📖✒️भावनेच्या भरात घेतलेले निर्णय : पश्चाताप की आयुष्याचा नवा धडा?✍️

 

📖✒️भावनेच्या भरात घेतलेले निर्णय : पश्चाताप की आयुष्याचा नवा धडा?✍️

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/10/2026 :

​आज मी श्रद्धा-धनेश, माझ्या डायरीतील आयुष्याच्या माझ्या अनुभवाचं एक खास आणि अतिशय जिव्हाळ्याचं पान तुमच्यासमोर उघडून ठेवतोय जो एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याशी थेट जोडलेला ही विषय असू शकतोय.

​आयुष्यात कधी न कधी आपल्या सर्वांकडून भावनेच्या भरात काही निर्णय चुकतात. आणि हे मी अगदी उघड्या डोळ्यांनी मान्य करतो, कारण माणूसच चुकतो ना, शेवटी आपण काही देव नाही आहोत सर्वगुणसंपन्न असायला हो ना?

​पण यावर जर आपण थोडा सखोल विचार केला, तर देवाने आपल्या प्रत्येकाला विचार करण्यासाठी बुद्धी तर नक्कीच दिली आहे. त्यामुळे जेव्हा आपली चूक आपल्या लक्षात येते, तेव्हा ती चूक योग्य वेळी, योग्य पद्धतीने सुधारण्यासाठी जर आपण आपल्या बुद्धीचा वापर करू शकलो नाही. तर मला वाटतं, आपण माणूस म्हणून जगायच्या योग्यतेचेही राहत नाही.

​आयुष्यात येणारी माणसं, प्रसंग, परिस्थिती, नाती, अचानक येणारी संकटं, या सगळ्यांमध्ये जर आपल्याला एक लयबद्ध ताळमेळ बसवायचा असेल, तर आपल्या विवेकबुद्धीचा पुरेपूर वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. मी तर म्हणेन, ते अतिआवश्यकच आहे.

​नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपण अगदी मनापासून, निर्मळ आणि सहज भाव ठेवून एखादं नातं निभावत राहतो. आपल्या आयुष्याचं बंद पुस्तक आपण समोरच्या माणसासमोर पूर्णपणे उघडं करून ठेवतो. पण समोरची व्यक्ती मात्र आपलं डोकं चालवून, आपला पुरेपूर फायदा घेते आणि वेळ आली की दुधातल्या माशीसारखं आपल्याला लांब फेकून देऊन आपल्या आयुष्यातून कायमची निघून जाते, मग शेवटी आपल्या पदरात फक्त पश्चाताप आणि मनस्ताप उरतो.

म्हणूनच, असं घडण्याआधीच वेळेवर योग्य आणि सावध निर्णय घेतलेला कधीही चांगला. आणि हो, आपल्याला असा कडवट अनुभव देऊन जाणारी ती व्यक्तीसुद्धा आपल्याला आयुष्याचा एक नवीन धडा शिकवून गेली, म्हणून मनोमन तिचे आभार मानायचे आणि पुढे जायचं.

©️श्रद्धा धनेश डायरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या