्याचा मुलांवर इतका प्रभाव आहे की आपल्याला "हवं ते लगेच मिळालंच पाहिजे," अशी मानसिकता नकळत तयार होत आहे, समाज माध्यमांवरील गोष्टीही त्यासाठी आग्रही असतात. सतत 'स्टेटस अपडेट' ठेवायला त्यांना आवडतं. 'लाईक्स' मिळवायला आवडतात. अशा परिस्थितीत जेव्हा मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नकार मिळतो, तेव्हा तो स्वीकारण त्यांच्यासाठी खूप कठीण जातं. कारण त्यांची भावनिकता त्यांच्याशी जोडली गेलेली असते. नकार हा त्यांना स्वतःचा अपमान वाटू लागतो. अनेक मुलं रागावतात, चिडतात, आदळआपट करतात, भांडणं करतात. काही मुले स्वतःलाच इजा करून घेतात किंवा "मला जगायचं नाही," अशा टोकाच्या प्रतिक्रिया देतात. नकार हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वावर झालेला आघात वाटू लागतो.
*घरात अस्वस्थता वाढते.*
एक नक्की की मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट पालक मुलांना मिळवून देऊ शकत नाहीत, आणि ते पालकांचं कामही नाही. पण प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याची ताकद पालक मुलांना नक्कीच देऊ शकतात. हीच ताकद त्यांना भविष्यात आनंदी, जबाबदार आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती बनवू शकते.
*पालकांनी काय करायचं?*
◆सर्वप्रथम शांत राहणं गरजेचं आहे. मुलांच्या रागाला रागानं उत्तर दिलं, तर परिस्थिती अधिक चिघळते. मुलं ओरडतात म्हणून आपण ओरडू नये. "तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे," किंवा "तुझी निराशा मला समजते," असे शब्द मुलांना भावनिक आधार देतात. त्यांच्या भावना समजून घेतोय हे त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा राग हळूहळू कमी होऊ लागतो.
◆पालकांनी मुलांशी खुला/मोकळा संवाद ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे, प्रेमभंग, मैत्रीतील मतभेद किंवा परीक्षा-स्पर्धेतलं अपयश यांसारख्या विषयांवर मुलं सहज बोलू शकतील, असं वातावरण घरात असायला हवं. मुलं बोलत नाहीत, कारण त्यांना आपल्यावर टीका होईल किंवा खिल्ली उडवली जाईल अशी भीती वाटते.
◆अचानक नाही नाही म्हणणं योग्य नाही. नकार हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे मुलांना लहानपणापासून अनुभवातून शिकवणं आवश्यक आहे. मुलं ८-९ वर्षांची होतात तेव्हापासून या विषयावर सातत्याने संवाद व्हायला हवा. मागितलेली प्रत्येक वस्तू मिळणार नाही, प्रत्येक इच्छा पूर्ण होणार नाही, प्रत्येक स्पर्धेत यश मिळणार नाही आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला स्वीकारेलच असं नाही. हे वास्तव समजलं की मुलांची मानसिक ताकद वाढते.
◆पालकांनी स्वतःच्या आयुष्यातील अपयश आणि त्यातून शिकलेले धडे मुलांना सांगितले तर त्यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मुलांना घरातल्या प्रत्येक निर्णयांमध्ये सहभागी करावं. ११-१२ वयानंतर घरातील निर्णय मुलांच्या मदतीने घ्यावेत. मुलांना आपलं घर आणि घराची आर्थिक परिस्थिती याची समज यायला मदत होते. ती विचारी व्हायला लागतात.
◆आपली मुलं समाजमाध्यमांवर काय करत आहेत? ती तिथे काय पाहतात ? त्यातून स्वतःबद्दलच्या काय कल्पना वा प्रतिमा तयार करत आहेत, हे मुलांशी बोलून समजून घेतलंच पाहिजे. काय खरं व काय आभासी हे सतत बोललंच गेले पाहिजे.
◆आणखी एक गोष्ट आज अतिशय महत्त्वाची झालेली आहे. मुलांना (आणि मोठ्यांनाही) भावनांचं व्यवस्थापन शिकवणं, राग आला तर काही वेळ शांत बसणं, खोल श्वास घेणं, विश्वासू व्यक्तीशी बोलणं, खेळ, संगीत, वाचन किंवा व्यायाम यांसारख्या सकारात्मक मार्गानी भावना व्यक्त करणं त्यांना शिकवलं पाहिजे. मोठ्यांनीही मुलांसोबत हे केलं पाहिजे. या सवयी आयुष्यभर उपयोगी पडतात.
◆एखादं मूल वारंवार स्वतःला इजा करण्याची भाषा करत असेल, सतत नैराश्यात राहत असेल, तर ते दुर्लक्षित करू नये. समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं हा कमीपणा नसून ती आपली जबाबदारी आहे.
✍️ प्रसाद मणेरीकर,
शिक्षण अभ्यासक,
pmanerikar@gmail.com
✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड
▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣
0 टिप्पण्या