मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/10/2026 :

शारदीय नवरात्रीची आज तिसरी माळ! स्त्रीशक्तीचा जागर करताना आपण स्वतःच्या वर्तनाचे प्रामाणिक आत्मपरीक्षण करूया; जेणेकरून आपण केवळ देवीच्या मूर्तीची पूजा करून वरवरचा देखावा करतोय, की प्रत्यक्ष जगताना घरातील व समाजातील खऱ्या स्त्रीचाही आदर-सन्मान करतोय, याचे प्रत्येकाला अंतर्मुख होऊन उत्तर शोधता येईल.

अनेकदा आपण घरात आपल्या पत्नीशी किंवा मुलींशी विनाकारण फटकून वागतो, हवे तसे बोलतो. जिच्या उदरात नऊ महिने वाढलो, जिने जन्म दिला, त्या जन्मदात्या मातेला उद्धटपणे उलट बोलतोच; पण संतापाच्या भरात शिव्या देतानाही आईचाच उद्धार करतो. हा दुटप्पीपणा कितपत योग्य आहे?

दुसऱ्या बाजूला, स्त्रियासुद्धा अनेकदा एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने न वागता एकमेकींचा द्वेष करतात, हेवादावा करतात. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कमी लेखते, तिच्याशी अकारण चढाओढ करून कटुता वाढवते. म्हणून स्त्रियांनीही आपापसांत एकी ठेवून एकमेकींशी स्नेहाने व सहकार्याने वागले पाहिजे.

आजचा संकल्प

आपण प्रत्येक जण स्त्री-पुरुष असा संकुचित भेदभाव न करता माणूस म्हणून एकमेकांशी निर्मळ माणुसकीने वागू; मातृशक्ती व स्त्रीशक्तीचा अंतःकरणातून आदर करू आणि पुरुषांशीही सौजन्याने वागू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या