पाप किया तब, छुपना क्या !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/10/2026 :
पाप म्हणजे स्वतःच्या सुखासाठी किंवा स्वार्थापोटी इतर जीवांना पीडा किंवा त्रास देणे म्हणजे पाप कर्म होय. पुण्य म्हणजे कोणत्याही परताव्याची अपेक्षा न करता इतरांना मदत करणे आणि उपकार करणे म्हणजेच पुण्य होय. आपण जसे कर्म करतो तसेच फळ आपल्याला मिळते. पाप करणाऱ्याचे मन नेहमी अस्वस्थ आणि भयभीत राहते - "जैसा कर्म करेगा, वैसा फल देगा भगवान" भगवतगीता म्हणते की, जसा कर्म करशील तसे फळ तुला ईश्वर देईल. म्हणूनच "जशी करणी तशी भरणी" माणूस जेव्हा पाप करतो, खोटं बोलतो, व्यसन करतो, चोरी करतो तेव्हा त्याला वाटतं की हुशारी केली. कोणाला कळलं नाही. "पाप करून पापी मन हे सैरावैर पळतय रं। काय केलं भल्या माणसा, देवाला सारं कळतय रं।" पाप केल्यानंतर त्याचं मनच त्याला खातं. रात्रभर झोप लागत नाही, सारखी भीती वाटते. कोणी पाहिलं का? कोणी सांगेल का? मन सैरावैरा पळतं पण देवाला म्हणजे आपल्या आतील आत्म्याला, मनाच्या साक्षीला हे सगळं कळतं. तेच त्याला टोचत राहतं.
पाप किया तब, छुपना क्या ।
पाप किया, पापी नहीं है मैं ।
यो चोरी से, रहना क्या ॥ ध्रु॥
माणसाकडून चूक/पाप घडणं हा स्वभाव आहे, पण खरी चूक ती लपवण्यात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्याकडून पाप झालं हे मी मान्य करतो, पण एका पापामुळे मी आयुष्यभर पापी ठरत नाही, जर मी मनापासून पश्चाताप केला आणि देवासमोर / समाजासमोर कबूल केलं तर मी पुन्हा शुद्ध होऊ शकतो. म्हणून घाबरून, लपून राहण्यापेक्षा उघडपणे सत्य स्वीकारणं चांगलं आहे. उदा:- व्यसन हे पापासारखंच आहे, लपवल्याने वाढतं आणि कबूल केल्याने व्यसन सुटतं. व्यसनी माणसाने चूक सुधारायची आहे, तर लोक त्याला मदत करतील, हसणार नाही. चूक मान्य करा, लपवू नका, लपवल्याने पाप मोठं होतं आणि कबूल केल्याने माणूस मोठा होतो.
किसीकी जिंदगी, कोई उठाना |
यही जानवर, का है बाना |
कुत्ते की ही, मौत जगत में |
क्या कहो, वैसे मरना क्या?
पाप किया तब छुपना क्या ॥१॥
दुसऱ्याच्या जीवावर उठणं, दुसऱ्याचं जीवन बरबाद करणं हे तर जनावराचं लक्षण आहे. जगात कुत्र्याच्या मौतने मरणं (म्हणजे व्यसनाने सडून वेदनेने मरणं) बरं असं म्हणावं का? आपल्या व्यसनासाठी दुसऱ्याच्या सुखाचा बळी देणं हे माणसाचं काम नाही. अरे माणसा असं जनावरासारखं जगून आणि कुत्र्यासारखं तडफडून का मरायचं? तू माणूस आहेस, माणसासारखा जग आणि माणसासारखा मर. पाप घडलं असेल तर ते लपवू नकोस. आता तरी सुधर. उदा:- एका गावात एक माणूस दारू प्यायचा, पण एके दिवशी त्याला हा विचार पटला. तो म्हणाला मला असं मरायचं नाही. त्याने व्यसन सोडलं, आता तो चांगलं जीवन जगतोय, त्याच्या मरणालाही लोक नमस्कार करतील.
रावण ने, सीता उठा लायी ।
रामचंद्र ने, किया लडाई ।
वैसे सबपर, बीते जब तो ।
फेर तमाशा करना क्या?
पाप किया तब छुपना क्या ॥२॥
रावणाने सीता पळवून आणली. रामचंद्राने त्यासाठी लढाई केली, तसंच सगळ्यांवर जेव्हा वेळ येते, तेव्हा पुन्हा तमाशा कशाला करायचा? जसे रावणाने सीतेला पळवलं तसं व्यसन हे आपल्या घरातली लक्ष्मी, सुख, शांती, इज्जत पळवून नेतं. मग तिला परत आणण्यासाठी रामासारखीच मोठी लढाई करावी लागते. म्हणजे व्यसन सोडण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. रामाला पण वनवास भोगावा लागला, तसं प्रत्येक माणसावर चांगली-वाईट वेळ येते. म्हणून जेव्हा वाईट वेळ येते, दुःख येते, तेव्हा त्याचा तमाशा न करता, लोकांना न सांगता, शांतपणे भोगून, सुधारून पुढे जायचं. पाप झालं तर ते मान्य करायचं, त्याचा बाजार मांडायचा नाही. आतापर्यंत जे काही झालं ते झालं, आता पुढचं चांगलं करू या, ही वृत्ती ठेवावी.
जिसकी है लाठी, भैंस उसीकी |
यही थी दुनिया, थोडी पिछुकी |
तुकड्यादास कहे, अब तोभी ।
वैसे अनाडी रहना क्या?
पाप किया तब छुपना क्या ॥३॥
ज्याच्या हातात काठी (सत्ता, ताकद) त्याचीच भैंस (न्याय त्याच्या बाजूने) अशीच दुनिया थोडी मागे होती, पण तुकड्यादास म्हणतात, आता तरी अडाणी राहून कसं चालेल. "जिसकी लाठी उसकी भैंस" ही जुनी म्हण आहे. पूर्वी जो बलवान तोच न्याय करायचा. गरीबाला न्याय नव्हता, श्रीमंत, पुढारी म्हणेल तेच खरं - राष्ट्रसंत म्हणतात, ही दुनिया थोडी मागे-पुढे अशीच होती. व्यसनाच्या दुनियेत पण तेच होतं. दारू विकणारा बलवान आणि गरीब माणूस त्याचा गुलाम. पण आता काळ बदलला आहे. आता डोळे उघडा. एवढं सगळं कळून पण अजूनही अडाण्या सारखे, न समजल्या सारखे वागून व्यसनात राहायचे का? पूर्वी अज्ञानामुळे पाप झालं असेल, व्यसन केलं असेल, तर आता तरी ते लपवू नका, शहाणे व्हा. जसे- एखादा माणूस म्हणतो, दारू प्यायल्याने काही होत नाही, सगळेच तर पितात. हे अनाडीपणाचे बोलणं झालं. सगळं माहित असून पण अडाणी राहण्यासारखं आहे.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन - 9970404180


0 टिप्पण्या