■ जोसेफ स्टालिनच्या मृत्यूची कथा !
■ हुकूमशाहीची सर्वांत मोठी किंमत
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
१९०७ साल. जोसेफ स्टालिन तेव्हा सोव्हिएत रशियाचा सर्वशक्तिमान हुकूमशहा नव्हता. तो अजून क्रांतिकारी चळवळीत काम करणारा तरुण होता. त्याची पहिली पत्नी कातो स्वानिद्झे आजाराने मरण पावली. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्टालिन पूर्णपणे कोसळला होता.
त्याचा बालमित्र इओसेब इरेमाश्विली याने नंतर लिहिलेल्या आठवणीनुसार, शवपेटीकडे पाहत स्टालिन म्हणाला, “या स्त्रीने माझं दगडासारखं हृदय मऊ केलं होतं. ती गेली आणि तिच्या बरोबर माणुसकी बरोबरचं माझं शेवटचं भावनिक नातंही संपलं.” हे वाक्य त्या क्षणी शब्दशः बोलले गेले होते का, याचा स्वतंत्र समकालीन पुरावा उपलब्ध नाही. पण स्टालिनच्या पुढील आयुष्याकडे पाहिलं, तर हे वाक्य त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं भयानक रूपक वाटतं.
पुढील काही दशकात स्टालिन सोव्हिएत संघाचा सर्वशक्तिमान नेता झाला. राजकीय विरोधकांना फाशी देण्यात आली. लाखो लोकांना गुलाग मधील सक्तीच्या श्रमछावण्यात पाठवण्यात आलं. संपूर्ण समाजावर जबरदस्तीचं विस्थापन लादण्यात आलं. त्याच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या दुष्काळात लाखो लोक मृत्युमुखी पडले. स्टालिनच्या कारकिर्दीत नेमके किती लोक मरण पावले, यावर इतिहासकारात मतभेद आहेत. मात्र आकडा दशलक्षात जातो, याबद्दल फारसा वाद नाही. काही अभ्यासकांच्या मते जवळपास दहा लाख लोकांना थेट फाशी देण्यात आली. सक्तीचे श्रम, निर्वासन, दुष्काळ आणि कारावासामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या त्याहून कितीतरी मोठी होती. पण हुकूमशाहीचा सर्वांत विचित्र परिणाम मृतांच्या संख्येत दिसत नाही. तो जिवंत माणसांच्या वागण्यात दिसतो. लोक सत्य बोलणं बंद करतात. अधिकारी स्वतंत्र निर्णय घेणं बंद करतात. तज्ञ आपलं मत देण्याआधी बॉसचा मूड तपासतात, आणि हळूहळू संपूर्ण व्यवस्था विचार करणं विसरते.
१९५२ मध्ये स्टालिनचे वैयक्तिक डॉक्टर व्लादिमीर विनोग्रादोव्ह यांनी त्याच्या प्रकृतीत होत असलेला बिघाड ओळखला. डॉक्टरांनी रुग्णाला अत्यंत साधा सल्ला दिला, काम कमी करा, विश्रांती घ्या. एखाद्या सामान्य रुग्णाने हा सल्ला ऐकला असता.
स्टालिनने डॉक्टरांनाच अटक करवली.
विनोग्रादोव्ह यांना तथाकथित 'डॉक्टर्स प्लॉट' प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं आणि चौकशी दरम्यान त्यांचा छळ करण्यात आला. अनेक नामवंत डॉक्टरांवर सोव्हिएत नेत्यांना मारण्याचा कट रचल्याचा खोटा आरोप करण्यात आला. डॉक्टरांचा गुन्हा काय होता? त्यांनी आपलं काम केलं होतं. पण ज्या व्यवस्थेत वाईट बातमी देणाऱ्यालाच शत्रू मानलं जातं, त्या व्यवस्थेत सत्य सांगणं हा सर्वांत धोकादायक गुन्हा ठरतो.
१ मार्च १९५३. स्टालिन आपल्या मॉस्को जवळील निवासस्थानी होता. दिवसभर त्याच्या खोलीतून कोणतीही हालचाल झाली नाही. घंटी वाजली नाही. जेवण मागवलं गेलं नाही. तरीही सुरक्षारक्षक आत गेले नाहीत. कारण स्टालिनला विनापरवानगी त्रास देण्याचे परिणाम त्यांना माहीत होते. शेवटी रात्री साडेदहाच्या सुमारास अखेर कोणीतरी आत जाण्याचं धाडस केलं.
स्टालिन जमिनीवर पडलेला होता. त्याला मेंदूचा गंभीर झटका आला होता. शरीराची एक बाजू निकामी झाली होती आणि त्याला बोलता येत नव्हतं. पण इथेही डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं नाही. रक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहिली. वरिष्ठांनी पक्षनेत्यांशी संपर्क साधला. लाव्ह्रेंती बेरिया आला. काही नोंदींनुसार त्याने स्टालिन झोपला आहे, त्याला त्रास देऊ नका, असं सांगितलं. शेवटी डॉक्टर सकाळी पोहोचले.
तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नेमका किती विलंब भीतीमुळे झाला आणि किती सत्तासंघर्षामुळे, यावर इतिहासकारात मतभेद आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट होती, स्टालिनने निर्माण केलेली व्यवस्था त्याच्या अनुपस्थितीत साधा निर्णयही घेऊ शकत नव्हती. ज्याने लाखो लोकांना असहाय केलं होतं, तो स्वतः जमिनीवर असहाय पडला होता. ज्याने डॉक्टरांना सत्य सांगण्याची शिक्षा दिली होती, त्याला वाचवण्यासाठी योग्य डॉक्टर जवळ नव्हते. ज्याने प्रत्येक निर्णय स्वतःभोवती केंद्रीत केला होता, त्याच्या सर्वांत जवळचे लोक स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमताच गमावून बसले होते.
ही केवळ स्टालिनच्या मृत्यूची कथा नाही. हा प्रत्येक संस्थेसाठी एक इशारा आहे. अनेक कंपन्यात प्रत्येक प्रस्ताव मालकाकडे जातो. कर्मचारी स्वतंत्रपणे ग्राहकाला उत्तर देऊ शकत नाहीत. मॅनेजर समस्या सांगण्या ऐवजी ती लपवतो. मीटिंग मध्ये सर्वजण बॉसच्या मताशी सहमत होतात, आणि बाहेर पडल्यावर त्या निर्णयावर टीका करतात. कारण चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा निर्णयच न घेणं सुरक्षित वाटतं. अशा संस्थेत मालकाला आपण सर्वकाही नियंत्रणात ठेवलं आहे असं वाटतं. प्रत्यक्षात त्याने स्वतःभोवती निर्णय घेऊ न शकणाऱ्या लोकांची गर्दी निर्माण केलेली असते.
नेत्याला सतत चांगल्या बातम्याच ऐकू येत असतील, तर त्याची संस्था चांगली चालली आहे असं नाही. कदाचित वाईट बातमी सांगणारे लोक उरलेले नसतात. हुकूमशाहीची सर्वांत मोठी किंमत म्हणजे लोकांचा आवाज बंद होणं नाही. एक दिवस हुकूमशहाला स्वतःला मदतीची गरज असते, आणि त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाने विचार करणं आधीच बंद केलेलं असतं.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या