घरात सगळं आहे..पण कुठेतरी, कुणीतरी हरवलंय..!
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/10/2026 :
काल घरात चार्जर सापडत नव्हता. नेहमीच्या जागेवर नव्हता. मग शोधाशोध सुरू झाली.सोफ्याच्या फटीत बघितलं, बेडखाली बघितलं, टेबलावरच्या कागदांच्या ढिगाऱ्यात बघितलं. घरातल्या प्रत्येकाला विचारून झालं.
चार्जर मिळाला आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पण त्या क्षणी मनात एक विचार आला…
आपण घरात हरवलेल्या चार्जरसाठी इतके अस्वस्थ होतो, मग हळूहळू हरवत चाललेल्या माणसांचं काय?
कारण माणसं अचानक हरवत नाहीत.
ती घर सोडून जात नाहीत.
ती रोज आपल्या समोरच असतात.
सकाळी चहा देतात, ऑफिसला जातात, स्वयंपाक करतात, शाळेत जातात, टीव्ही पाहतात, मोबाईल स्क्रोल करतात…
सगळं काही नेहमीसारखंच दिसत असतं.
फक्त त्यांच्या मनातलं काहीतरी हळूहळू बदलत असतं.
आणि ते बदल आपल्याला दिसत नाहीत. किंवा दिसत असले तरी आपण दुर्लक्ष करतो.
कधीकाळी घरातली आई खूप बोलायची. तिला सगळ्यांच्या गोष्टी माहित असायच्या. आता ती तशीच काम करते, पण मधेच खिडकीतून बाहेर बघत बसते. काय विचार करत असेल? कोणी विचारत नाही.
वडील पूर्वी एखादा विनोद सांगून सगळ्यांना हसवायचे. आता ते जेवण झाल्यावर शांतपणे उठून त्यांच्या खोलीत जातात. वय वाढलं म्हणून असेल, असं म्हणून आपण पुढे निघून जातो. पण कदाचित वय वाढलेलं नसतं…एकटेपणा वाढलेला असतो. आजी-आजोबांचं तर अजून वेगळच.... त्यांच्याकडे वेळ असतो.
पण ज्यांच्यासाठी वेळ असतो, त्यांच्याकडे वेळ नसतो. पूर्वी घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग असायचा.
आज अनेकदा त्यांना फक्त माहिती दिली जाते.
त्यांच्या गोष्टी ऐकताना आपण मोबाईलकडे बघत असतो.आणि तेही मग तीच गोष्ट अर्धवट सोडून गप्प होतात*.
वयाच्या एका टप्प्यावर माणसाला औषधांपेक्षा जास्त गरज असते ती सोबतीची. पण, हे लक्षात येईपर्यंत बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो.
मुलंही हरवत आहेत.पूर्वी शाळेतून आली की घरभर आवाज असायचा. आता दार उघडतं, बॅग ठेवली जाते आणि खोलीचं दार बंद होतं. आपल्याला वाटतं,
“आजकालची पिढीच अशी आहे.”
कदाचित असेलही...!
पण कदाचित त्यांच्याही मनात काही प्रश्न असतील, काही भीती असतील, काही न सांगितलेली दुःखं असतील. कुणास ठाऊक?
आजकाल घरात सगळं आहे.
मोठ मोठाले टीव्ही आहेत. महागडे मोबाईल आहेत. वाय-फाय आहे. एसी आहे. सर्व सुखसोयी आहेत. पण कधी कधी वाटतं, घरातल्या माणसांपर्यंत पोहोचण्याचे रस्ते मात्र हरवले आहेत..!
एकाच घरात राहणारी माणसं दिवसभरात किती वेळ खरंच एकमेकांशी बोलतात?
जेवलास का?”
“लाईट बंद कर.”
“उद्या किती वाजता जायचं?”
याच्या पलीकडे किती संवाद उरला आहे?
कधी कधी रात्री सगळे झोपल्यावर घरात एक विचित्र शांतता असते. त्या शांततेत घरातल्या प्रत्येक माणसाचा थकवा, त्याचं एकटेपण, त्याच्या न बोललेल्या गोष्टी भिंतींना कदाचित ऐकू येत असतील. फक्त आपल्यालाच ऐकू येत नाहीत.
... आणि गंमत म्हणजे हे सगळं कोणाच्या घरात घडत नाही. हे आपल्या सगळ्यांच्या घरात घडत असतं.
फरक एवढाच…
आपण त्याला नाव देत नाही. आपण म्हणतो सगळं व्यवस्थित चाललं आहे. कारण घरात भांडणं नाहीत. सगळे आपापली कामं करत आहेत.
कोणी तक्रार करत नाही.
पण कधी कधी तक्रार न करणारी माणसं सर्वात जास्त थकलेली असतात*.
आणि शांत दिसणारी माणसं सर्वात जास्त हरवलेली असतात.
आजही कदाचित आपल्या घरात कुणीतरी खिडकीतून बाहेर बघत असेल..
कुणीतरी जुन्या फोटोंकडे पाहत असेल. कुणीतरी मोबाईल हातात धरून कोणाच्या फोनची वाट पाहत असेल. कुणीतरी सगळ्यांसाठी धावत असेल आणि मनातल्या मनात विचार करत असेल…
माझ्यासाठीही कुणी थांबत असेल का?”
हा प्रश्न मोठ्याने कोणी विचारत नाही.
म्हणून तो ऐकूही येत नाही, म्हणा..
कालचा चार्जर शेवटी सापडला.
पण त्या शोधात एक गोष्ट जाणवली…
घरात हरवलेल्या वस्तू शोधणं खूप सोपं असतं.
कारण त्या कुठे आहेत हे तरी आपल्याला माहीत असतं. अवघड असतं ते घरातच असलेल्या, आपल्या अगदी जवळ असलेल्या आणि तरीही हळूहळू दूर निघून गेलेल्या माणसांना पुन्हा शोधणं.
आणि कधी कधी वाटतं…आपल्या घरात चार्जर हरवलेला नसतोच. हरवलेलं असतं ते एखाद्या आईचं हसू, वडिलांचा मोकळेपणा, आजी-आजोबांच्या गोष्टी ऐकणारे कान, किंवा मुलांच्या मनातलं बोलकं जग..!
आणि त्या हरवलेल्या गोष्टींची शोधाशोध सुरू झाली तर…कदाचित अनेक घरांना पुन्हा घरपण सापडेल...!
संग्राहक किंवा लेखक माहित नाही. पण वाचनीय वाटला म्हणुन शेयर केलाय
0 टिप्पण्या