“आज थेंब जपा… उद्या अश्रूंनाही पाणी उरणार नाही!” 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/10/2026 :

निसर्गाने ऑक्टोबरमध्येच रेड अलर्ट दिलाय... डोळे उघडा, नाहीतर भविष्यात अश्रू ढाळायलाही पाणी उरणार नाही!

अरे भाऊ, जरा दोन मिनिटे तुमचा हातातला मोबाईल बाजूला ठेवा, तो चहाचा कप खाली ठेवा आणि शांतपणे विचार करा.

नेहमी आपले काय ठरलेले असते? दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात नळाला पाणी कमी आले, विहिरी आटल्या की आपण दोन महिने आरडाओरडा करतो. व्हॉट्सॲपवर स्टेटसला दुःखाचे मेसेज ठेवतो, न्यूज चॅनेल्सवर टँकरच्या रांगा बघून हळहळतो आणि जूनमध्ये पहिला पाऊस पडला की डोक्यावर हात ठेवून सगळे विसरून जातो!

पण मित्रांनो, या वर्षी निसर्गाने भयानक ट्विस्ट आणलाय.

आत्ता आकाशात ढग आहेत, कधीतरी पावसाची सर येतेय, म्हणजे अधिकृतपणे पावसाळा अजून संपलेलाही नाही... आणि आत्ताच, ऑक्टोबर २०२६ मध्येच, आपल्या महाराष्ट्राच्या छाताडावर ७५% पाणीटंचाईचे भयानक भूत येऊन बसले आहे!

अजून उन्हाळा यायचा बाकी आहे भाऊ! जरा शांतपणे बोटांवर मोजा आणि कॅलेंडरचा हा हिशोब बघा:

 • १) ऑक्टोबर (पावसाळा संपतानाच कोरड!)

 • २) नोव्हेंबर (थंडीची सुरुवात, पण धरणात पाणी नाही)

 • ३) डिसेंबर (गुलाबी थंडी, पण चिंतेचे ढग)

 • ४) जानेवारी २०२७ (नवीन वर्षाची सुरुवात टंचाईने)

 • ५) फेब्रुवारी (विहिरींची पातळी खाली)

 • ६) मार्च (उन्हाचा चटका आणि पाण्याचा टंचाईचा झटका)

 • ७) एप्रिल (रखरखते उन्हाळे आणि टँकरची वाट)

 • ८) मे (पाण्याच्या एका-एका थेंबासाठी जीवन-मरणाचा संघर्ष!)

सलग ८ महिने... म्हणजेच तब्बल २४० दिवस!

विचार करा, हे पुढील आठ महिने आपण कसे काढणार आहोत? आठ महिने म्हणजे काही लहान सहान काळ नाही. पाणी काही फॅक्टरीतल्या मशिनमध्ये बनत नाही की ऑर्डर दिली आणि तयार झाले!

आणि एक सर्वात मोठा भ्रम डोक्यातून काढून टाका—"दुष्काळ हा फक्त शेतकऱ्यांचा विषय आहे, आपला काय संबंध?"

अहो भाऊ, शेतकरी जगला तरच आपण जगू! शेतात धान्यच पिकले नाही, तर शहरातल्या अलिशान मॉलमधून किंवा एसी सुपरमार्केटमधून काय प्लास्टिक आणि सिमेंट खाणार का? धरणात पाणी नसेल तर शहरातल्या १० व्या मजल्यावरील फ्लॅटच्या नळालाही पाणी येणार नाही. सोसायट्यांमध्ये टँकरचे दर गगनाला भिडतील, कारखाने बंद पडतील, हाताला काम उरणार नाही आणि रोजचे जगणे असह्य होईल. दुष्काळाची ही झळ तुमच्या-माझ्या घराच्या चुलीपर्यंत आणि थेट ताटापर्यंत पोहोचणार आहे!

म्हणूनच, नेहमीप्रमाणे फक्त गप्पा मारून किंवा फेसबुक-व्हॉट्सॲपवर हळहळ व्यक्त करून काहीही होणार नाही. 'अजीब फंडावाला' आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय काही 'छोटे, सोपे पण अत्यंत कडक फंडे'! हे फंडे आज, आत्ता आणि याच क्षणापासून आपल्या घरात आणि आयुष्यात लागू करूयात.

💡 पाणी वाचवण्याचे 'अजीब फंडे' (आजपासूनच मिशन मोडवर लागू करूयात!)

१. 'अर्धा ग्लास' पाहुणचार फंडा:

आपल्याकडे घरी पाहुणा आला की आपण आदरातिथ्य म्हणून तांब्या भरून किंवा मोठा फुल ग्लास पाणी देतो. पाहुणा त्यातले दोन घोट पितो आणि उरलेले पाऊण ग्लास पाणी सरळ बेसिनमध्ये ओतून दिले जाते.

 • फंडा: इथून पुढे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला अर्धाच ग्लास पाणी देऊयात. नम्रपणे सांगूया, "पाणी मौल्यवान आहे, तुम्हाला अजून हवे असेल तर नक्की सांगा." पाहुणाही खूश आणि उरलेले हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचेल!

२. 'एक बादली' चॅलेंज (शॉवर ला कायमची गोळी मारूया!):

शॉवरखाली उभे राहून मस्त गाणी गात आंघोळ करताना किती शेकडो लिटर पाणी वाहून जाते, याचा आपल्याला अंदाजच येत नाही.

 • फंडा: पुढील आठ महिने शॉवर पूर्णपणे बंद! फक्त एक बादली आणि एक तांब्या. एका माणसाच्या आंघोळीमागे रोज किमान ३० ते ४० लिटर पाणी वाचते. घरात ४ माणसे असतील तर रोज १५० लिटर पाण्याचे नेट सेव्हिंग!

३. RO च्या पाण्याचा 'रिव्हर्स' मास्टरस्ट्रोक:

आपल्या घरातील वॉटर प्युरिफायर (RO) १ लिटर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी तब्बल ३ लिटर वेस्ट पाणी बाहेर टाकून देतो. आपण ते पाणी पाईपद्वारे थेट बेसिनमध्ये सोडून देतो.

 • फंडा: तो वेस्ट पाण्याचा पाईप एका मोठ्या कॅनमध्ये किंवा बादलीत सोडूया. ते पाणी अजिबात घाण नसते! ते पाणी फरशी (पोछा) पुसण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा संडासच्या फ्लशसाठी वापरता येईल..काय बरोबर ना!

४. 'बेसिन लिकेज' आणि शेव्हिंग-ब्रश कट:

सकाळी ब्रश करताना किंवा दाढी करताना नळ धोधो चालू ठेवण्याची अनेकांना सवय असते.

 • फंडा: शेव्हिंग करताना एका मगमध्ये पाणी घ्या. ब्रश करताना दात घासेपर्यंत नळ पूर्ण बंद ठेवा, फक्त तोंड धुण्याच्या वेळीच नळ चालू करा. या एका छोट्या सवयीने कुटुंबाचे रोज ५० लिटर पाणी वाचवण्याचा प्रयत्न करूया. 

५. 'गाडी धुणे बंद, फक्त ड्राय क्लिनिंग चालू!':

सकाळी उठून पाईप लावून धोधो पाण्याने गाडी धुणे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा खून करण्यासारखे आहे.

 • फंडा: गाडी/आपली वाहने धुण्यासाठी पाईप वापरणे पूर्ण बंद करूया! आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एका लहान बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने आपली वाहने पुसून घेऊया. आपली वाहने थोडी कमी चमकली तरी चालेल भाऊ, पण निसर्गाचे आणि आपले भविष्य नक्कीच चमकून निघेल.

६. 'भाजी-तांदूळ' वॉटर बँक:

घरात आई, बायको किंवा बहीण भाजी धुते, तांदूळ-डाळ धुते, ते पाणी आपण थेट बेसिनच्या गटारात सोडून देतो.

 • फंडा: स्वयंपाकघरात भाजी आणि धान्य धुतलेले पाणी एका वेगळ्या घमेल्यात साठवून ते पोषक पाणी गच्चीवरील किंवा गॅलरीतील कुंडीतल्या झाडांना घालूया. झाडांना नैसर्गिक खत-पाणी मिळेल आणि आपले नळाचे अनमोल पाणी वाचेल!

७. 'थेंब-थेंब' लिकेजवर सर्जिकल स्ट्राइक:

आपल्या घरातील किंवा इमारतीतील नळातून जर 'टिप-टिप' पाणी गळत असेल, तर आपण "अरे जाऊ दे, थेंबच तर गळतोय" म्हणून दुर्लक्ष करतो.

 • फंडा: तो एक-एक थेंब २४ तासांत अख्खी २० लिटरची बादली भरतो! आजच प्लंबरला बोलावून आणि घरातील सर्व गळती बंद करूया. प्लंबर मिळेपर्यंत त्या नळाखाली एखादे भांडे ठेऊन, ते साठलेले पाणी वापरात आणूया. 

८. फ्लश टँकमध्ये 'एक लिटरची बाटली' फंडा:

आपण एकदा फ्लश केला की टँकमधून थेट ८ ते १० लिटर पाणी वाहून जाते.

 • फंडा: प्लास्टिकच्या १ लिटरच्या बाटलीत पाणी किंवा वाळू भरा, तिचे झाकण कडक लावा आणि ती बाटली तुमच्या फ्लश टँकच्या आत ठेवून द्या. यामुळे प्रत्येक वेळी फ्लश करताना १ लिटर पाणी कमी वापरात येईल आणि टँकचे कामही होईल!

मित्रांनो, निसर्गाने आपल्याला यंदा वेळेच्या आधीच कडक इशारा दिला आहे. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. हे उरलेले पावसाचे दिवस आणि येणारे आठ महिने जर आपण संयमाने आणि युक्तीने पाणी वापरले, तरच आपण या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू.

पाणी ही दुकानात विकत मिळणारी साधी बाटली नाही, तर ते 'आपले आणि आपल्या मुलांचे आयुष्य म्हणजेच जीवन ' आहे.

अजीब फंडावालाचा शेवटचा कडक मंत्र:

"आज जर पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला नाही, तर उद्या पश्चात्तापाचे अश्रू ढाळायलाही डोळ्यात पाणी उरणार नाही!"

पाणी वाचवा... महाराष्ट्र वाचवा!

ता. क.

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. 

#महाराष्ट्रवाचवा

#पाणीअडवापाणीजिरवा

#जलसंवर्धन

#पाणीटंचाई

#निसर्गाचाइशारा

#पर्यावरणसंवर्धन

#शेतकरीवाचवा

#जनजागृती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या